Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
राज्य

संजीवन विद्यालयास राज्यपालांची भेट
महाबळेश्वर, १८ मार्च/वार्ताहर

राज्यपाल एस. सी. जमीर यांनी महाबळेश्वरजवळ असणाऱ्या संजीवन विद्यालय पाचगणी येथे मंगळवारी भेट दिली. तेथे विद्यालयातील एकात्मिक शिक्षणाच्या राष्ट्रीय संस्थेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टचे चेअरमन गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.संजीवन विद्यालयात सध्या ६ वी त शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांंना भेटण्याची इच्छा राज्यपालांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने या शाळेत १२० आदिवासी विद्यार्थी ‘आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या कार्यक्रमांतर्गत पाठविले आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे ४० मिनिटांत राबोडीतील दंगल आटोक्यात; २६ जण जखमी, ५३ जणांना अटक
ठाणे, १८ मार्च/प्रतिनिधी

भगव्या कमानीवरून उसळलेल्या दंगलीच्या जखमा ताज्या असतानाच राबोडीत रिक्षा-कारच्या किरकोळ अपघातानंतर एका धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री उसळलेल्या जातीय दंगलीत १८ पोलिसांसह २६ जण जखमी झाले, तर १७ वाहने आणि दोन दुकाने जाळण्यात आली. दंगेखोर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवघ्या ४० मिनिटांत दंगल आटोक्यात आली. ५३ जणांना अटक करून राबोडीत उद्या सकाळी आठ वाजेपयर्ंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

समुद्रात रेती काढणाऱ्या बोटींना पाचुबंदरवासीयांनी बुडविले
नालासोपारा, १८ मार्च/वार्ताहर

भर समुद्रात रेती काढणाऱ्या बोटींवर हल्ला करून किल्लाबंदर- पाचुबंदरवासीयांनी दोन बोटी समुद्रात बुडविल्या. त्यातील एक बोट काढण्यात यश आले, तर दुसरी बोट अद्यापही समुद्राच्या तळाशी आहे. याबाबत तक्रार करण्यास बोट मालक व ग्रामस्थ वसई पोलीस ठाण्यात गेले असता, आधी बोट बाहेर काढा आणि मग या! हा अदखलपात्र गुन्हा आहे, असे सांगून पोलिसांनी तक्रारदारांना परत पाठवून दिले.

पर्जन्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी बेडकांचा विवाह
काठमांडू, १८ मार्च/पीटीआय

पर्जन्यदेवाला प्रसन्न करून घेण्याचा एक अनोखा मार्ग नेपाळमधील काही शेतकऱ्यांनी शोधून काढला आहे. बऱ्याच काळापासून बेपत्ता झालेला पाऊस परतावा यासाठी त्यांनी बेडकांचा विवाह लावला आहे. मध्य नेपाळमध्ये गेले आठ महिने पाऊस झालेला नाही. त्यामुळे गैरी या खेडय़ातील शेतकऱ्यांनी हा मार्ग अवलंबिला. या समारंभासाठी गावकऱ्यांनी दोन वेगवेगळ्य़ा प्रवाहांमधून एक नर आणि एक मादी बेडकांना पकडून आणले होते. त्यानंतर त्यांनी हिंदू पध्दतीप्रमाणे नागेश्वरी कालिकास्थान मंदिरात हा विवाह लावला. विवाहानंतर नवविवाहित जोडप्याला जवळच्या झऱ्यात सोडून देण्यात आले. दुष्काळामुळे कोणत्या स्थितीला आपणाला सामोरे जावे लागत आहेत याची माहिती हे जोडपे पर्जन्यदेवाला सांगतील, अशा अपेक्षेने त्यांना झऱ्यामध्ये सोडून देण्यात आले.विवाह लावण्यासाठी सात भटजी बोलावले होते व विवाह खर्चासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने वीस रूपयांची वर्गणी काढली होती. पाच वर्षांपूर्वी असाच विवाह लावल्यावर पाऊस झाला होता, असे गावकरी सांगतात. विवाह समारंभ झाल्यावर पावसाच्या काही सरी पडल्याचे एका महिलेने सांगितले. हा बेडकांचा विवाह आगळावेगळाच होता.

द्रुतगती महामार्गावर ट्रक अपघातात दोन ठार
लोणावळा, १८ मार्च/वार्ताहर

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किमी ७४/२०० येथे दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात मंजु युनुस कुरेशी (वय २६) व त्याचा भाऊ अस्पाक युनुस कुरेशी (वय २४) दोघेही राहणार मराळे अंधेरी(प.) मुंबई यांचा जागीच मृत्यु झाला. पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याविषयी सविस्तर माहिती अशी, की मुंबईहून पुण्याकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक क्र. एमएच.१०अे.६१०४ याचा कामशेत बोगद्याजवळ चालकाच्या बाजूकडील मागील टायर फुटल्याने तो शेवटच्या लेन वरून धिम्यागतीने पुण्याकडे चालला होता, त्याच दिशेने भरधाव मागून आलेला ट्रक क्र. एम.एच. ०४ डीडी ९४१९ याचा चालक मंजु कुरेशी याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो समोरील ट्रकवर भरधाव आदळला. यात मंजु व त्याचा भाऊ अस्पाकयांचा जागीच मृत्यु झाला.

दोन कोटीच्या थकबाकीमुळे नॅशनल रेयॉनचा वीजपुरवठा खंडीत
कल्याण, १८ मार्च/वार्ताहर

एक कोटी ९५ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी आज नॅशनल रेयॉन कंपनीचा वीज पुरवठा तोडण्यात आला. नॅशनल रेयॉन कंपनीच्या विजेच्या बिलाची थकबाकी एक कोटी ९५ लाखाच्या घरात गेली होती. महावितरणने वारंवार नोटीस पाठवून व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कंपनीचा वीजपुरवठा तोडला, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश रंगदळ यांनी सांगितले.

श्रीरंग विद्यालयात कॉपी नाही : व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
ठाणे, १८ मार्च / प्रतिनिधी

ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीकडून कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचे प्रकार होत नसल्याचा निर्वाळा श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने दिला आहे. मंगळवारच्या ‘लोकसत्ता’ मध्ये ‘बोर्डाच्या अधिकाऱ्यांचेच कॉपीबहाद्दरांना संरक्षण’ या मथळ्याने प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन आज एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. या भेटीत असा कोणताही प्रकार होत नसल्याचे पाहणीत आढळून आले, असे बोर्डाचे सदस्य प्रा. प्रकाश सोनवणे यांनी लेखी खुलाशात नमूद केले आहे. संस्थेचे मुख्याध्यापक प्र.द. अदरकर यांनी परीक्षा केंद्रातील विद्यार्थी किंवा पालकांकडून आतापर्यंत अशी तक्रार आलेली नसल्याचे नमूद केले असून केंद्रात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह प्रकार होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.