Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
कुंकुमतिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असं मानलं जातं. महाभारतात द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे कृष्णाची सखी राधा देखील कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत. मोहंजदारो-हडाप्पाच्या उत्खननात मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर तर कुंकू रेखाटलेलं दिसतंच, त्याचबरोबर त्यांच्या भांगात सिंदूर देखील दिसतो. तिसऱ्या-चौथ्या शतकापासूनच्या वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात भर्तृहरीच्या शृंगार शतकात तसेच अमरू शतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो.
कुंकुंमं शोभनं सम्य सर्वदा मङ्गलप्रदम्।
दानेनानस्य महत्सौख्य सौभाग्यं स्यात सदा मम।
(कुंकू हे शोभन, रम्य व सर्वदा मंगलप्रद आहे. याच्या दानाने मला महत्सौख्य व सौभाग्य प्राप्त व्हावे.)
(संदर्भ : दानचंद्रिका)
अगदी आजसुद्धा आपल्या संस्कृतीत कुंकूदान महत्त्वपूर्ण मानलं जातं म्हणून तर एरवी जीन्स घालणारी मुलगी वर्षांतून एखाद दुसरं हळदी-कुंकू तरी हमखास करतेच. सौभाग्यचं लेणं मानल्या जाणाऱ्या कुंकवाच्या दानाने अखंड सौभाग्य प्राप्त होतं याला आपल्याकडे प्राचीन मान्यता आहे. कुंकू म्हणजे मुळात केशराचा टिळा, जो फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष देखील लावत असत. कपाळाच्या
 
मधोमध जिथे आपल्या मेंदूकडे पोहोचणाऱ्या महत्त्वाच्या शिरा असतात तिथे हा टिळा लावला जातो. गेल्या ५००० वर्षांपासून.. म्हणजेच जेव्हापासून कुंकू लावण्याची पद्धत अस्तित्वात आली तेव्हापासून याच जागी कुंकूमतिलक लावला जातो. कालपरत्वे केशराची जागा एका विशिष्ट झाडाच्या खोडापासून किंवा सालीपासून बनविल्या गेलेल्या कुंकवानं घेतली.
पुढे कुंकू बनविण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात आल्या. कुंकू बनविण्यासाठी हळदीचा उपयोग केला जाऊ लागला. हळदीमध्ये लिंबासारखं कॅल्शिअम कंपाऊंड वापरून त्यात पाणी किंवा आयोडीन, कापूर वगैरे घालून पेस्ट करून ठेवून दिलं जात असे. त्याला लाल रंग येऊन त्याचा कुंकू म्हणून उपयोग केला जात असे किंवा मग अगरू, चंदन आणि कस्तुरी एकत्र करून देखील कुंकू बनवलं जात असे. कुंकू बनविण्याची आणखी एक पद्धत म्हणजे तांदूळ चिकट आणि लाल होईपर्यंत पाण्यात उकळवला जात असे. हे मिश्रण थंड झाल्यावर घट्ट होत असे. कपाळावर लावताना त्यात पाणी घालून त्याची पेस्ट करून ते लावले जात असे. तर पूर्वी सिंदूर बनविण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या लाल रंगाच्या संगमरवरचा उपयोग केला जात असे. या दगडाच्या चूर्णात हळद आणि तेल घालून ते काही दिवस ठेवून दिले जात असे. त्याचा सिंदूर म्हणून वापर केला जायचा.
