Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

टंचाई समस्येचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून केव्हाही तयारी सुरू होवो, धुळे शहरात आतापासूनच नागरिकांनी आपआपल्या परीने तयारी सुरू केली असून पाणी साठवणुकीसाठी टाक्या विकत घेण्यात येत आहेत.

बंद दूरध्वनी संगे, कर्मचारी रात्रभर जागे
वार्ताहर / नांदगाव

बिलाची थकीत रक्कम भरली नाही म्हणून येथील तहसील कार्यालायतील दूरध्वनी एक वर्षांपासून बंद पडला आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशामुळे या बंद दूरध्वनीजवळ बसून रात्र-रात्र जागून काढण्याचा प्रसंग कर्मचाऱ्यांवर ओढवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

सिंचन प्रकल्पांसाठी कर्जरोखे उभारण्याची संकल्पना बासनात
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / धुळे

औद्योगिक विकासाला चालना देऊ शकणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील खितपत पडलेल्या सिंचन योजनांचा गांभिर्याने विचार कुणीही करताना दिसत नाही. आजवर शासन पातळीवर सिंचनाच्याबाबतीत शेकडो निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, त्यापैकी नेमके किती झिरपलेत आणि उद्योग व्यवसायाला खऱ्या अर्थाने कितपत चालना मिळाली हा संशोधनाचा मुद्दा ठरू शकेल. मध्यंतरी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जरोखे उभारण्याची मांडलेली संकल्पना बासनात बांधून ठेवण्यात आली. त्यामुळे रखडलेली कामे पुढे सरकू शकली नाहीत.

धुळ्यात निहालभाईंच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता
घडामोडी

धुळे / वार्ताहर

धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत समाविष्ट विधानसभा मतदार संघांमधील राजकीय पक्षांचा प्रभाव, जाती-धर्माची मतविभागणी, विकास कामांची तुलना, प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाने दिलेला उमेदवार कोणता, या सगळ्या पातळ्यांवर आगामी निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

रावेरमध्ये चोपडय़ामुळे समीकरण बदलणे शक्य
जळगाव / वार्ताहर

पुनर्रचनेमुळे रावेर लोकसभा मतदार संघातील सर्वच समिकरणांना धक्का बसण्याची चिन्हे दिसत असून धोका लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेना-भाजप युतीतर्फे व्यूहरचना आखण्यात येत आहे. प्रचारात नेमका कोणत्या मुद्यावर भर द्यावा त्याचेही नियोजन करण्यात येत असून चोपडा तालुक्याचा समावेश या मतदार संघात करण्यात आल्याने हा बदल उलटफेर करू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदार संघातून काँग्रेसकडे मराठा इच्छुकांनीही उमेदवारी मागितल्याने हेच स्पष्ट होत आहे. महिलांना निवडणुकीत अधिकाधिक प्रतिनिधीत्व देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केल्याने जळगावच्या आ. मधु जैन यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वास्तविक मधु जैन या नुकत्याच विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सुरेश जैन यांच्याशी नातेसंबंध असलेल्या मधु जैन या काँग्रेसशी कायम निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात. सुरेश जैन यांनी अनेक पक्ष बदलले असले तरी मधु जैन यांनी काँग्रेसवरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदा पर्यंतही त्यांनी मजल मारली. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणूनच विधान परिषदेसाठी त्यांचा विचार झाला. आमदारकी हातात असतांना त्यांनी खासदारकीसाठी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडे रावेरसाठी इच्छुकांची यादी पाहता यावेळी दोन प्रबळ मराठा उमेदवारांचाही त्यात समावेश आहे. या मतदार संघासाठी हा महत्वाचा बदल असून रावेरमध्ये चोपडय़ाचा समावेश असल्याने हा बदल दिसून येत असल्याचे समजण्यात येते. चोपडय़ाचे माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांचे पुत्र अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय गरूड आणि चोपडय़ाच्या नगराध्यक्षा डॉ. जया पाटील या तिघांनी रावेरसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. जळगाव मतदार संघाचा पंधरा निवडणुकांचा इतिहास पाहता लेवा पाटील समाजाचे वर्चस्व दिसून येते. मतदार संघ पुनर्रचनेत मात्र जळगाव वगळून त्यात चोपडा तालुक्याचा समावेश झाल्याने समिकरण बदलणार असे चित्र वरील इच्छुक बाळगून असावेत. चोपडा तालुक्यात मराठा, कोळी तसेच आदिवासी मतदारांचा मोठय़ा प्रमाणात प्रभाव असून सद्यस्थितीत तेथे शिवसेनेचा आमदार असला तरी हा तालुका राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांच्या प्रभुत्वाखालील म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक व तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुजराथींनी ते सिध्दही केलेले आहे. २००७ च्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीला येथून चांगले मताधिक्य मिळाले होते.

सामाईक विहिरीवरून वाद; पिंपळगावमध्ये तिघांना कोठडी
वार्ताहर / मालेगाव

शेतातील सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून निर्माण झालेल्या वादात तालुक्यातील पिंपळगाव येथील महिलेस विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आणखी एक संशयित महिला फरार आहे. साहेबराव सुदाम पवार आणि प्रशांत पवार यांची पिंपळगाव शिवारात सामाईक विहीर आहे. गेल्या काही दिवसांपासून या विहिरीवरील विद्युत पंपावरून या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रशांतची पत्नी वंदना ही पंप सुरू करण्यास गेली असता साहेबराव पवार, त्यांची मुले दिलीप, विकास आणि सून अनिता यांनी तिला पंप सुरू करण्यास मज्जाव केला. मात्र विरोधास न जुमानता वंदनाने पंप सुरू करण्याचा हेका कायम ठेवल्याने संतप्त झालेल्या चौघांनी तिला मारहाण करीत तिच्या तोंडात विषारी औषधाची बाटली ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. नातेवाईकांनी अत्यवस्थ अवस्थेत वंदनाला मालेगावच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत चार संशयितांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी अनिता पवार ही फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.