Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
‘तिची नववीची वार्षिक परीक्षा अगदी जवळ आलेली होती. अभ्यासाचे टेन्शन होतंच, रात्री दोन/तीन वाजेपर्यंत जागून ती अभ्यास करीत होती. त्याचा परिणाम म्हणजे ती आजारी पडली. त्यातच ‘लक्स एकापेक्षा एक’मध्ये ‘चिल्ड्रेन स्पेशल’ ही थीम होती. या थीमनुसार तिने ‘गोरी गोरी पान’ हे नृत्य सादर केलं. या नृत्यात लहान मुलीसारखा अवखळपणा, बालसुलभ वृत्ती नव्हती. नृत्य नेहमीप्रमाणे चांगले झाले नाही, याची तिलाही जाणीव होती. याचा परिणाम तिला कमी मार्कस् पडले आणि ‘एकापेक्षा एक’चा निरोप घेण्याची वेळ आली. ती छोटी मान फिरवून रडायला लागली. ते पाहून सचिन, आदेश, ज्युरींसह तमाम महाराष्ट्राचेच डोळे पाणावले. आणि तो क्षण आला.. त्या छोटीला सचिनने कॉलबॅक दिला आणि याच संधीचे तिने सोने केले व ‘लक्स एकापेक्षा एक’ची ती पहिली उपविजेती झाली! आणि तीच डोंबिवलीची सुकन्या काळण- एक लाख रुपये व ट्रॉफीची, मानसन्मानाची, लडिवाळ कौतुकाची मानकरी ठरली..!
अवघी पावणेदोन वर्षांची असताना सुकन्याने २६ जानेवारीला सोसायटीच्या कार्यक्रमात ‘तू चीज बडी मस्त मस्त’ हे नृत्य सादर केले. या नृत्याचे सर्वानीच कौतुक केले. वयाच्या सातव्या वर्षी तिने ‘सोनी चॅनेल’वरील ‘बुगी वुगी’ स्पर्धेत भाग घेतला. त्या वेळी सुकन्याने सादर केलेल्या ‘तेरे सिवा कुछ याद नही’ या नृत्याला पहिले बक्षिस मिळाले व ती ‘बुगी वुगी स्टार’ ठरली. यामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. नृत्यात नावीन्य व विविधता आली आणि मग मात्र तिने मागे बघून
 
बघितलेच नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ स्पर्धा मुंबई विभागात तिला प्रथम क्रमांक मिळाला. स्टार प्लसच्या ‘कुछ कर दिखाना है’, ‘क्या मस्ती क्या धूम’, ई टीव्हीवरील नूपुर इत्यादी नृत्य कार्यक्रमात सुकन्या प्रथम क्रमांकाच्या आघाडीवरच राहिली. ‘गंगुबाई नॉन मॅट्रीक’ मालिकेत १५ ऑगस्टला एक विशेष एपिसोड झाला. त्या एपिसोडमध्ये सुकन्याने ‘भारत हमको जानसे प्यारा’ हे नृत्य निर्मिती सावंत, पॅडी यांच्यासोबत झोकात सादर केले. तसेच ५ ते १४ वयोगटातील बालकलाकारांच्या ‘बालसुरांच्या मैफली’ या वाद्यवृंदात सुकन्येने अनेक नृत्यप्रकार सादर केले. या कार्यक्रमाचे पुणे, ठाणे, कल्याण, नाशिक, वाशी या ठिकाणी २५ प्रयोग तिने केले आहेत. नृत्यसाधनेचा तिने कधीही कंटाळा केलेला नाही, अभ्यासातही ती मागे नाही, आणि या साऱ्याचा परिणाम म्हणजे ‘लक्स एकापेक्षा एक’ या स्पर्धेसाठी तिला झी-मराठीकडून कॉल आला..!
तिने लक्स एकापेक्षा एकमध्ये फुलवा खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ये मेरा दिल प्यारका दिवाना’ हा डॉनमधील पहिला डान्स केला आणि मग तिची सतत चढती कमानच सुरू झाली. अपवाद फक्त ‘चिल्ड्रेन स्पेशल’चा! सुरुवातीला आठवडय़ातून तीन वेळा आणि त्यानंतर अंतिम फेरीच्या वेळी जवळजवळ रोजच सुकन्या व तिच्या आईला डोंबिवलीहून पहाटे ५ वाजताच अंधेरीच्या नटराज स्टुडिओत जाण्यासाठी निघायला लागायचे. पण तिच्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी, अगदी तिच्या धाकटय़ा पाच वर्षांच्या भावाने यशनेसुद्धा तिला पूर्ण सहकार्य केले. फु लवा-खामकर सुकन्येची कोरिओग्राफर होती. सर्वाच्या समतोल आहाराकडे, तब्येतीकडे, नृत्यसाधनेकडे, ड्रेसकडे, अडचणींकडे, कुटुंबप्रमुख म्हणून सचिनसरांचे काटेकोरपणे लक्ष असायचे.
