Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९पुणे, १८ मार्च/ प्रतिनिधी
शाळेची फी न भरलेल्या २५ ते ३० विद्यार्थिनींना फी भरेपर्यंत शाळेतच डांबून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार आज खडकी येथील सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूल येथे घडला. पहिली ते चौथीच्या वर्गातील चिमुरडय़ा विद्यार्थिनींना उपाशीपोटी ओलीस ठेवून त्यांच्या पालकांकडून फी वसूल करण्याच्या या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. खडकी पोलिसांकडे या प्रकरणी काही पालकांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

कोण म्हणतं टक्का दिला ?
मुकुंद संगोराम

कोथरूडच्या टीडीआर प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्यास परवानगी मागणारा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव मंजूर न करून स्थायी समितीच्या तेरा सदस्यांनी आपले सर्व नैतिक अधिकार विकून टाकले आहेत! एखाद्या प्रकरणात एखादा अधिकारी दोषी नसतानाही त्याला निलंबित करण्याची आग्रही मागणी करणारे हेच नगरसेवक टीडीआर प्रकरणात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालू लागल्यावर खरे कोण, असा प्रश्न कुणाही सामान्य माणसाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

घडलंय बिघडलंय..
निवडणुकीच्या सारीपाटावर कधी सोंगटय़ा उलटय़ा पडतील हे सांगता येत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार याचा अनुभव घेत आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश या इच्छुकाला आला आणि भारावलेल्या मनाने त्याच्या तयारीने वेग घेतला. हा इतका जोरात की त्याने आपली पूर्वकथा सांगताना जीवनाशी कसा झगडा केला याचा इतिहासच वाचला. त्यानंतर त्याने आपली हुकूमी खेळी करताना काही मंडळींना चक्क घडय़ाळाचे वाटप केले.

पाणी, आरोग्यसेवेसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही
पिंपरी, १८ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागू झाल्या असल्या तरी पाणी, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी त्याचा अडथळा येणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

टीडीआर घोटाळा प्रकरणी समितीला उच्च न्यायालयाची स्थगिती
पुणे, १८ मार्च/प्रतिनिधी

कोथरूड टीडीआर घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर अभियोग दाखल करण्यासाठी परवानगी न देता या प्रकरणी एक नवी समिती नेमण्याच्या स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला आज उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. समिती नेमण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयाने हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशा शब्दांत स्थायी समितीला फटकारले.

द्रुतगती महामार्गावर अपघातात दोन ठार
लोणावळा, १८ मार्च/वार्ताहर

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किमी ७४/२०० येथे दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात मंजु युनुस कुरेशी (वय २६) व त्याचा भाऊ अस्पाक युनुस कुरेशी (वय २४) दोघेही राहणार मराळे अंधेरी(प.) मुंबई यांचा जागीच मृत्यु झाला. पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याविषयी सविस्तर माहिती अशी, की मुंबईहून पुण्याकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक क्र. एमएच.१०अे.६१०४ याचा कामशेत बोगद्याजवळ चालकाच्या बाजूकडील मागील टायर फुटल्याने तो शेवटच्या लेन वरून धिम्यागतीने पुण्याकडे चालला होता, त्याच दिशेने भरधाव मागून आलेला ट्रक क्र. एम.एच. ०४ डीडी ९४१९ याचा चालक मंजु कुरेशी याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो समोरील ट्रकवर भरधाव आदळला. यात मंजु व त्याचा भाऊ अस्पाकयांचा जागीच मृत्यु झाला. ते मरोळ व भिवंडी येथून मालाचा ट्रक घेऊन बंगलोरला निघाले होते.अपघातात समोरील ट्रकमधील लोखंडी पाईप रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किसन गायकवाड, राजेंद्र शितोळे, विठ्ठल काळे यांनी आय आर बी चे सुरक्षा कर्मचारी राजकुमार संगडी, संजय राक्षे, सुदाम मतकर यांच्या सहकार्याने महामार्गावरील पाईप दूर केल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली.

