Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
क्रीडा

६ बाद ६०वरून न्यूझीलंडने उभारल्या २७९ धावा
डॅनियल व्हेटोरी, जेसी रायडर यांची झुंजार शतके
सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
द्रविडची मार्क वॉच्या झेलांच्या विक्रमाशी बरोबरी
भारत बिनबाद २९
हॅमिल्टन, १८ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडचा खुर्दा उडवून पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची नामी संधी आज पहिल्या दिवसाच्या खेळात भारताच्या हातून सुटली. भारताने न्यूझीलंडची एकवेळेस ६ बाद ६० अशी नाजूक अवस्था केली होती. पण मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेत कर्णधार डॅनियल व्हेटोरी आणि जेसी रायडर यांनी शतके झळकावत पहिला डाव सावरला आणि दिवसअखेर यजमान संघाला सन्मानजनक धावसंख्याही गाठून दिली.

वेस्ट इज बेस्ट
’ पश्चिम विभागाने देवधर करंडक नवव्यांदा जिंकला ’ पूर्व विभागावर २१८ धावांनी विजय ’ जाफरचे तडफदार शतक
कटक, १८ मार्च/ पीटीआय
पश्चिम विभागाने लौकिकाला साजेसा खेळ करीत देवधर क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पूर्व विभागाचा २१८ धावांनी दणदणीत पराभव केला आणि ‘वेस्ट इज बेस्ट’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कर्णधार वसीम जाफरच्या तडफदार शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने नवव्यांदा देवधर करंडक पटकाविला. पहिल्यांदाच कर्णधारपद भूषविणाऱ्या जाफरने रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी आणि आत्ता देवधर करंडक पटकावित अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.

तिसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रलियाचे पारडे जड
केप टाऊन, १८ मार्च/ पीटीआय

विश्वविजेता ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढय़ संघ उद्या (१९ मार्च) तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात झुंजणार आहेत. पहिल्या दोन्ही कसोटीत विजय संपादन केल्याने अर्थातच ऑसी संघाचे पारडे जड आहे. त्यात खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या समस्येने आफ्रिका संघ त्रस्त आहे. दरबानच्या पराभवानंतर मेकॅन्झी, मॉर्कल यांना आफ्रिका संघातून डच्चू देण्यात आला आहे, तर स्मिथला दुखापतींमुळे मैदानाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक बळी मिळवणारा मिशेल जॉन्सनने आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते. सकाळच्या सत्रात गोलंदाजी करायला मिळाल्यास मिशेल नक्की जादू दाखवेल असा कांगारुंना विश्वास आहे.

नदाल, जोकोवीच यांची आगेकूच
इंडियाना वेल्स, १८ मार्च/पीटीआय

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित रॅफेल नदाल व गतविजेता नोव्हाक जोकोवीच यांनी बीएनपी पारिबस इंडियाना वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीकडे वाटचाल केली.
नदाल याने रशियाच्या दिमित्री तुर्सुनोव्ह याच्यावर ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये मात केली. त्या तुलनेत तृतीय मानांकित जोकोवीच याला जर्मनीच्या टॉमी हास याच्यावर ६-२, ७-६ (७-१) विजय मिळविताना चिवट लढत द्यावी लागली.

अ‍ॅलेक्झांड्रिया स्पर्धेत राहुल आवारेला सुवर्ण
पुणे, १८ मार्च/प्रतिनिधी

कैरो (इजिप्त) येथे आयोजित करण्यात आलेल्या इब्राहिम अ‍ॅलेक्झांड्रिया चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या राहुल आवारे याने ५५ किलोगटात सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत त्याने विजेतेपद मिळविताना डेन्मार्क, जॉर्जिया व इजिप्तच्या मल्लांवर आकर्षक विजय मिळविला.

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेस उद्यापासून मुंबईत
मुंबई, १८ मार्च/क्री.प्र.
शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे तृतीय महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम अजिंक्यपद स्पर्धा मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने २० ते २२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
मानांकने- पुरुष एकेरी (८८० प्रवेशिका) १) संजय मांडे (ठाणे), २) अनिल मुंडे (पुणे), ३) विलास दळवी (मुंबई उपनगर), ४) वसंत वैराळ (पुणे), ५) पंकज पवार (मुंबई), ६) महमंद ओवेस (मुंबई उपनगर), ७) रियाझ अकबर अली (रत्नागिरी), ८) योगेश परदेशी (पुणे)
महिला एकेरी (१०८ प्रवेशिका) १) संगीता चांदोरकर (मुंबई), २) ऊर्मिला शेंडगे (मुंबई), ३) शिल्पा पळनीटकर (मुंबई), ४) आयेशा मोहम्मद (मुंबई उपनगर), ५) आसावरी जाधव (मुंबई), ६) अंजली संगम (मुंबई), ७) मीनल लेले (ठाणे), ८) स्नेहा मोरे (मुंबई)
या प्रतिष्ठित कॅरम स्पर्धेचे उद्घाटन २० मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता माजी कसोटी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर, माजी क्रिकेट पंच माधव गोठस्कर व अभिनेता अतुल परचुरे यांच्या हस्ते होणार आहे.

आयपीएलच्या सुरक्षा व्यवस्थेचा श्रीलंका आढावा घेणार
कोलंबो, १८ मार्च / पीटीआय

दुधाने तोंड पोळलं की ताकदेखील फुंकून पिले जाते.. लाहोर हल्ल्यामुळे हादरलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघाची अवस्थाही काहीशी अशीच झाली आहे.. आता आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये श्रीलंकेचे क्रिकेटपटू खेळणार आहेत.. पण त्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्ड भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष डी. एस. डि’सिल्व्हा यांनी आज सांगितले की, महेला जयवर्धने, डावखुरा वेगवान गोलंदाज चामिंदा वास, फिरकीपटू अजंठा मेंडिस, मुथय्या मुरलीधरन आणि कुमार संगकारा आयपीएल कि्रेकेट स्पध्रेत विविध फ्रेंचायझींकडून उतरणार आहेत. परंतु भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेतल्यावरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

आयपीएलच्या सामन्यांसाठी धर्मशाला सज्ज
नवी दिल्ली, १८ मार्च / पीटीआय
इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातील काही सामन्यांचे यजमानपद मिळालेले हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे धर्मशाला स्टेडियम या मुकाबल्यांसाठी सज्ज झाले आहे. पर्वतराजींवर वसलेल्या धर्मशाला स्टेडियमवर १५ एप्रिलपासून आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवेल.
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून विद्युत प्रकाशझोताची व्यवस्थाही येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली.

बांगलादेश दौराभारतामुळे गोत्यात; पाकिस्तानचा आरोप
कराची, १८ मार्च/ पीटीआय

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा पुढे ढकलण्यासाठी यजमान देशावर भारतानेच दबाव आणला, असा सनसनाटी आरोप पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष व निवृत्त ले.जनरल तौकिर झिया यांनी केला आहे. येत्या सात मार्चपासून पाकिस्तान- बांगलादेश क्रिकेट स्पर्धा बांगलादेशात होणार होत्या. यजमान देशावर नक्की कोणी दबाव आणला हे आता सांगता येणार नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. मात्र २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे, तसेच दडपशाहीचे धोरण भारताने सुरु केले, असेही आरोप त्यांनी केले