‘लक्स एकापेक्षा एक’ या संपूर्ण स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत सुकन्येने एकूण ३२ नृत्यप्रकार सादर केले. त्यात लावणी, कथ्थक, लोकनृत्य, वेस्टर्न डान्स इत्यादीचा समावेश होता. या सर्व प्रकारांत सुकन्येने ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’ या बैठी लावणीवर कथ्थक केले. आणि दोन वेळा बेस्ट परफॉर्मर म्हणून सचिनसरांकडून बक्षीस मिळविले. त्याच वेळी सचिनने विचारले मी तुम्हाला अ‍ॅडॉप्ट करू का? तुम्ही माझ्या चित्रपटात चित्रपटात मध्यवर्ती भूमिका कराल का? आणि तात्काळ सुकन्येने अतिशय आनंदाने होकार दिला आणि आता सुकन्या काळण- पिळगांवकर ‘सातपुत्यांची सुकन्या’ या आगामी चित्रपटात काम करणार आहे!
लक्स-एकापेक्षा एकच्या अंतिम फेरीसाठी कोल्हापूरचे शिवाजी स्टेडियम खचाखच भरले होते, पण एवढा प्रचंड जनसमुदाय बघून सुकन्या जरासुद्धा घाबरली नाही. आदिती भागवत, फुलवा खामकर, सचिनसरांबरोबर सुकन्येने रुबाबात नृत्य केले. या वेळचा प्रसंग सांगताना सुकन्या म्हणाली, ‘मराठी चित्रपटाच्या पंढरीमध्ये कोल्हापूरला मला लावणी करायला मिळाली. ‘रेशमाच्या रेघांनी’ हे लावणीनृत्य मी सादर केले त्यावेळी हजारो कोल्हापूरकरांनी फेटे उडवून, शिट्टय़ा मारून मला प्रोत्साहित केले. तो प्रसंग अजूनही मी विसरू शकत नाही. आणि या वेळी मी, सॅड्रीक डिझोजा व अजिंक्यने ठरविले होते की, पहिला नंबर मिळाला नाही तरी अजिबात रडायचे नाही आणि तो क्षण आला रिझल्ट जाहीर झाला आणि मी लक्स एकापेक्षा एकची पहिली उपविजेती ठरले.
एवढे मोठे यश मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिचे सत्कार झाले. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून नृत्याच्या कार्यक्रमासाठी तिला सातत्याने बोलावले जात आहे, पण दहावीच्या परीक्षामुळे तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले होते. यानंतर कला शाखेची पदवी घेण्याचा मानस असला तरी पुढे मात्र सुकन्या नृत्यातच करिअर करणार आहे.
मीना गोडखिंडी

तबला आणि ढोलक, ढोलकी ही वाद्य्ेा म्हणजे पुरुषांनीच वाजवायची वाद्य्ेा अशी मानसिक बैठक असल्याने खूप थोडय़ा मुलींचे आईवडील या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन देतात. ही वस्तुस्थिती असताना तबला वाजवण्याचे कौशल्य संपादन केलय सुलक्षणा फाटक यांनी तर ढोलक वा ढोलकी व तबला वादनाचा पारंगत झालीय निवेदिता मेहंदळे. ‘बुगडी माझी सांडली ग’ या लावणीच्या आधीची २-३ मिनिटाची ढोलकी असो किंवा ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘रेशमांच्या रेघांनी’ या लावण्यांसाठी ढोलकीची साथ असो किंवा ‘लटपट लटपट तुझे चालणे’, ‘डोल मोरांच्या मानसा’ ही गाणी असोत, निवेदिताला ‘वन्स मोअर’ न देणारा प्रेक्षक विरळाच. तिच्या ढोलकीच्या पहिल्याच खणखणीत थापेला लोक टाळय़ांच्या कडकडाटात दाद देतात.
