Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

समुद्रात रेती काढणाऱ्या बोटींना पाचुबंदरवासीयांनी बुडविले
नालासोपारा, १८ मार्च/वार्ताहर

भर समुद्रात रेती काढणाऱ्या बोटींवर हल्ला करून किल्लाबंदर- पाचुबंदरवासीयांनी दोन बोटी

 

समुद्रात बुडविल्या. त्यातील एक बोट काढण्यात यश आले, तर दुसरी बोट अद्यापही समुद्राच्या तळाशी आहे. याबाबत तक्रार करण्यास बोट मालक व ग्रामस्थ वसई पोलीस ठाण्यात गेले असता, आधी बोट बाहेर काढा आणि मग या! हा अदखलपात्र गुन्हा आहे, असे सांगून पोलिसांनी तक्रारदारांना परत पाठवून दिले.
वसई तालुक्यातील नायगाव-जुचंद्रवासीयांचा रेती काढण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. वाडवडिलांपासून चालत आलेल्या या व्यवसायावर आज अनेकांची घरे चालतात. समुद्रात जेथे सुकी जमीन असते. तेथील रेती हे लोक काढतात. काल नेहमीप्रमाणे काही बोटी रेती काढत असताना अचानक किल्लाबंदर- पाचुबंदर येथील चार-पाच बोटी आल्या. प्रत्येक बोटीवर १० ते १५ लोक होते. त्यांनी बर्फ तोडण्याचा चिमटा, फावडे, बांबू, सळई, हातोडा यांनी रेती काढणाऱ्या बोटींवर व त्यावरील खलाशांवर हल्ला चढविला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने सगळेच बावरून गेले. त्यातील काही जण पळण्यात यशस्वी झाले, तर हल्लेखोरांनी हातात सापडलेल्या ‘वैभव लक्ष्मी’ व ‘सागर सम्राट’ या बोटींची तोडफोड करून त्यावरील खलाशांना मारहाण करून बोटी समुद्रात बुडविल्या. त्यातील सागर सम्राट बाहेर काढण्यात यश आले, तर वैभव लक्ष्मी अद्यापही पाण्याखाली आहे. तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याप्रकरणी बोट मालकांसह नायगावचे माजी सरपंच गंगाधर, सरपंच निवृत्ती भुशेकर, आत्माराम कोळी, ब्रस्त्याव कोळी, किरण कोळी व इतर ग्रामस्थ पोलीस ठाण्यात काल आणि आजही तक्रार देण्यास गेले असता ती नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी हा अदखलपात्र गुन्हा आहे. आधी बोट बाहेर काढा, मग या असे उत्तर दिले. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा, या प्रश्नाने त्रस्त झालेल्या लोकांनी विरारला जाण्याच्या निर्णयावर विचार करण्यास सुरुवात केली आहे.