Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

संजीवन विद्यालयास राज्यपालांची भेट
महाबळेश्वर, १८ मार्च/वार्ताहर

राज्यपाल एस. सी. जमीर यांनी महाबळेश्वरजवळ असणाऱ्या संजीवन विद्यालय पाचगणी येथे

 

मंगळवारी भेट दिली. तेथे विद्यालयातील एकात्मिक शिक्षणाच्या राष्ट्रीय संस्थेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
ट्रस्टचे चेअरमन गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.संजीवन विद्यालयात सध्या ६ वी त शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांंना भेटण्याची इच्छा राज्यपालांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने या शाळेत १२० आदिवासी विद्यार्थी ‘आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या कार्यक्रमांतर्गत पाठविले आहेत.
विदर्भ आणि मराठवाडा विभागातील हे विद्यार्थी जून २००७ पासून येथे शिकत आहेत. राज्यपालांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शैक्षणिक योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून राज्यपाल प्रभावित झाले.
राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले, ‘अनेक उपक्रम राबविणाऱ्या या शाळेचे उदाहरण इतर संस्थांनी डोळ्यासमोर ठेवावे. मिळालेले ज्ञान योग्य प्रकारे वापरा. महाराष्ट्रातील आदिवासींची परिस्थिती सुधारली पाहिजे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. इथले आदिवासी पण प्रगत झाले पाहिजेत सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्रात खूप नाव आहे. बुद्धिमत्ता आहे. विविध स्तरांवरील विद्यार्थी, अध्यापक येथे आहेत. राष्ट्रीय एकात्मता येथे जोपासली जाते. यातून सुपरपॉवर भारत उदयाला येईल.’