अगदी पूर्वापार विचार करायचा झाला तर आपल्याकडे वेदकाळात कुंकुमतिलकाचा उल्लेख नाही. वेदकाळात चित्रक किंवा पत्रकाचा शरीर सजावटीसाठी उपयोग केला जात असे. म्हणजेच पान-फुलं वा रंगानं शरीर मढवणं. कपाळावर फुलांच्या पाकळ्या वा पानानं सजावट केली जात असे, असाही उल्लेख आहे. ठराविक वनस्पतींपासून ठराविक रंग मिळतात हे तर आपल्याला माहिती आहेच. अशाच वनस्पतींचा रस काढून सुकवून त्याची पावडर करून त्या रंगांनी कपाळ रंगवत असत. तो कुमकुम तिलकच असेल असं नाही. पूर्ण कपाळ देखील रंगवलं जात असे. विवाह संस्था अस्तित्वात आली नव्हती, तोपर्यंतची ही पद्धत. पुढे विवाह संस्था अस्तित्वात आली आणि स्त्री विवाहित आहे हे समजण्यासाठी काही तरी चिन्हाची गरज निर्माण झाली तेव्हा सौभाग्यचिन्ह म्हणून कुंकूमतिलक अस्तित्वात आला.
कुंकुमतिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असं मानलं जातं. महाभारतात द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे कृष्णाची सखी राधा देखील कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत. मोहंजदारो-हडाप्पाच्या उत्खननात मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर तर कुंकू रेखाटलेलं दिसतंच, त्याचबरोबर त्यांच्या भांगात सिंदूर देखील दिसतो. तिसऱ्या-चौथ्या शतकापासूनच्या वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात भर्तृहरीच्या शृंगार शतकात तसेच अमरू शतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो.
तिसऱ्या-चौथ्या शतकातल्या अजंठय़ाच्या स्त्री चित्रांमधून क्वचित कुंकूमतिलक दिसतो. विदूर जातक चित्रात इरंधतीच्या कपाळी कुंकवाची टिकली आहे. इथूनच पुढे कुंकवाचा उपयोग जास्त प्रमाणात होऊ लागला. सातव्या-आठव्या शतकातल्या वाङ्मयातल्या उल्लेखावरून हे लक्षात येतं. त्या काळाच्या तंत्रवाङ्मयातही कुंकवाचाउल्लेख आढळतो.
आर्य स्त्रियांनी कुंकू लावण्याची पद्धत आर्येतर स्त्रियांकडून उचलली असल्याचंही म्हटलं जातं. मातृप्रधान आर्येतर संस्कृतीत लाल रंगाला खूपच महत्त्व आहे, तसंच पशुबळीलाही महत्त्व आहे. पशुबळी दिल्यावर त्याच्या रक्ताचा टिळा कपाळावर लावण्याच्या पद्धतीतून आर्येतरांकडे कुंकवाची पद्धत आली असावी, असं म्हटलं जातं.
कुंकू लावण्याची विविध कारणं दिली जातात. कोणी म्हणतं मेष राशीचं स्थान कपाळावर आहे आणि त्याचा रंग लाल आहे म्हणून कुंकूमतिलक केलं जातं. तर काही जणांच्या मते आपल्या शरीरातील सहावे चक्र ‘अग्न’ हे कपाळावर आपण जिथे कुंकू लावतो त्याच ठिकाणी असतं. या चक्राच्या पूजनासाठी कुंकू लावले जाते, अशीही एक समजूत आहे की कुंकू सूर्याचं प्रतीक असून स्त्री हे पृथ्वीचं प्रतीक असतं. सूर्य आणि पृथ्वीच्या मिलनाने पृथ्वी फलित होऊन धन, धान्य, पशू यांची निर्मिती होते. याच प्रतिकात्मक रूपाने स्त्री कपाळी कुंकू धारण करते. अजून एका मान्यतेनुसार हळद हे सोन्याचं प्रतीक मानतात तर कुंकू हे सूर्याचं प्रतीक. सोनं म्हणजे सूर्याचे वीर्य असं मानलं जातं म्हणून हळद-कुंकू धारण करणं म्हणजे निर्मितीक्षम होणं.
