Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कापूस खरेदी सुरू ठेवण्याची मागणी
जळगाव / वार्ताहर

कापसाचे शेवटचे बोंड शिल्लक असेपर्यंत खरेदी सुरूच ठेवणार असे राज्य शासनाचे धोरण असतांना कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने जळगावमधील कापूस उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली असून ही खरेदी आणखी महिनाभर सुरू ठेवण्याची मागणी तालुका कृषी उत्पन्न बाजार

 

समिती पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बाजार समिती सभापती बळीराम सोनवणे व उपसभापती चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांना यासंदर्भात नुकतेच निवेदन देण्यात आले. खरेदी १५ मार्चपासून बंद करण्यात येईल असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते, परंतु तालुक्यात दोन मार्चपासूनच कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील जमीन काळी व बागायती असल्याने कापसाच्या उत्पन्नास उशीर होतो. त्यामुळे खरेदी सुरू ठेवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शरद लाठी, प्रकाश नारखेडे, रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण भंगाळे, अनिल पाटील यावेळी उपस्थित होते. निवेदनाची प्रत पणन संचालक रवींद्र पाटील यांनाही देण्यात आली आहे.
जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्षांचा वाद
जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बाराव्या वित्त आयोगातील निधीच्या व्याजाच्या रक्कमेतून आपल्याच मतदार संघात सुरू केलेली कामे त्यांना स्वपक्ष तसेच विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतर तात्काळ थांबविणे भाग पडले. या रकमेचे सर्व सदस्यांमध्ये समान वाटप होणे आवश्यक असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केल्याने वाद झाला.
जळगाव जिल्हा परिषदेला बाराव्या वित्त आयोगाच्या निधीवरील ३४ लाख रूपये व्याजाच्या रकमेतून अध्यक्ष मुरलीधर तायडे व उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांनी ही रक्कम सर्व सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी समान प्रमाणात न वाटता आपल्याच मतदार संघात परस्पर वापरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस येताच सत्ताधिकारी सदस्यांसह विरोधी सदस्यही अध्यक्ष-उपाध्यक्षांवर तुटून पडले.
शिवसेनेच्या सदस्यांनी या कामांना मंजुरी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर ती कामे तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे सदस्य भिला सोनवणे यांनी ही रक्कम सर्व सदस्यात समान वाटप केले असते तप प्रत्येक सदस्यांच्या वाटय़ाला ५० हजार रूपये आले असते. त्यातून प्रत्येकाच्या संघात विकास कामांना सुरूवात झाली असती असे सांगितले.
शिवाजी रोडवरही अतिक्रमण हटावची मागणी
शहरात महापालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असतांना शिवाजीरोडकडे दुर्लक्ष कसे, अशी विचारणा नागरिकांकडून होऊ लागली आहे. आयुक्तांनी स्वत शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणाविषयी निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेने शुक्रवारपासून विशेष हटाव मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, चौक व व्यापारी संकुलातील अतिक्रमण हटविण्यात आले असून रस्ते, चौक व संकुले प्रशस्त वाटायला लागली आहेत. या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. ही मोहीम तात्पुरती न राबविता कायम स्वरूपी राबवावी, अतिक्रमण धारकांनाही शिस्त लावावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान साने गुरूजी चौक ते कोंबडी बाजार पर्यंतच्या वाहतुकीस व पादचाऱ्यांनाही अडचणीचा ठरणाऱ्या शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणांकडे अद्याप हटाव पथकाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. शिवाजी रस्त्यावर फळवाले, ड्रायफुट्स, कटलरी, फोटोफ्रेम, पाववाले यांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या मधोमध तत्कालीन नगर पालिकेने हातगाडय़ा लावायला परवानगी दिली असतांना विस्तार वाढवित अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर पक्की दुकाने उभारली आहेत. फळवाल्यांनी तर खाली दुकान व वर त्याच्यापेक्षा मोठे छत अशी रचना केली असल्याने पायी चालणेही मुश्किल झाले आहे.