Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
रमेश : काल काय मायलेकींचं एवढं हितगुज चाललं होतं रात्रभर?
रेखा : काही नाही हो! लग्न जसजसं जवळ येतंय ना, तशी जरा कावरीबावरी झाली होती पोर.
रमेश : हो गं, गेले दोन दिवस चेहराही उतरल्यासारखाच वाटतोय. मी विचारलंही तिला. पण बोलली नाही काही आणि तुझ्याजवळ रात्रभर बोलत बसली होती होय.
रेखा : मुलीचा बापाकडे ओढा असतो, हे खरं असलं ना तरी शेवटी अशा वेळेला आईच लागते.
रमेश : मला तर रश्मीचं लग्न ही कल्पनाच अजून सहन होत नाहीये. लहान लहान म्हणता म्हणता लग्नाला आली.
राहुल : बाबा, तुमच्या डोळ्यांत पाणी? एवढय़ा तेवढय़ावरून डोळ्यातून पाणी काढते, म्हणून तुम्ही आई-आजीला चिडवता
 
आणि आज तुमच्या डोळ्यांत पाणी?
रमेश : ते तुला बाप झाल्याशिवाय नाही कळणार! आणि तेही मुलीचं लग्न ठरलं की अजूनच जाणवेल. आणि बच्चमजी, माझ्या डोळ्यांतल्या पाण्यावर जाताय, पण तुम्हीही जरा गप्प गप्पच आहात.
राहुल : तेही आहेच म्हणा. रश्मीचं लग्न जसजसं जवळ येतंय ना, तसतशी अस्वस्थता वाढतेच आहे. हल्ली तिच्याशी भांडावंसंही वाटत नाही.
रेखा : अरे, आपलं माणूस आपल्या जवळ असतं ना, तेव्हाच भांडायला काही वाटत नाही. लटकी भांडणं, रुसवे-फुगवे यांनी नात्याची वीण घट्ट होते. अगदी आता आतापर्यंत काय भांडायचात ग बाई! भांडणं सोडवता सोडवता नाकी नऊ यायचे.
राहुल : अगं, भांडण झालं की, रश्मी अशी मस्त चिडते ना की, अजून चिडवायला मजा येते. पण लग्न ठरल्यापासून बघतोय, रश्मी काहीशी बदलूनच गेलीय. भांडायला लागलं की, चेहराच पाडते. परवा तर मला म्हणाली, अरे, मी काही दिवसांचीच सोबती आहे. आता तरी नको ना भांडूस.’ बाप रे, तिचे ते शब्द ऐकले आणि माझे शब्द तोंडातल्या तोंडातच गोठले.
रमेश : हळवी आहे रे रश्मी आपली. आणि भाबडीसुद्धा. पण मैत्रेय छान सांभाळेल तिला.
राहुल : ओ येस, साला एकदम मस्त आहे.
रेखा : राहुल..
राहुल : साला. येस. शिवी नाही ग. साला.. साला.. मेव्हणा.. जिजाजी कळलं! बघा, मैत्रेयचं नाव काढल्याबरोबर बहिणाबाई उठून आल्या.
रमेश : ये रश्मी. झोप व्यवस्थित लागली का काल!
रश्मी : हो.
राहुल : हो काय! चेहरा बघ आरशात. चेहरा टोपसलाय. डोळे लाल दिसताहेत. तो मैत्रेय म्हणेल, मला दाखवली एक मुलगी आणि लग्न दुसऱ्याच मुलीशी करून दिलं म्हणून. ूेी ल्ल ूँी१ ४स्र् २्र२!
रमेश : हो नं रश्मी. अगं, काय अवस्था करून घेतली आहेस ! नववधू नां तू! नववधूनं कसं दिसलं पाहिजे? रश्मी, अगं मी काय सांगतोय आणि परत तुझ्या डोळ्यात पाणी? यावरून आमच्या लग्नातली एक गंमत सांगतो.
रेखा : पुरे हो! किती वेळा उगाळाल ते!
राहुल : सांगा ना बाबा. सांगा ना. काय झालं होतं?
रमेश : रश्मी ऐक. अगं, आमच्या लग्नाच्या वेळेला तुझ्या आईशी माझी पैज लागली होती.