आज मात्र कुंकवाकडे फक्त सौभाग्याचं लेणं म्हणूनच नाही तर फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणूनही बघितलं जातं. गेल्या ३०-४० वर्षांचा विचार केला तर आपल्याकडे कुंकू लावण्याच्या पद्धतीत खूप बदल झालेले दिसतात. केशराच्या टिळ्याची जागा ज्या झाडाला स्थानिक भाषेत पिंजरेचं झाड म्हणतात त्या झाडाच्या खोडाच्या सालीपासून, फुलांपासून बनल्या जाणाऱ्या पिंजरेने घेतली. पण पिंजर बनविण्याची ही पद्धत अगदीच थोडय़ा काळासाठी अस्तित्वात होती. त्यानंतर पिंजर म्हणा वा कुंकू वा सिंदूर बनवण्यासाठी केमिकल्सचाच उपयोग होऊ लागला. पिंजर कपाळावर नीट बसावी म्हणून आधी मेणासारखा चिकट पदार्थ लावून त्यावर पिंजर रेखाटली जात असे. पिंजर लावणं कठीण आणि त्याहून ती दिवसभर सांभाळणं कठीण. कालांतराने या पिंजरेची जागा बाटलीतल्या पातळ कुंकवानं घेतली. साधारण १९७० व्या दशकात शृंगार कंपनीचं उभ्या बाटलीत मिळणारं कुंकू सर्वाधिक वापरलं जात असे.
आता मिळणारं कुंकू-मग ते बाटलीतलं ओलं कुंकू असेल किंवा सिंदूर-कृत्रिमरीत्या बनविलं जातं. या विषयी डॉ. सतीश नाईक सांगतात, ‘यात प्रामुख्याने आयर्न आणि लेड सॉल्टचा बेस असतो. रंग येण्यासाठी त्यात कोबाल्ट, मँगनीज् झिंक, तसंच इतर काही महागडे धातू थोडय़ा प्रमाणात असतात आणि इंडस्ट्रियल डाय वापरले जातात. या डायपासून कुंकवाला वेगवेगळे रंग येतात. हे झालं पावडर कुंकू. सिंदूरही याच प्रकारे बनतो. त्याला शेंदरी रंग येण्यासाठी त्यात लेड आणि केमिकल वापरलं जातं. त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भांगातले केस जाऊ शकतात! त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ओलं कुंकू. त्यासाठी या पावडरीमध्ये ‘पेट्रोलियम सॉलव्हन्ट’ वापरलं जातं. ते चटकन् सुकावं म्हणून त्यात स्पिरीट घातलं जातं. त्यानंतरचा टप्पा म्हणजे टिकल्या. ज्या आज अतिशय लोकप्रिय आहेत. आज पावडर कुंकू किंवा ओलं कुंकू बाजारात आभावानेच दिसतं इतकं टिकल्यांचं साम्राज्य आहे. टिकल्यांसाठी जो पेपर वापरला जातो तो पटकन फाटू नये यासाठी त्यात गवताच्या लगद्याचा वापर केला जातो. त्यात प्लास्टिसायझर घातलं जातं त्यामुळे टिकल्या पटकन् फाटत नाहीत आणि मागे गम लावला जातो.
प्रत्येक कंपनीचे कुंकू बनविण्याचे आपापले सिक्रेटस् असतात. कमी प्रतीच्या कुंकवामध्ये ऑक्सिडाईज्ड धातू आणि कमी प्रतीचं तेल वापरलं जातं. त्यामुळे त्वचेला खाज येणं, पुरळ उठणं, काळे डाग पडणं यासारखा त्रास होण्याचा संभव असतो. तर टिकल्यांमुळे कपाळावर पांढरा डाग पडू शकतो. आधी म्हटल्याप्रमाणे सिंदुरामुळे भांगातले केस पांढरे होऊ शकतात किंवा गळू शकतात.’
