Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
व्यक्तिवेध

अमेरिकेत भारतीय राजदूतपदी मीरा शंकर यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे राजदूत रॉनेन सेन यांची मुदत ३१ मार्च रोजी संपत असून, मीरा शंकर या त्यानंतर लगेचच राजदूतपदाची सूत्रे हाती घेतील. भारत-अमेरिका अणुसहकार्य करार प्रत्यक्षात आणायला ज्यांनी जबरदस्त प्रयत्न केले, ते रॉनेन सेन आपल्या निवृत्तीनंतर भारताकडे परत यायला निघतील. मीरा शंकर सध्या जर्मनीत भारताच्या राजदूत आहेत. मीरा शंकर या विजयालक्ष्मी पंडित यांच्यानंतरच्या अमेरिकेत राजदूतपदी नियुक्त केल्या जाणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. पंडित या १९४९ ते १९५१ या काळात अमेरिकेत राजदूतपदी होत्या. मीरा शंकर यांना अमेरिकेच्या आपल्या वकिलातीत काम करण्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. १९९१ मध्ये सिद्धार्थ शंकर रे अमेरिकेत राजदूत असताना मीरा शंकर त्यांना साहाय्य करीत असत. मीरा शंकर या १९७३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. मीरा शंकर यांनी राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांच्या

 

कार्यालयात काम केले आहे. परराष्ट्र सेवेत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांमध्ये चीनमध्ये सध्या राजदूतपदी असणाऱ्या निरुपमा राव, स्वीडनमध्ये राजदूतपदी काम करणाऱ्या चित्रा नारायणन आणि सध्या जर्मनीत राजदूतपदी असणाऱ्या मीरा शंकर यांची नावे घेतली जातात. या तिघीही राजनैतिक जबाबदाऱ्यांमध्ये आणि निर्णय क्षमतेत अतिशय तडफदार मानल्या जातात. वॉशिंग्टनमध्ये सध्याच्या परिस्थितीत मीरा शंकर यांना काम करायची संधी द्यायचा निर्णय त्यांच्या आजवरच्या कार्यकौशल्यावरूनच घेण्यात आला आहे. यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र सेवेत असणारे के. शंकर वाजपेयी यांनी राजदूतपदावर काम केले होते. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी परराष्ट्र सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यास ती भूमिका बजावायची संधी मिळते आहे. मीरा शंकर यांच्या नियुक्तीचे अमेरिकेत असणाऱ्या मूळच्या भारतीयांकडून तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आशिया विभागात काम करणाऱ्यांकडून स्वागत झाले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमॉक्रॅट बराक ओबामा आहेत आणि परराष्ट्र मंत्रिपदावर भारताशी चांगली मैत्री असणाऱ्या हिलरी क्लिंटन या आहेत. रॉनेन सेन यांनी गेल्या वर्षी मार्चमध्येच आपल्या निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता, पण तेव्हा भारत-अमेरिका अणुऊर्जा करारावर बोलणी चालू असल्याने त्यांना थांबण्यास सांगण्यात आले होते. मीरा शंकर यांची मुदतही ऑक्टोबर २०१० मध्ये संपणार आहे. त्या वेळी त्यांना मुदतवाढ द्यायची, की आणखी काही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवायची याचा निर्णय घेतला जाईल. वॉशिंग्टनमध्ये त्यांनी यापूर्वी दहशतवाद विरोधी उपाययोजनांबाबत महत्त्वाच्या देशांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली आहे. ही चर्चा यशस्वीरीत्या पार पाडूनच त्या बर्लिनला गेल्या. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदेच्या (सार्क) काही महत्त्वपूर्ण बैठकांना हजर राहणाऱ्या शिष्टमंडळातही त्यांची यापूर्वी निवड करण्यात आली होती. मीरा शंकर यांचे इंग्रजीबरोबरच जर्मन भाषेवर प्रभुत्व आहे. परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी सहाय्यक सचिवपदावर काम केले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ, अण्वस्त्रप्रसारबंदी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा या महत्त्वाच्या विभागांमध्येही त्यांनी काम केले आहे. बर्लिनची भिंत पडल्यानंतर त्या बर्लिनमध्ये गेल्या होत्या. तेव्हाचे बर्लिन आणि जर्मनीची आता राजधानी बनलेले बर्लिन यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे आणि या अशा युरोपीय समूहाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या शहरात आपल्याला काम करायला मिळाले आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करायची संधी आपल्याला मिळाली असल्याचे त्या मानतात. अमेरिकेत होणारे त्यांचे प्रयाण हाच उद्देश डोळय़ांसमोर ठेवून होत आहे, हे सगळय़ात महत्त्वाचे आहे.