रश्मी : पैज? ती कसली?
रमेश : रेखा म्हणाली, मी अजिबात रडणार नाही आणि मी तिला म्हणालो, तू नक्की रडणार.
राहुल : मग आई पैज हरली असेल ना!
रमेश : हे काय सांगायला हवं? अरे, रेखाचं सोड, पण माझी आईही रडत होती.
रश्मी : अय्या, आजी पण रडत होती? ती कशाला?
रमेश : अगं, तीच तर गंमत आहे. तिला रडतांना बघून दादा आणि अप्पाला चेवच चढला. दादा म्हणाला, आई रडतेय कारण तिला भीती वाटतेय, आता आपलं कसं होणार? तर अप्पा म्हणाला, नाही नाही, तिला भीती वाटतेय आपल्या मुलाचं कसं होणार? त्यावर आजोबा म्हणाले, तुम्हाला बहीण नाही म्हणून ती रडून घेतेय. प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगत आजीला चिडवायला लागला. मग काय, आई आणि रेखा दोघीही रडताहेत आणि बाकी सगळे चिडवताहेत.. असा मजेशीर गोंधळ चालला होता.
रेखा : तर काय! अगं, दादाभावजी आणि अप्पा भावजींचा स्वभाव मुळातच चेष्टेखोर, या तिघांना सासूबाईंनी कसं वाढवलं कुणास ठाऊक? सून घरात येतांना रडणारी सासू, यावरून दोघांनी असा काही हल्लागुल्ला केला ना की, घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं.
रमेश : मुद्दामच केलं त्या दोघांनी. नव्या नवरीनं असा रडत रडत गृहप्रवेश करू नये, यावर आमचं अगदी एकमत होतं. त्यात आईनं डोळ्यांत पाणी आणून माकडांच्या हाती कोलीतच दिलं. दोघांनी हल्लागुल्ला करून माहौल असा काही बदलून टाकला की, आई आणि रेखा रडायचं विसरून कधी हसायला लागल्या कळलंच नाही.
राहुल : दादाकाका आणि अप्पाकाका अजिबात बदलले नाहीयेत अजून. परवाच मला फोनवर सांगत होते फेटेवाला शोधून ठेव म्हणून.
रेखा : फेटेवाला? तो कशाला?
राहुल : अगं, सगळ्या पुरुषांनी फेटे बांधायचे, धोतर नेसायचं, असा फतवा काढलाय दोघांनी. त्यांचं म्हणणं, फॅशनची मक्तेदारी फक्त बायकांकडेच कशाला?
रमेश : अगं, दोघांनी काय काय प्लॅन्स केलेत. आपल्या पिढीच्या मुलांमध्ये रश्मीच मोठी. त्यामुळे हे पहिलंच लग्न ना. मग काय, दोघांची जोरदार तयारी चाललीये.
रेखा : करतील बाई! या रेग्यांच्या कडच्या पुरुषमंडळींचं काही सांगता येत नाही.
रमेश : या रेग्यांच्या कडच्या? म्हणजे आपण कोण रेखाताई! पाह्य़लंस राहुल, असं असतं या बायकांचं? इतकी र्वष झाली लग्नाला पण मनानं ही अजून माहेरचीच!
रेखा : हं ऽ ऽ. ते कळायला बायकांचाच जन्म घ्यायला पाहिजे.
राहुल : अरे काय चाललंय काय आज सगळ्यांचं? बाबा म्हणताहेत, बाप झाल्यावर कळेल. आई म्हणतेय, बायकांचाच जन्म घ्यायला पाहिजे. रश्मी म्हणते, मुलगी झाल्याशिवाय नाही कळणार..
रेखा : सगळं कळेल तुला. लग्न झालं की, सगळं कळेल.
रश्मी : आणि अब दिल्ली दूर नही.. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाच आहे.
राहुल : म्हणजे काय? तू जाच सासरी की, ही अशी तिला घेऊन येतो..
रश्मी : म्हणजे मी घरातून जाण्याची वाट बघतो आहेस?
राहुल : यात काही शंका आहे?
रश्मी : राहुल..
राहुल : आई, बघ ना कसा हा दादा! मला चिडवायचं हाच याचा धंदा.. ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंग..
shubhadey@gmail.com