कुंकवामध्ये काय पदार्थ मिसळले आहेत हे सर्वसामान्य ग्राहकाला कधीच समजत नाही, कारण कुंकवाच्या डबीवर, बाटलीवर किंवा अगदी टिकलीच्या पाकिटावरदेखील त्यात वापरल्या गेलेल्या पदार्थाचा उल्लेखच नसतो. १९९४ साली दिल्ली येथील ‘सेंट्रल पोल्युशन बोर्ड’ आणि तत्सम मंडळांनी एकत्र येऊन. कुंकू, सिंदूर आणि टिकल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थाविषयी पूर्ण तांत्रिक माहिती दिली आहे. त्यानुसार उत्पादनाला इकोमार्क हवा असेल तर उत्पादनात काय पदार्थ आहेत त्याचा उल्लेख केला पाहिजे. पण आजतायागत कुंकू वा टिकली उत्पादनातील एकाही कंपनीने अगदी शृंगार किंवा लॅक्मेसारख्या ब्रॅण्डेड कंपन्यांनीदेखील इकोमार्कसाठी अर्जच केलेला नाही! इतकंच काय पण असं एकही ठराविक पुस्तक नाही ज्यात कुंकू इंडस्ट्री आणि बनविण्याच्या पद्धतीविषयी माहिती मिळेल!
कुंकू कृत्रिमरीत्या बनविले जाऊ लागल्यानंतर यात वेगवेगळे रंगही येऊ लागले. साधारण २० एक वर्षांपूर्वी सात छोटय़ा-छोटय़ा बाटल्या चिकटवलेला एक छोटासा विविधरंगी कुंकवाचा ट्रे मिळत असे. लहान मुलींच्या तर तो अतिशय आकर्षणाचा विषय होताच पण हौशी स्त्रियांच्या प्रसाधन साहित्यातदेखील या कुंकवाच्या डब्या असत! छान रंगबिरंगी रेखाटलेलं कुंकू दिसायला कितीही छान दिसत असलं तरी त्याचीही गैरसोय होतीच. घाम किंवा पाण्याच्या एका थेंबाने हे कुंकू फरफटून जाऊ शकत पसरत असे. आज तर या कुंकवाचा आपण विचारही करू शकत नाही! लोकल ट्रेनच्या गर्दीत, धावपळीत त्या कुंकवाची पर्यायाने चेहऱ्याची पूर्ण वाट लागेल. अर्थात आज टिकल्या असल्यावर आपल्याला त्या कुंकवाच्या वाटय़ाला जाण्याची गरजच नाही. १९७२ साली कुंकवाला टिकल्यांचा पर्याय अस्तित्वात आला.
मुंबईस्थित प्रिन्टिंग व्यवसायात काम करणारे विक्रमभाई आणि सुरेशभाई यांच्या डोक्यात ही टिकल्यांची कल्पना आली. टिकल्यांच्या जन्माची कथा तशी गंमतशीरच आहे. विक्रमभाई सांगतात, ‘आमच्या एका मित्राच्या पत्नीवरून ही कल्पना सुचली. तिला नटण्यासजण्याची खूप आवड होती. नटणं म्हटलं की कुंकू आलंच. सगळा मेकअप वगैरे झाल्यावर ती कुंकू लावत असे. पिंजर लावली आणि ती नाकावर वगैरे पडली की तिला चेहरा धुऊन परत मेकअप करावा लागत असे आणि पातळ कुंकू बाहेर पडल्यावर ओघळण्याची भीती. त्या वेळी आम्ही ग्रिटिंग कार्ड वगैरे बनवत असू. त्यामुळे कटिंगबद्दलची माहिती आम्हाला होती. त्याचा वापर करून आम्ही स्टिकर बिंदी तयार करून दिल्या.’