पुण्याच्या रेणुकास्वरुप शाळेत शिकत असताना शाळेत गायन सक्तीचे असल्यामुळे गायन शिकलेली निवेदिता, वयाच्या अकराव्या वर्षांपासून पुण्याच्या गोडसे व्हायोलीन विद्यालयात तबला वाजवायला शिकली व पुढे तबला व ढोलक, ढोलकी वादनात कधी पारंगत झाली हे तिचं तिलाच समजलं नाही. एम. ए. (संस्कृत) व बी. एड. झालेल्या निवेदिताला शाळेत शिक्षिका व्हायचे होते हे नक्की, पण तबला वादन शिक्षिका म्हणून नेमणूक होईल असे कधीच वाटले नाही. गोडसे व्हायोलिन विद्यालयात निवेदिताची बहीण व्हायोलीन शिकायची, पण निवेदिताचा ओढा मात्र तबला वादनाकडेच. अगदी लहानपणापासून खणखण तबला वाजवणाऱ्या निवेदिताच्या तबला वादनाचे तिच्या अंध आजीकडून खूप कौतुक झाले. आपलीच नात इतक्या लहान वयात खणखण तबला वाजवतेय यावर तिचा विश्वस बसेना. रेणुकास्वरुप शाळेत सर्व कार्यक्रमांना ‘तूच वाजव तबला’ या प्रभुणे बाईंच्या वाक्यामुळे तिच्यात आत्मविश्वास आला. शाळेच्या सर्व गाण्यांना, कोरसला तिची तबल्याची साथ ठरलेली. पुढे अलूरकर कंपनीने बालगीतांची कॅसेट काढली, त्यात निवेदिताला तबला वाजवण्याची संधी मिळाली. सोलापूरला बालगीतांचा लाईव्ह कार्यक्रम झाला, त्यात तबल्याची साथ तिचीच होती. तेव्हा लोकांनी कौतुक केलं. म्हणाले ‘प्रोफेशनलसारखी वाजवते.’ निवेदिता सांगते ‘तेव्हा मला प्रोफेशनल या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता, घरी येऊन डिक्शनरीत अर्थ बघितला. ‘व्यावसायिक’.. तेव्हा मला खूपच राग आला. मला वाटलं होतं काहीतरी चांगले विशेषण असेल. खरं म्हणजे तबला वाजवण्यात माझा आजही व्यावसायिक दृष्टिकोन नाहीये, म्हणूनच मला राग आला होता.’
ढोलक, ढोलकीकडे कशा वळलात? यावर त्या उत्तरल्या ’मी शाळेत असताना आंतरशालेय राष्ट्रगीत, समूहगीत गायन स्पर्धा खूप जोशात चालत. आमच्या शाळेची अहिल्यादेवी शाळेशी नेहमी चुरशीची स्पर्धा असे. महाराष्ट्र गीत तेव्हा खूप प्रसिद्ध होते, महाराष्ट्र गीताला साथीला मीच ढोलकी वाजवायला पुढे आले. खरं म्हणजे मी कुठेच ढोलक, ढोलकी वाजवायला शिकले नाही. माझ्या मावशीचे दीर ढोलकी वाजवायचे, त्यांचे पाहिले, ऐकले व तबल्याचा सराव होताच, त्यामुळे स्वत: शिकले. माझी मीच ढोलकी वाजवायची, रेकॉर्ड करायची, व ऐकायची, त्यातील चुका सुधारून पुन्हा वाजवायची, रेकॉर्ड करून ऐकायची, असाच हळूहळू सराव होत गेला. ढोलक व ढोलकी व या दोन वाद्यंच्या वाजवण्याची पद्धत वेगळी असते. ढोलकी फोक स्टाईलने जाते व ढोलक फिल्मी स्टाईलने. ढोलकला शाई नसते. त्यामुळे ोलक व ढोलकीची वेगवेगळी तंत्रे सांभाळावी लागतात, आडवा हात घ्यावा लागल्याने सपोर्ट नसतो, पण सरावाने प्रावीण्य मिळवता येते.’
