Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘सत्ता प्राप्त करो’ अभियानांतर्गत बसप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
नांदगाव, १८ मार्च / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘सत्ता प्राप्त करो’ अभियान बहुजन समाज पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असून नांदगाव विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यात त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात

 

आले.
मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातूनही सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्र्युला वापरला जावून उमेदवार पक्षातर्फे उभा केला जाणार असल्याची माहिती मेळाव्यात देण्यात आली. नाशिक जिल्हाध्यक्ष संजय घोडके आणि जिल्हा सहप्रभारी पोलस अहिरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ताकदीने निवडणुका लढविण्याचे आवाहन केले. यावेळी राजेंद्र पगारे यांची नाशिक जिल्हा चर्मकार समाज भाईचारा महासचिवपदी, धनंजय अवचारे यांची नाशिक जिल्हा मातंग समाज भाईचारा महासचिवपदी आणि समाधान जगताप यांची नांदगाव विधानसबा माळी समाज भाईचार महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. कैलास बागूल, वाल्मिक माळी, दयानंद मरकड, लक्ष्मण मरकड, बाळू बरडे, विनोद पवार आदींनी बसपामध्ये प्रवेश केला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक राजाभाऊ गायकवाड, वैशाली पगारे, सलीम सोनावाला आदींनी परीश्रम घेतले.
राष्ट्रवादीमध्ये समाधान
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाणार हे निश्चित झाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधान पसरले असून काँग्रेस पक्षाच्या गोटातून काहीशी नाराजी दाटलेली दिसत आहे. शेवटी आघाडी झाल्याने अस्वस्थता, गैरसमज व अस्थिरतेचे वातावरण झपाटय़ाने कमी होण्याची शक्यता दोन्ही पक्ष कार्यकर्ते वर्तवित आहेत. नांदगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती या आधी झालेली आहे. तोच प्रयोग मनमाड नगरपरिषदेतही यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. राज्य पातळीवर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या युतीची शक्यता अधिकाधिक घट्ट होत जाण्याचे भाकित व्क्त केले जात होते, तशी युती झाली असती तर दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा मार्ग अधिक निर्धोक झाला असता, आणि नांदगाव विधानसभेत सेनेचा मार्ग सुकर झाला असता, असे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून मतप्रदर्शन होऊ पहात होते.
अर्थात नांदगाव शहर तसेच मनमाड शहर वगळता संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही संघटन असल्याचे दिसत नाही. किंबहुना राष्ट्रवादीचे तालुका नेते हे काँग्रेसच्या राहुटीतच दिसत असल्याने राष्ट्रवादीकडे तरूण वर्गाने वळण्याचे धारिष्टय़ केलेले नाही.