आयुध निर्माण दिन उत्साहात साजरा
पिंपरी,१८ मार्च/ प्रतिनिधी

देहूरोड येथील आयुध निर्माण संस्थेचा २०७ वा स्थापना दिन आज मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. आयुध निर्माण संस्थेचे महाव्यवस्थापक डॉ. ए. के. बोस यांनी संस्था आवारात सकाळी ध्वजारोहण केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी आयुध निर्माण दिवसाची शपथ दिली. डॉ. बोस यावेळी मार्गदर्शन करताना उपभोक्ता केंद्रीत उत्पादनाची निर्मिती महत्त्वाची आहे, असे म्हटले.
यावेळी रुबी हॉल क्लिनिकच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. यावेळी संस्थेतील सहायक जी. टी .कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ कर्मचारी, एस एम. पाटील यांना सर्वोत्तम सल्लागार तर, परीक्षक एस.एस. काटे यांना ‘मिस्टर ऑर्डनन्स’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

प्रवासी म्हणून बसलेल्या भामटय़ांनी गाडीचालकास लुटले
पिंपरी, १८ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन येथून प्रवासी म्हणून बसलेल्या चौघा भामटय़ांनी एका गाडीचालकास लुटून त्याची स्कॉर्पिओ गाडी चोरुन नेली. लुटारुंनी चालकाचे हातपाय बांधून त्याला पनवेल येथे नाल्यात फेकले. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश मनोहर खळगे (वय ३०, रा. आनंदनगर, चिंचवड) असे तक्रारदाराचे नाव आहे. खळगे हे (एम एच १४ बीसी ९१६१) या स्कॉर्पिओ गाडीवर चालक म्हणून काम पाहतात. सोमवारी रात्री एकच्या सुमारास चार भामटे त्यांच्या गाडीत प्रवासी म्हणून बसले. त्यांनी पनवेल बाह्य़वळण महामार्गावर उलटी आल्याचे सांगून गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबताच चोरटय़ांनी खळगे यांचे हातपाय बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. गाडी व आठशे रुपये चोरटय़ांनी लांबविले. प्रथम हा गुन्हा रायगड येथे दाखल करुन निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. निगडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक अनघा देशपांडे अधिक तपास करीत आहेत.

किरण पुजारीकडून शस्त्रे, रक्ताळलेले कपडे व गाडी जप्त
पिंपरी, १८ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील खून प्रकरणातील पोलीस कोठडीमध्ये असलेला आरोपी किरण पुजारीकडून पोलिसांनी पहिल्याच दिवशी शस्त्रे, रक्ताने माखलेले कपडे व विद्याची सॅन्ट्रो गाडी जप्त केली आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण राजू पुजारी (वय २६, रा. खराळवाडी, पिंपरी) याला पिंपरी न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवड पोलिसांच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक राजेंद्र सावंत, हवालदार लक्ष्मण पुंडे, तात्या तापकीर, संतोष बर्गे, नजीम मुल्ला, दत्तात्रय कदम, दिलीप सरकाळे, शाम घनबोटे व ठसे तज्ज्ञांच्या तसेच दोन पंचांच्या मदतीने किरणकडे तपासाला सुरुवात केली. किरणने प्रथम पुणे-मुंबई बाह्य़वळण महामार्गावर खोपोलीनजीक रस्त्याच्या कडेला एका झुडपामध्ये विद्या व ओमला मारण्यासाठी वापरलेले शस्त्र फेकल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याने दाखविलेल्या ठिकाणावरुन रक्ताने माखलेले कपडे व सुरा जप्त केला. त्यानंतर पुढे मुंबईच्या देशांतर्गत हवाई अड्डय़ावर पार्क केलेली विद्याची सॅन्ट्रो गाडी ताब्यात घेतली. या दरम्यान, ठसे तज्ज्ञांनी प्रत्येक ठिकाणावरुन गोळा केलेल्या वस्तूंवरील ठस्यांचे नमुने घेतले. रात्री उशिरा हे पथक आरोपी किरणसह पुण्यामध्ये दाखल झाले.