प्रयोग म्हणूनच त्यांनी या कल्पनेवर काम केलं होतं. त्यांच्या मित्राच्या पत्नीला ही कल्पना खूपच आवडल्यावर त्यांनी याकडे व्यवसाय म्हणून बघायचा विचार केला. व्यवसाय म्हणून बिंदी उत्पादन करायचं ठरवल्यावर त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागलं हे तर उघडच आहे. या व्यवसायाबद्दल सांगणारं कोणी नसल्याने त्यांनाच प्रयोग करून शिकत या क्षेत्रात पाय रोवावे लागले. इतकंच काय पण त्या वेळी सौंदर्य प्रसाधनांतर्गत म्हणून सरकारने टिकल्यांवरही कर बसवला. त्या वेळी या भूमिकेत काम करणाऱ्या सुधा चंद्रन सांगतात, ‘रमोला सिकंदची भूमिका लोकप्रिय होण्यात या कुंकवाचा फार मोठा वाटा आहे. कुंकवामुळे तुमचं पूर्ण व्यक्तिमत्त्वच बदलतं. त्या मोठाल्या फॅन्सी कुंकवामुळे माझ्या नकारात्मक भूमिकेला अजून तीव्रता येत असे. मी एका कार्यक्रमाला बंगलोरला गेले होते. तिथे एका बाईंनी मला त्यांचं स्केचबुक दाखवलं ज्यात त्यांनी रमोला सिकंद लावत असे त्या कुंकवाची स्केचेस काढून ठेवली होती!’
आता या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या टिकल्यांबरोबर फॅन्सी टिकल्याही बनू लागल्या आहेत. या टिकल्यांमध्येही अनेक आकार, प्रकार आणि रंग आहेत. टिपटॉप पॉइंटमध्ये असणारे सगळे प्रकार बघण्यासाठी किमान दोन तास तरी त्या दुकानात घालवावे लागतील. छोटे-छोटे चंदेरी-सोनेरी बॉल्स, खडे, जर्दोजीसारख्या अनेक प्रकारांनी टिकल्या मढवल्या जातात. टिपटॉप पॉइंटमध्ये असणाऱ्या खास प्रकारांविषयी सांगताना राजेश छेडा म्हणतात, ‘आमच्याकडे थ्री डीमधलं खडय़ांनी मढवलेलं टिकल्यांचं कलेक्शन आहे. हे खडे चांगल्या प्रतीचे स्वरोस्की ब्रॅण्डचे आहेत. हे एकावर एक असे मढवले जातात की, त्याला थ्री डीसारखा इफेक्ट येतो. या प्रकारच्या टिकल्या करण्यासाठी वेळ खूप लागतो. हा एकेक खडा उचलून चिकटवला जातो. त्यामुळे त्याची किंमतही वाढते. शिवाय या टिकल्यांचा मग कमी झाला की वापरता याव्यात म्हणून आम्ही त्याबरोबर छोटी गोंदाची बाटलीही देतो.’
टिपटॉप पॉइंटमध्ये दोन रुपयांपासून १५०० रुपयापर्यंतच्या टिकल्या आहेत! यात खास विवाहासाठीचं कलेक्शन आहे. यात माँग टिकली, भुवयांवर लावल्या जाणाऱ्या टिकल्या आणि मोठी टिकली असते. त्याचबरोबर टिकल्यांचे बटवेदेखील आहेत, यात वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या टिकल्या आणि टिकल्या चिकटविण्यासाठी गमची बाटली दिली जाते. १००/- रु.पासून ५००/- रु.पर्यंतचे बटवे आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारची १२-१४-२० पाकिटं असतात.
मेहंदी किंवा हळदीसाठी आलेल्यांना भेट देण्यासाठी किंवा परदेशी राहणाऱ्या स्त्रियांकडून या बटव्यांना मागणी असते..’ इतकच नाही तर..’ राजेशजी म्हणतात, ‘आमच्याकडे पुरुषांच्या टिकल्यांचं कलेक्शन आहे. मारवाडी, गुजराती लोकांमध्ये लग्नाच्या वेळी टिक्का केला जातो तो आमच्याकडे टिकलीच्या रूपात आहे.’
ब्युटी स्पॉट, टिप टॉप पॉइंट, सुहाग स्पॉटप्रमाणेच शृंगार, मेनका, स्वीट हार्ट, स्वीट गर्ल, यासारख्या कितीतरी कंपन्या टिकली उत्पादनात आहेत. कदाचित आश्चर्य वाटेल पण फक्त मुंबईत टिकली उत्पादन करणाऱ्या १५० हून अधिक कंपन्या आहेत. यातले मोठे ब्रॅण्ड आहेत शिल्पी बिंदी. टिप्स अ‍ॅण्ड टोज्. ठराविक रंगाच्या गोल टिकल्या वापरणाऱ्या स्त्रिया शिल्पी बिंदी वापरतात. यात फॅन्सी प्रकार मिळत नाहीत.
टिकल्यांच्या फॅशनमधलं शेवटचं टोक म्हणजे सोन्याची टिकली! बहुतेक सगळ्या मोठय़ा पेढय़ांमध्ये सोन्याची टिकली मिळते. ही टिकली साधारणपणे चंद्रकोरीच्या आकाराचीच असते. गोल टिकलीवर ही चंद्रकोर चिकटवून टिकली लावली जाते. या चंद्रकोरीवर नाजूक जाळीचं कोरीव काम असतं किंवा खाली एखादा छोटासा मोती वा सोन्याचा मणी असतो. या टिकल्या इतक्या देखण्या दिसतात की थेट पेशवाईची आठवण व्हावी! गंमत म्हणजे फॅन्सी पाच टिकल्यांच्या पाकिटाची किंमत १५०० वगैरे रुपये असते तर या सोन्याच्या टिकल्या २००-५०० ला मिळतात!
सोन्याची टिकली असो वा फॅन्सी ब्युटीशियन त्या टिकल्यांना आणखी सजवायचं काम करते. या टिकल्यांच्या भोवती रंगीत कुंकू वा फॅब्रिक पेन्टनं डिझाईन काढलं जातं. हौसेला ना मर्यादा असतात ना मोल, म्हणून तर फक्त कुंकू रेखाटण्यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये दोन-पाचशे रुपये देऊ शकतात!
फॅशन अ‍ॅक्सेसरीमध्ये टिकल्यांचं महत्त्व कमी होणं आता अशक्यच आहे. नवनवीन प्रकारच्या टिकल्या बनत राहतील, वापरल्या जात राहतील आणि चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेच्या ओळी सार्थ ठरत राहतील..
कुंकवाच्या जागी जेव्हा
टिकल्या आल्या,
तेव्हा न्हाणीघराच्या भिंतीही
सौभाग्यवती झाल्या!

जशी भूमिका.. तशी टिकली..
सुधा चंद्रन सांगतात त्याप्रमाणे टिकलीच्या आकारामुळे चेहऱ्यात नक्कीच बदल होतो. म्हणून तर मालिकांमध्ये ठराविक प्रकारच्या टिकल्या ठराविक प्रकारच्या भूमिका करणाऱ्यांना दिल्या जातात. साध्या गोल टिकलीमुळे चेहरा अगदी सोज्वळ दिसतो. सोशिक नायिकांसाठी या आकाराच्या टिकल्या वापरतात. जर या गोल टिकल्यांमध्ये एक खडा असेल तर त्याला श्रीमंती लूक येतो, जशी पार्वती किंवा तुलसी. याच गोल टिकलीचा आकार जर प्रमाणाबाहेर मोठा असेल तर पुन्हा खलनायिकी लूक येतो जशी ‘कसम से’ मधील जिग्यासा. पण हा लूक मॅच्युअर, भारदस्त असतो तर लांब मोठय़ा टिकल्यांमुळे उथळ, खलनायिकी लूक येतो. छोटय़ाशा टिकल्यांमुळे गरीब विचारा लूक येतो म्हणूनच मालिकात नोकराणीचं म्हणजे सोज्वळ नोकराणीचं काम करणाऱ्यांना अशा टिकल्या दिल्या जातात. जर विनोदी लूक हवा असेल तर या टिकल्यांभोवती गोंदवल्यासारख्या टिकल्या लावल्या जातात किंवा कुंकू रेखाटलं जातं. डॉक्टर, वकीलसारख्या प्रोफेशनल नायिका असतील तर दोन भुवयांच्या मध्ये छोटीशी टिकली लावली जाते!
मनीषा सोमण