Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

..तर दोन्ही काँग्रेसला फटका
राजाभाऊ अहिरेंचा इशारा
मनमाड / वार्ताहर

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून प्रतारणा

 

झाल्यास दोन्ही काँग्रेसला त्याची किमंत मोजावी लागेल, असा इशारा रिपाइंचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी दिला आहे. जातीयवादी व हिंदुत्ववादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी आठवले यांनी फुले, शाहू, आंबेडकरवादी बहुजन समाजाला नेहमीच उत्तेजन दिले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण करुन त्यांना सत्तेवर बसविले आहे. मात्र याचा दोन्ही काँग्रेसला विसर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदार संघातून लढविण्याची घोषणा आठवले यांनी केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आठवले यांना अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शविल्याचे कारस्थान दोन्ही काँग्रेस करीत आहेत, पण महाराष्ट्रात फक्त शिर्डीच नव्हे तर ४८ मतदार संघ आहेत. या सर्वच मतदार संघातून रिपाइं आठवले गटाचे मजबूत संघटन आठवलेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आठवले यांची प्रतारणा केल्यास त्याचे परिणाम दोन्ही काँग्रेसला मतपेटीतून निकालानंतर दिसून येतील.
रिपाइंने स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातूनही स्वतंत्र उमेदवार दिला जाईल, आम्ही फक्त आठवले यांच्या आदेशाची वाट पाहात आहोत, असे नांदगाव तालुका रिपाइं अध्यक्ष राजाभाऊ पगारे, शहराध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, जिल्हा नेते दिलीप नरवडे, दिलीप निकम, बाळासाहेब जगताप, पी. आर. निळे, पुष्पलता मोरे आदींनी निवेदनाव्दारे म्हटले आहे.