Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संधीचे सोने करण्याचा जनता दलाच्या बैठकीत निर्धार
मालेगाव / वार्ताहर

काँग्रेस व भाजपाला केंद्रात पर्याय देण्यासाठी निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीतर्फे धुळे लोकसभा

 

मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालेले ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांना विजयाची चांगली संधी असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच या संधीचे सोने करण्याचा निर्धार मंगळवारी रात्री येथे झालेल्या धर्मनिरपेक्ष जनता दल कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विकासापेक्षा मतपेटय़ांवर डोळा ठेऊन मतांच्या राजकारणावर भर देणारी काँग्रेस आणि जातीयवादी भूमिका घेणाऱ्या भाजपला अद्दल घडविण्यासाठी तिसऱ्या आघाडीची आवश्यकता लोकांना पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
मालेगाव शहर जनता दलाचे अध्यक्ष अ‍ॅड. खलील अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीस खुद्द निहाल अहमद, ओंकार लिंगायत, प्रवीण पाटील, बुलंद एकबाल, डॉ. गिरीश मोहिते, मोईन अशरफ, सुभाष अहिरे आदींसह शहर व तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तिसऱ्या आघाडीतर्फे धुळे मतदार संघातून आपल्याला उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, पण निवडणूक लढवावी किंवा कसे याविषयी कार्यकर्ते व हितचिंतकांची मते जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे बैठकीच्या प्रारंभीच निहाल अहमद यांनी स्पष्ट केले. त्यावर उपस्थित सर्वानीच त्यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. काही जणांनी तर फुलांचे हार-तुरे देऊन उमेदवारी निश्चित झाल्याबद्दल बैठकीतच अहमद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला.
बैठकीत अहमद यांनी निवडणूक का लढावी, विजयी होण्याकरिता कशी रणनीती अवलंबवावी याविषयी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. गोरगरीब व सामान्यजनांच्या प्रश्नी शासन दरबारी झटून निहालभाईंची त्यांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच पुढाकार घेतल्याबद्दल बैठकीत प्रशंसा करण्यात आली.
यापूर्वीच्या दिंडोरी मतदारसंघातील जनता दल उमेदवाराच्या विजयात मालेगाव विधानसभा मतदार संघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे, त्याचे सारे श्रेय निहालभाईंना असल्याचा उल्लेखही यावेळी वक्त्यांनी केला. आजवर राखीव दिंडोरी मतदारसंघात असलेले मालेगाव शहर व तालुका तसेच बागलाण विधानसभा मतदारसंघाचा नव्या पुनर्रचनेत धुळे या सर्वसाधारण मतदार संघात समावेश झाल्याने धर्मनिरपेक्ष जनता दलातर्फे उमेदवारी करण्याची निहालभाईंना संधी मिळाली आहे.
काँग्रेसने आजवर जनतेचा विकास करण्याऐवजी केवळ भूलथापा देऊन मतपेटय़ा शाबूत ठेवण्याकडे लक्ष दिले. आता जनतेला ते कळून चुकल्याने यापुढे या भूलथापांना जनता भीक घालणार नाही, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. भाजपच्या जातीयवादी भूमिकेवरही यावेळी जोरदार टीका करण्यात आली. काँग्रेस व भाजप आघाडीत लोक आता कंटाळले असून जनता आता समर्थ तिसऱ्या पर्यायाच्या
शोधात आहे. त्यामुळे तिसरी आघाडी हा चांगला पर्याय असल्याबद्दल जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले.