Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
वाढत्या वयात झालेले संस्कार हेच आपलं पुढचं आयुष्य ठरवत असतात. परिस्थिती व वडीलधारी माणसं यांच्या एकत्रित येण्याने मुलांवर संस्कार होत असतात. संस्कार काय असतात, त्याबद्दल तरुणांनी मांडलेली ही मतं..

वसुधा धुमक (बीएमएम)
संस्कार करण्यासाठी विशिष्ट वय नसतं. ते कोणत्याही वयात देता येतात. अगदी म्हातारपणीही. वाचनातून मुख्यत: चांगले संस्कार होतात. आजच्या धावपळीच्या युगात मोठय़ांना चांगले संस्कार देण्यासाठी वेळ मिळत नाही. तेव्हा पुस्तकंच बालवयापासून संस्कार करत असतात.

 

प्रसाद रहाटे (बीए)
कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देत मडकं तयार करत असतो, त्याप्रमाणे संस्कार व्यक्तीवर घडत असतात. संस्कार म्हणजे नक्की काय तर आदराने बोलणं, मोठय़ा व्यक्तींशी मोठय़ा आवाजात न बोलता शांतपणे बोलणं आणि आपली चूक असेल तर ती पटकन मान्य करणं, यापलीकडे संस्कार असतात तरी काय?

स्वाती केतकर (बीए)
संस्कार मुळात आचारविचारांवर अवलंबून असतात. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो, त्यावर कितपत योग्य विचार करतो, हे संस्कारांमध्ये महत्त्वाचं असते. संस्कार वातावरणावर अवलंबून असतात असं नाही. माझ्या मते, संस्कार म्हणजे समोरच्याचं म्हणणं ऐकणं आणि मग त्यावर आपलं मत स्पष्ट करणं.

दिपाली पवार (बीए)
संस्कारातून माणूस घडत असतो. त्यासाठी लहान वयापासूनच संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे. संस्कार माणसाच्या प्रत्येक वर्गाप्रमाणे असतात. श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब या तिन्ही वर्गामध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार आणि राहणीमानानुसार संस्कार घडत असतात. संस्कारांचे उत्तम उदाहरण म्हणजे.. वाल्याचा वाल्मीकी उगीच नाही झाला.

संकेत मांडवकर (बीएएलएलबी)
बालवयापासून आपली प्रगल्भ होण्याची क्षमता वाढत असते आणि ते संस्कार रुपाने आपल्या मनात रुजत असतात. संस्कार हे सावली प्रमाणे असतात. खरं बोलणं हा सगळ्यात चांगला संस्कार माणसाला घडवतो आणि विचारांना नवी दिशा देतो.