Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

डोंबिवलीचा खाडीकिनारा रेती व्यावसायिकांना आंदण
ठाणे प्रतिनिधी

रेती उपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी डोंबिवलीजवळील खाडीकिनारपट्टी अक्षरश: पोखरून काढली असून, त्यामुळे खाडी पात्रच बदलून गेले आहे. पात्रातील रेती उपसून समाधान न झालेल्या रेतीवाल्यांनी आता आपला मोर्चा त्यालगतच्या तिवरांच्या झुडपांकडे वळविला असून, थेट रेल्वेमार्गापर्यंतची जमीन जेसीबी यंत्रांनी पोखरण्यापर्यंत या व्यावसायिकांची मजल गेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागातील ही घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर अतिवृष्टीच्या काळात कोपर रोड स्थानक परिसरात विस्तारणाऱ्या नव्या डोंबिवलीचा बराच भाग पाण्याखाली येईलच, शिवाय मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे दरम्यानची वाहतूकही वारंवार विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सॅटिसच्या ठेकेदारावर ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा
ठाणे/प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या परीक्षार्थीना होणाऱ्या त्रासाकडे कानाडोळा करीत आणि सर्व नियमांना पायदळी तुडवित एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रात्रभर गर्डर बनविण्याचे काम करीत असते. नागरिकांच्या तक्रारीवरून ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी सॅटिस प्रकल्पाच्या ठेकेदारावर अखेर ध्वनिप्रदूषणांतर्गत गुन्हा नोंदवून कासारवडवली पोलिसांनी चार कामगारांसह त्यांचे सामान जप्त केले. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस प्रकल्पाचे काम एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ढिसाळ कारभार आणि सल्लागाराच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रेंगाळला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे गर्डर कासारवडवली नाक्यावरील पारिजात गार्डन गृहसंकुलाला लागून असलेल्या जमिनीवर बनविले जातात. हे काम रात्रंदिवस सुरू असून त्यांच्या मशिनच्या आवाजाने गेल्या दीड वर्षांपासून नागरिक हैराण झाले आहेत.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लघुउद्योजकांचा जाहीरनामा
ठाणे/प्रतिनिधी

देशभरातील लघुउद्योगांचे आर्थिक मंदीमुळे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लघुउद्योग क्षेत्राचे महत्त्व ओळखून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी या क्षेत्राच्या विकासाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करून चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिआ) या देशपातळीवरील संघटनेने आपल्या मागण्यांचा जाहीरनामा आज प्रकाशित केला.

अवैध प्रवासी वाहतुकीचा टीएमटीला फटका
ठाणे/प्रतिनिधी

घोडबंदर रोडवरील हौसिंग सोसायटय़ांची असलेली खाजगी बसवाहतूक तसेच काही कंपनीच्या बसेसनी चालवलेल्या चोरटय़ा प्रवासी वाहतुकीचा फटका टीएमटी व बेस्टला बसत आहे. टीएमटी, बेस्टच्या तिकिटापेक्षा एक-दोन रुपये कमी भाडे आकारून या खाजगी बस प्रवासी वाहतूक करीत आहेत. घोडबंदर रोड परिसरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. बऱ्याचशा सोसायट्यांनी त्यांची स्वतंत्र बस सेवा ठाणे स्टेशनपर्यंत सुरू ठेवली आहे. खाजगी बसेस स्टेशनला जाता-येता बाहेरचे प्रवासी घेतात.

आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
भिवंडी/वार्ताहर

खून प्रकरणाला अपघाताचे वळण देऊन आरोपीस मदत केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह मयताच्या मित्रावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लोकमान्य नगर ठाणे येथे राहणारा सचिन मनोहर रासम व संदीप पाटील आणि अमोल रतिलाल पाटील (रा. पूर्णा) तसेच विक्रांत मोतीराम भोई (रा. कोपरी, ठाणे) हे ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पार्टी आटोपून घरी जात असताना पूर्णा गावच्या हद्दीतील जागरण वजन काटय़ासमोर सचिन व संदीप यांच्या मोटारसायकलला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही ठार झाले.

‘नववर्ष स्वागतयात्रा म्हणजे वर्गणी मागण्याचे दुकान’
कल्याण/वार्ताहर

स्वागतयात्रेच्या नावाने वर्गणी गोळा करण्यासाठी एक नवीन दुकान कल्याण संस्कृती मंचातर्फे सुरू झाल्याने शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये कल्याण सांस्कृतिक मंचविषयी नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. कल्याण संस्कृती मंचतर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षांचे स्वागत करण्यासाठी एका यात्रेचे आयोजन करत होते. आता या यात्रेचा खर्च परवडत नाही म्हणून स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्षपदासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते, जे परत दिले जात नाही असे बोलले जाते.

रिक्षाचालकांच्या मनमानीविरुद्ध ग्राहक संरक्षण केंद्राची तक्रार
ठाणे/प्रतिनिधी

कल्याण शहरात विविध मार्गावर चालविली जाणारी ऑटो रिक्षा सेवा ग्राहकांवर अन्याय करणारी असल्याची भूमिका घेत तेथील ग्राहक संरक्षण केंद्राने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात तक्रार केली आहे. मीटर पद्धतीने रिक्षा न चालविणे, मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार परवानगी नसताना मोठय़ा प्रमाणावर भाडे आकारणे, विशिष्ट मार्गावरील भाडे नाकारणे, उद्धट बोलणे, रिक्षा कुठेही पार्क करणे, गणवेश न वापरणे, नवख्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, आदी विविध तक्रारी केंद्राने आरटीओकडे केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा नागरिकांच्या सोयीची नाही. रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी जोपर्यंत परिवहन समितीत आहेत, तोपर्यंत ही सेवा नागरिकांना नीट सुविधा देऊ शकणार नाही, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पेट्रोलचे दर वाढल्यावर एका रात्रीत रिक्षा भाडे वाढविण्यात आले. रिक्षाचालकांकडून सातत्याने होत असणाऱ्या या अन्यायाविषयी नागरिकांनी आपल्या तक्रारी ग्राहक संरक्षण केंद्राकडे नोंदवाव्यात, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क- एन. के. शास्त्री-२२१२७९९, ९९८७४७२१६१.

फी न भरल्याची शिक्षा म्हणून लहान मुले वर्गाबाहेर!
नालासोपारा/वार्ताहर

फी भरली नाही म्हणून पाच ते सात वयोगटातील ३५ मुलांना वर्गाबाहेर काढणाऱ्या जे. बी. लुधियानी स्कूलविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमधील जे. बी. लुधियानी शाळेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणास्तव आज वर्गाबाहेर काढण्यात आले. या लहान मुलांना वर्गाबाहेर काढण्याआधी पालकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती. पालकांनाच एकमेकांकडून ही घटना कळताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. त्याच्यापैकी एक मुलगा शाळेबाहेर उभा राहून थकला आणि तेथून निघाला. त्याचवेळी त्याची आई शाळेत पोहोचली. मात्र तो न दिसल्यामुळे मुख्याध्यापकांकडे चौकशी केली असता त्यांनी तो वर्गात असल्याचे सांगितले. सदर महिलेने वर्गात जाऊन बघितले तेव्हा तो वर्गात किंवा शाळेच्या आवारातही नव्हता. मुख्याध्यापिका नेटो व ट्रस्टी विजय रॉड्रिक्स यांनी या घटनेबाबत पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.