Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पोलिसांच्या सतर्कतेमुळे ४० मिनिटांत राबोडीतील दंगल आटोक्यात; २६ जण जखमी, ५३ जणांना अटक
ठाणे, १८ मार्च/प्रतिनिधी

भगव्या कमानीवरून उसळलेल्या दंगलीच्या जखमा ताज्या असतानाच राबोडीत रिक्षा-कारच्या

 

किरकोळ अपघातानंतर एका धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री उसळलेल्या जातीय दंगलीत १८ पोलिसांसह २६ जण जखमी झाले, तर १७ वाहने आणि दोन दुकाने जाळण्यात आली. दंगेखोर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवघ्या ४० मिनिटांत दंगल आटोक्यात आली. ५३ जणांना अटक करून राबोडीत उद्या सकाळी आठ वाजेपयर्ंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त तडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघ, उपनिरीक्षक राजेश वाघमारे, हवालदार कापरे, आयरे, पोलीस नाईक मोरे, ताठ, शिपाई फरास, सुनील क्षीरसागर, शरद हडप, नवनाथ पवार, संदीप शेळके, अरुण काळे, अनिल राठोड, संजय निखोले, सुचित खरात, दीपक पाटील हे पोलीस आणि सखाराम मोरे, समीर शेख, नीलेश माने, शफीम खान,लाल हुसेन सुलतान आणि मोहमंद रफीक खान हे जखमी झाले आहेत, तर जाफर अली सय्यद, मोसिम खान हे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
संवेदनशील असलेल्या लक्ष्मण पाटील चौकाजवळ रिक्षा व मारुती कार यांची किरकोळ धडक झाली. त्यातून दोघांचे भांडण झाले. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडल्यानंतर भांडण मिटले होते. दरम्यान एका धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याची अफवा पसरली आणि क्रांतिनगरमध्ये दोन्ही समाजातील जमाव आमने-सामने आला. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र दंगेखोरांनी डाव साधून पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यानंतर अश्रुधुराच्या माऱ्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दंगेखोर आक्रमक झालेले पाहून पोलीस उपायुक्त विक्रांत देशमाने यांनी हवेत गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी ५९ फैरी हवेत झाडल्या. त्यानंतर दंगेखोर पळून गेले. एक बेकरी, दुकान आणि सात वाहने जाळण्यात आली. १० वाहनांची तोडफोड करण्यात आली. मागील दंगलीचा फटका सहन करणाऱ्या पोलिसांनी राबोडीतील चारी दिशा बंद करून रस्त्यावर कोणा व्यक्तीला थांबू दिले नाही. गल्लोगल्लीत बंदोबस्त ठेवून बाहेरील व्यक्तीला राबोडीत घुसू दिले नाही.
दंगलीचे वृत्त मुंब्रा आणि कल्याणपर्यंत पोहचल्याने राबोडीला छावणीचे रूप आले. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी, एसआरपीएफच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या ४५ मिनिटांमध्ये दंगल आटोक्यात आणून ३९ दंगेखोरांना अटक करण्यात आली, तर १४ जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
घटनेनंतर गृहराज्यमंत्री नईम खान यांनी राबोडीत न जाता रात्री पोलीस आयुक्तालयात जाऊन दंगलीची माहिती घेतली. पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी आज दुपारी राबोडीतील दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलिसांशी हितगुज करून त्यांनी बजावलेल्या चोख कामगिरीचे कौतुक केले. राबोडीत शांतता राखण्यासाठी त्यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचा आदेश दिला.

.. तर शत्रूची गरज नाही - एस. एस. विर्क
क्षुल्लक कारणावरून अशी दंगल उसळल्याचा धक्का बसला असून ते शत्रूचे काम करीत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी शत्रूची काय आवश्यकता, अशी खंत पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राबोडीतील दंगलीचा अभ्यास करण्यासाठी आलो आहे. दंगलीत पोलिसांना लक्ष्य केले जात असून त्यावर उपाययोजना केली जाणार आहे.
देशातील धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा गर्व असून अशा घटना लजास्पद आहेत. लोकांच्या मानसिकतेत बदल होऊ लागला असून या सामाजिक प्रश्नावर तोडगा काढला जाईल असेही विर्क यांनी सांगितले.