Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

विविध पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश असलेले बनियान, पॉलिथीनच्या पिशव्या बाजारात आल्या आहेत.

अमरावती जिल्ह्य़ात पाणी पेटले
अमरावती, १८ मार्च / प्रतिनिधी

नांदगावात १२ दिवसाआड पुरवठा
विहिरी व तलाव आटले
अमरावती जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकारणही सुरू झाले आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना नागरिकांमध्ये रोष पसरलेला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली नांदगावात रास्ता रोको करण्यात आले.

एड्सग्रस्त शिक्षकाला नोकरीतून काढले
चंद्रपूर, १८ मार्च/ प्रतिनिधी

एड्सची लागण झाली म्हणून एका शिक्षकाला नोकरीतून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला. अंबुजा उद्योग समूहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कारखाना परिसरातच अंबुजा विद्या निकेतन ही शाळा सुरू आहे. या शाळेतील एका शिक्षकाला गेल्या वर्षी एड्स या रोगाची लागण झाल्याचे लक्षात आले. हा रोग प्रारंभिक अवस्थेत आहे हे लक्षात आल्यानंतर शिक्षकाने उपचार घेणे सुरू केले.

पूर्व विदर्भातून यंदा काँग्रेस तेली समाजाला जागा देईल?
ठरावाचे स्मरण करून देत इच्छुकांचा श्रेष्ठींना सवाल

वर्धा, १८ मार्च / प्रतिनिधी

पूर्व विदर्भातील लोकसभेची किमान एक जागा तेली समाजास देण्याचा अ.भा. काँग्रेस समितीचा ठराव यावेळी तरी अंमलात येणार काय, असा प्रश्न समाजातील इच्छुक नेते करीत आहेत.
विदर्भात चंद्रपूर, वर्धा, रामटेक, भंडारा व नागपूर या जिल्ह्य़ांमध्ये तेली समाजाच्या मतांची संख्या लक्षणीय आहे. सर्व प्रमुख पक्षांचा या मतांवर डोळा असतो. या पाश्र्वभूमीवर माजी कें द्रीय मंत्री वसंत साठे यांनी त्यांचा राजकीय दबदबा असतांना पूर्व विदर्भातील लोकसभेची एक जागा पक्षाने तेली समाजास देण्याचा ठरावच अ.भा.कॉग्रेस समितीत मंजूर करवून घेतला होता.

ताईंच्या इच्छेमुळे भयांचा जीव टांगणीला!
पहिल्या यादीत नाव नसल्याने अहीर-समर्थकांमध्ये चिंता

चंद्रपूर, १८ मार्च/प्रतिनिधी

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत येथील उमेदवाराचे नाव नसल्याने लढण्याची तयारी केलेल्या हंसराज अहीर यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचा सूर उमटला आहे. शोभाताईंच्या इच्छेमुळे हंसराजभैयांना आणखी किती दिवस वाट बघावी लागणार, असा प्रश्न हे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहीर यांनी भाजपकडून लढतांना ६० हजार मतांनी विजय मिळवला होता.

साहेब जरा जपून..
शरद पवार ‘साहेबांना’ पंतप्रधान होण्याची फार घाई झाली आहे. पवारांनी हे स्वप्न १९९१ पासून उराशी बाळगले आहे. दीड तप उलटून गेले तरी त्यांचे हे सोनेरी स्वप्न पूर्ण झाले नाही. पंधरावी लोकसभा ही त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या अपेक्षेची पाचवी खेप आहे, पण अजूनही पूर्तता दृष्टीच्या टप्प्यात नाही! साहेब तसे राजकीय खेळियाडच. त्यांचे कौतुक व अभिनंदन यासाठी की ते एवढय़ा बलाढय़ काँग्रेसला खेळवतात. उंटाचा मुका घेण्याचा त्यांचा द्राविडी प्राणायाम राजकारणातली सर्कसच मानावी लागेल. हे करताना साहेब तिकडे ‘तिसऱ्या’ आघाडीला बळ देतात. मध्येच शिवसेनेला गोंजारतात. भाजपला अडचणीत आणतात. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असा गळा काढतात. आता मराठी माणूस पंतप्रधान करायचा म्हणजे महाराष्ट्रातून तसा लायक माणूस द्यावा लागेल, आणि तसा लायक दुसरा कोणीच दिसत नसल्याने केवळ उरतात ते फक्त शरद पवारच. शक्कल नामी आहे, पण साहेब, कसरत अंगाशी आली नाही म्हणजे कमावले!

यवतमाळ जिल्ह्य़ातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू झाल्या नाहीत
यवतमाळ, १८ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवानंद पवार यांच्या निर्णयाची अखेर अंमलबजावणीच झाली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा साधारणत: उन्हाळ्यात २० मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू होत असतात पण, शिक्षण सभापतींनी घाई करून १६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला पण ‘सकाळच्या सत्रा’चा निर्णय शाळांना वेळेवर पोहचेल याची काळजी मात्र घेतली नाही. परिणामत: जिल्ह्य़ातील अनेक शाळा सोमवारी सकाळच्या सत्रात सुरू झाल्या नाहीत. त्या नेहमीप्रमाणे दुपारच्या सत्रात सुरू राहिल्या. गेल्या १३ मार्चला घेतलेला निर्णय १६ मार्चपर्यंतही केंद्र प्रमुखांना पोहचला नाही. पाणी टंचाई, वाढते तापमान आणि दुष्काळ सदृश्य स्थिती यामुळे २० मार्चऐवजी १६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा युक्तिवाद करण्यात आला, हेही येथे उल्लेखनीय आहे.

बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे शेगावात अधिवेशन
बुलढाणा, १८ मार्च / प्रतिनिधी

बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे जिल्हा अधिवेशन येत्या रविवारी २२ मार्च ०९ रोजी शेगाव येथील गजानन दादा मार्केट यार्डात आयोजित करण्यात आल्याचे बहुभाषिक संघाचे ज्येष्ठ नेते राजकुमार शर्मा यांनी सांगितले. बुलढाणा बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे पहिलेच अधिवेशन शेगाव येथे होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर राहणार असून उद्घाटक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप सानंदा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिव पी.वाय. कुळकर्णी, आमदार गोवर्धन शर्मा, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया, पेशवा युवा मंचचे अध्यक्ष दीपक नवनवरे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मराठी ब्राह्मण व बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याने बुलढाणा जिल्ह्य़ातील सर्व बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन राजकुमार शर्मा, नरेश देशपांडे, मोहनलाल शर्मा, संजय डोरले, अशोक व्यास, श्यामलाल टिकनायत यांनी केले आहे.

प्रतिरक्षा भांडार मजदूर संघाची कार्यकारिणी
पुलगाव, १८ मार्च / वार्ताहर

भारतीय मजदूर संघाचे वयोवृद्ध खंदे कार्यकर्ते रामभाऊ बोराटणे यांच्या अध्यक्षतेखाली लुकत्याच झालेल्या सभेत भारतीय प्रतिरक्षा भांडार मजदूर संघाची २००९-२०१० ची कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष- कल्याण लाकडे, महामंत्री- सुधाकर राजुरकर, उपाध्यक्ष- अशोक डोर्लीकर, अशोक चुन्न् आहेत. कोषाध्यक्ष- दत्ता पाटोळे, संघटन मंत्री- मोहन केशरवाणी, सहसचिव- वसंत वर्भे, दीपक काळे, अंकुश देशमुख, दिगंबर तडस यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

सिरसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध
वडनेर, १८ मार्च / वार्ताहर

सिरसगाव (बाजार) येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.
तंटामुक्त ग्राम पुरस्काराने सन्मानित झालेल्या सिरसगाव येथे शिवसेनेचे शेखर बिडवाईक, काँग्रेसचे काशीराव पाटील मंगेकर, नारायण सेलकर यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली. वॉर्ड क्रं. १ मध्ये राजेश मंगेकर, राहुल पोहाणे, कला राडे, वॉर्ड क्रं. २ मध्ये अशोक सेलकर, भास्कर तडस, प्रतिभा चांदेकर, वॉर्ड क्रं. ३ मध्ये किसना कुमरे, महादेव येरकाडे, कांता वैद्य यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

शिक्षक संघाचे २१ मार्चला धरणे
भंडारा, १८ मार्च / वार्ताहर

राज्य शासनाने शिक्षकांकरिता स्वतंत्र वेतन आयोग शिफारशी लागू न करता केंद्राप्रमाणे वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी शनिवार २१ मार्चला शिक्षक संघटनेच्यावतीने येथे धरणे धरण्यात येणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरिता निवृत्त सनदी अधिकारी पी.एम.ए. हकीम यांच्या राज्य वेतन आयोग सुधारणा समितीचा सादर केलेला अहवाल महाराष्ट्र शासनाने मंजूर केला २७ फेब्रुवारी २००९ ला तसे आदेश निर्गमित करून कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्या सुधारण्याकरिता राज्य शासनाकडून स्वतंत्र वेतन आयोग नियुक्त न करता केंद्र शासन जेव्हा जेव्हा वेतन आयोग नियुक्त करेल, त्या सर्व शिफारशी राज्याला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला शासनाने मूठमाती दिली आहे.

शिक्षण सभापतींच्या निर्णयाची ‘फटफजिती’
शाळा सकाळच्या सत्रात सुरू झाल्या नाहीत
यवतमाळ, १८ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवानंद पवार यांच्या निर्णयाची अखेर अंमलबजावणीच झाली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा साधारणत: उन्हाळ्यात २० मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू होत असतात पण, शिक्षण सभापतींनी घाई करून १६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला पण ‘सकाळच्या सत्रा’चा निर्णय शाळांना वेळेवर पोहचेल याची काळजी मात्र घेतली नाही. परिणामत: जिल्ह्य़ातील अनेक शाळा सोमवारी सकाळच्या सत्रात सुरू झाल्या नाहीत. त्या नेहमीप्रमाणे दुपारच्या सत्रात सुरू राहिल्या. गेल्या १३ मार्चला घेतलेला निर्णय १६ मार्चपर्यंतही केंद्र प्रमुखांना पोहचला नाही. पाणी टंचाई, वाढते तापमान आणि दुष्काळ सदृश्य स्थिती यामुळे २० मार्चऐवजी १६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा युक्तिवाद करण्यात आला, हेही येथे उल्लेखनीय आहे.