Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कळंबा कारागृहात खलिस्तानवादी कैदीच नाहीत, तर पत्र कोण पाठविणार?
‘डी’ गँगकडून कैद्यांना कथित धर्मातराबाबत दबाव; गृह राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
कोल्हापूर, १८ मार्च / प्रतिनिधी

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खलिस्तानवादी कैद्यांवर ‘डी’ गँगकडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आणला जात असल्याचे एक पत्र राज्य शासनाला प्राप्त झाले असून त्याबद्दल चौकशी

 

करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले असले तरी त्यामध्ये एक टक्काही तथ्यांश नसल्याचे तुरूंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक खलिस्तानवादी कैदी नसल्याची वस्तूस्थितीही चौकशी केली असता पुढे आली आहे.
कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात डी गँगच्या कैद्यांकडून खलिस्तानवादी कैद्यांवर त्यांनी इस्लामधर्म स्वीकारावा असा दबाव येत असल्याचे वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर स्थानिक वृत्तपत्रांनीही या घटनेला ठळक प्रसिध्दी दिल्यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती. मात्र हे खळबळजनक वृत्त सत्याचा विपर्यास करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूरच्या या कारागृहात डी गँगचे पाच कैदी असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यापैकी केवळ दोन उपद्व्यापी कैद्यांना कारागृहातील भक्कम अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
याच कारागृहात कांही वर्षांपूर्वी खलिस्तानी चळवळीतील कांही दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. गेल्या कांही वर्षांपासून ते आजतागायत या कारागृहात एकही खलिस्तानवादी कैदी नाही. शिख समाजाचे एकूण सात कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. हे शिख समाजाचे कैदी सांगली, अहमदनगर, मुंबई, ठाणे, अलिबाग या भागातील असून ते व्यक्तीगत कारणातून खून करून शिक्षा भोगण्यासाठी म्हणून या कारागृहात आलेले आहेत. विशेष म्हणजे, या सात जणांना स्थानिक वृत्तपत्रांनी खलिस्तानवादी दहशतवादी ठरविल्याबद्दल त्यांनी आज तुरूंग प्रशासनाकडे आश्चर्य व्यक्त केले आहे.या सातपैकी कोणीही गुरूद्वारा समितीला गुरूमुखी भाषेतून धर्मातराबद्दल दबाव येत असल्याचे पत्र लिहिलेले नाही. मुंबई टोळीयुध्दातील विविध टोळ्यांचे गुन्हेगार पूर्वी या कारागृहात होते. आजमितीला फक्त पाच कैदी डी गँगशी संबंधीत असून त्यातील तीन कैदी कारागृहातील वेगवेगळ्या सर्कलमध्ये रहातात. मुंबई बाँबस्फोटातील शिक्षा झालेले कांही देशद्रोही कैदीही या कारागृहात असून ते सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे इथे वागतात. कोल्हापुरातील या कारागृहात डी गँगचे लोक खलिस्तानवादी कैद्यांवर इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याबद्दल दबाव आणत आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही अशा बिनबुडाच्या वृत्तांबद्दल खेद व्यक्त केला आहे. गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना डी गँगकडून खलिस्तानवादी कैद्यांवर धर्मातर करण्याबद्दल दबाव आणला जातो आहे अशा आशयाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले असल्याचे सांगितले होते. त्यांनी दिलेल्या माहितीत कळंबा कारागृहाचा उल्लेख आल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना आमच्या कारागृहात खलिस्तानवादी आहेत, ना आमच्या कारागृहातून अशा प्रकारचे पत्र गुरूद्वारा समितीला पाठवलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाशी कळंबा कारागृहाचा दुरान्वयानेही संबंध पोहोचत नाही असे सांगण्यात आले. ज्या विपर्यस्त बातम्या आलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही तुरूंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमकी वस्तूस्थिती कळविणार आहोत असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.