Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दैव बलवत्तर, पण..
६ बाद ६०वरून न्यूझीलंडने उभारल्या २७९ धावा
डॅनियल व्हेटोरी, जेसी रायडर यांची झुंजार शतके
सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
द्रविडची मार्क वॉच्या झेलांच्या विक्रमाशी बरोबरी
भारत बिनबाद २९
हॅमिल्टन, १८ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडचा खुर्दा उडवून पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची नामी संधी आज पहिल्या दिवसाच्या खेळात भारताच्या हातून सुटली. भारताने न्यूझीलंडची एकवेळेस ६ बाद ६० अशी नाजूक अवस्था केली होती. पण मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेत कर्णधार डॅनियल व्हेटोरी आणि जेसी रायडर यांनी शतके झळकावत पहिला डाव सावरला आणि दिवसअखेर यजमान संघाला सन्मानजनक धावसंख्याही गाठून दिली.
प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या न्यूझीलंडची आघाडीची फळी पहिल्याच सत्रात नाटय़मयरीत्या

 

कोसळली. मात्र, त्यानंतर व्हेटोरी (११८) आणि रायडर (१०२) यांनी धीरोदत्त फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी केलेल्या १८६ धावांच्या दमदार भागीदारीमुळेच न्यूझीलंडला पहिल्या दिवशी २७९ धावांची मजल मारता आली. सेडन पार्कवर आजपासून सुरू झालेल्या या कसोटीत कर्णधार व्हेटोरीने कारकीर्दीतले तिसरे तर जेसी रायडरने नैसर्गिक फलंदाजीला अजिबात मुरड न घालता पहिलेच कसोटी शतक साजरे केले.
दरम्यान, या शतकवीरांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीने बर्ट सटक्लिफ आणि ब्रुस टेलर यांनी कोलकाता येथे १९६४-६५ मध्ये भारताविरुद्ध केलेल्या भागीदारीचा विक्रमही मोडला गेला. झहीर खान आणि इशांत शर्माने एकापाठोपाठ जबर धक्के दिल्यानंतरही न्यूझीलंडला डाव सावरण्याची संधी दिल्यामुळे भारतीयांची मात्र आज घोर निराशा झाली. दिवसअखेर भारताने बिनबाद २९ धावा काढल्या होत्या. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग २२ तर त्याचा दिल्लीकर सलामीचा डावखुरा साथीदार गौतम गंभीर ६ धावांवर नाबाद होता.
भारतीय संघाने सुरुवातीला दिलेल्या एकापाठोपाठ धक्क्यांप्रमाणेच न्यूझीलंडचे शेपूटही झटपट गुंडाळले. पण व्हेटोरी व रायडर या डावखुऱ्या जोडीने दमदार भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांवर जोरदार प्रतिआक्रमण केले. व्हेटोरीने आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा रायडर दुसऱ्या बाजूने त्याला शांतपणे साथ देत होता. पण त्याच्यासोबत जोडी जमताच रायडरनेही भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान, भारतीय गोलंदाजीतील धार काहीशी कमी झाल्यासारखे वाटत होते. पण त्यांचे उडालेले काही झेल स्लिप व गलीच्या क्षेत्ररक्षकांमधून सीमापार झाले. व्हेटोरीने १४ चौकार व २ षटकारांनी तर रायडरने १४ चौकारांनी शतकी खेळी सजवली.
त्याआधी, झहीर खानने न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मार्टिन गुप्तीलला झहीरने तिसऱ्या स्लिपमध्ये राहुल द्रविडकडे झेल देण्यास भाग पाडले. हा झेल घेत राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाचा निवृत्त क्रिकेटपटू मार्क वॉ याच्या १८१ कसोटी झेलांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर धोनीने डॅनियल फ्लिनचा डाव्या बाजूला झेपावत उत्तम झेल टिपला. त्याच षटकात झहीरला २०० कसोटी बळी पूर्ण करण्याची नामी संधी होती. पण सेहवागला त्याच्या गोलंदाजीत रॉस टेलरचा झेल टिपण्यात गलीमध्ये अपयश आले. मात्र, टेलरला या संधीचा इशांत शर्माने फायदा घेऊ दिला नाही. त्यानंतर इशांतने टीम मॅकिन्तोश आणि जेम्स फ्रँकलीन यांना फारकाळ तग धरू दिला नाही. लक्ष्मीपती बालाजीच्या जागी पसंती देण्यात आलेल्या मुनाफ पटेलने ब्रेंडन मॅक्युलमला एका अप्रतिमपणे स्विंग झालेल्या चेंडूवर दुसऱ्या स्लिपमध्ये लक्ष्मणकडे झेल देण्यास भाग पाडले. सलामीला आलेला मार्टिन गप्तील पदार्पणाच्या सामन्यात आत्मविश्वासाने खेळत होता. त्याने इशांत शर्माला काही ड्राइव्ह आणि पूलचे फटके सहज मारले. परंतु, झहीरच्या एका अप्रतिम चेंडूवर द्रविडतर्फे स्लिपमध्ये झेलबाद केले. ७३ धावांच्या मोबदल्यात चार बळी मिळवणारा इशांत शर्मा यशस्वी गोलंदाज ठरला तर उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या झहीर खान आणि मुनाफ पटेलने अनुक्रमे ७० व ६० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी दोन बळी मिळवले. पहिल्या सत्रात घडलेल्या नाटय़मय पडझडीनंतर व्हेटोरी व रायडरने दमदार भागीदारी करत न्यूझीलंडचा सावरलेला डाव, हेच अखेर आजच्या खेळाचे वैशिष्टय़
ठरले.

न्यूझीलंड (पहिला डाव) : टीम मॅकिन्तोश झे. सेहवाग गो. इशांत शर्मा १२, मार्टिन गप्तील झे. द्रविड गो. झहीर खान १४, डॅनियल फ्लिन झे. धोनी गो. झहीर खान ०, रॉस टेलर त्रि. गो. इशांत शर्मा १८, जेसी रायडर झे. लक्ष्मण गो. मुनाफ पटेल १०२, जेम्स फ्रँकलीन झे. धोनी गो. इशांत शर्मा ०, ब्रेंडन मक्युलम झे. लक्ष्मण गो. मुनाफ पटेल ३, डॅनियल व्हेटोरी झे. धोनी गो. मुनाफ पटेल ११८, कायले मिल्स त्रि. गो. पटेल ०, इयन ओब्रायन यष्टिचित धोनी गो. हरभजन सिंग ८, ख्रिस मार्टिन नाबाद ०. अवांतर (लेगबाईज १, नोबॉल ३) ४. एकूण ७८.२ षटकात सर्वबाद २७९.
बाद क्रम : १-१७, २-१७, ३-४०, ४-५१, ५-५१, ६-६०, ७-२४६, ८-२४६, ९-२७५.
गोलंदाजी : झहीर खान १६-३-७०-२, इशांत शर्मा १९.२-४-७३-४, मुनाफ पटेल १८-४-६०-३, हरभजन सिंग २२-७-५७-१, वीरेंद्र सेहवाग ३-०-१८-०.
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर खेळत आहे ६, वीरेंद्र सेहवाग खेळत आहे २२. अवांतर (बाईज १) १. एकूण ७ षटकात बिनबाद २९.
गोलंदाजी : ख्रिस मार्टिन ४-१-९-०, कायले मिल्स २-०-१८-०, इयन ओ’ब्रायन १-०-१-०. ल्ल