कीर्तनाचे कार्यक्रम ऐकण्याची संधी निवेदिताला अगदी लहानपणापासूनच मिळाली. तिची आई गोंदवलेकर महाराजांच्या सांप्रदायातील असल्याने भजनं म्हणत असे आणि निवेदिता आईबरोबर भजनांना जात असे. भजनात तबल्याची साथ असे, भजने ऐकताना निवेदिताचे सारे लक्ष तबलजीची बोटे कशी फिरतात याकडेच असे. पुरुषांची भजने ४५ मिनिटे चालत व ४५ मिनिटे सतत तब्बलजींचा स्टॅमिना राहतो व आपला स्टॅमिना फक्त १५ मिनिटेच राहतो, या विचाराने ती अस्वस्थ होत असे. त्यामुळे स्टॅमिना वाढविण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. पुढे तिने भजनाचे अनेक कार्यक्रम केले. तिचे सासरे डॉ. अनंतबुवा मेहंदळे कीर्तन करत. आकाशवाणीवर निवेदिताची अनेक कीर्तनं झाली आहेत. मोठमोठय़ा कीर्तनकारांना तिने साथ केलीय. एकदा एका भजनाच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक छोटा गंधर्व आले होते, त्यांनी केलेल्या कौतुकाने निवेदिता धन्य झाली. निवेदिता म्हणते, ‘जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांनी म्हटले आहे की ‘स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगला तबला वाजवतात. कारण त्यांचे मन हे तरल असते, त्या पुरुषांपेक्षा जास्त एाहेगूग्न’ असतात. मी तेवढेच लक्षात ठेवले व त्यादृष्टीने अधिक प्रयत्न केले.’
हरहुन्नरी व पाय घसरू न देता सर्व दगडांवर पाय ठेवण्याची क्षमता असेलली निवेदिता शाळेत नोकरी करते, संसाराची धुरा वाहतेय, नाटय़लेखन व नाटय़दिग्दर्शनही करते, कीर्तन करते, कार्यक्रमात तबला, ढोलक, ढोलकीची साथ करते. आजपर्यंत तिने १०-१५ बालनाटय़े लिहिली आहेत व मागच्या वर्षीच्या स्पर्धेत तिने महाराष्ट्र सरकारचे प्रथम पारितोषिक मिळवलंय. संस्कृतमध्ये संगीत स्वयंवर ही एकांकिका बसवली व त्यासाठी तिला ‘संगीत नाभाख्यान’ हे बक्षीस मिळाले. तिची विद्यíथनी सायली ठाकूर नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र नाटय़ महोत्सवात सहभागी झाली होती.१९८० सालापासून तबला वाजवणाऱ्या निवेदिताला शिक्षिका, कीर्तनकार, नाटय़लेखन, नाटय़दिग्दर्शन या सर्व क्षेत्रांत अत्यंत निष्ठेने, तळमळीने केलेल्या कामाची पावती अनेक पुरस्काररुपाने मिळालीय. पुणे महापालिकेतर्फे ‘स्त्री कीर्तनकार पुरस्कार,’ हरिकीर्तन उत्तेजक सभेतर्फे पदवीधर महिला कीर्तनकार यासाठी असलेला ‘मंगला विष्णू पुरस्कार,’ गीताधर्म मंडळातर्फे गीतेचा अभ्यास व पुरस्कार यासाठीचा ‘पार्थसखा पुरस्कार,’ गोव्यातील नरेश रंगभूमी स्पर्धेत एकच प्याला या संगीत नाटकासाठी उत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार व नाटकासाठीही पुरस्कार, भारतीय जैन संघटनेतर्फे ‘उत्तम शिक्षिका पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी गौरवले आहे.
आपल्या यशाचे श्रेय निवेदिता तिचे पती तबलावादक नचिकेत मेहंदळे व तिची आई मधुमालती खळदकर व वडील भालचंद्र खळदकर यांना देते. तिचे पती शास्त्रीय संगीताच्या मैफलीत तबल्याची साथ करतात, तबल्याचे क्लासेस घेतात, त्यामुळे त्यांचेही प्रोत्साहन निवेदिताच्या यशात महत्त्वाचे. तिची मुलगी तन्मयीसुद्धा आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तबला शिकतेय, आईसारखीच शाळेत फोक डान्सला ढोलकी वाजवतेय.

लहानपणापासून गाण्यातील बोलांपेक्षा तबल्यातील ठेक्याकडे अधिक लक्ष असणारी व तल्लीनतेने तो ठेका ऐकणारी सुलक्षणा फाटक म्हणजे वसुधा व वसंत खाडिलकर यांची कन्या. सांगलीसारख्या लहान गावात जन्मलेल्या सुलक्षणाची तबला वाजवण्याची सुरुवात झाली ती योगायोगानेच. ती एकदा आईबरोबर आईच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिच्या आईच्या मैत्रिणीचे पती अनंत गोखले पूर्वी तबला वाजवत पण नंतर त्यांचा तबला माळय़ावर गेला. त्या माळय़ावरच्या तबल्याकडे बघून सुलक्षणाची आई मैत्रिणीला म्हणाली ‘जरा तो तबला सुलक्षणाला दे बघू,’ सुलक्षणाची तबल्याची आवड व शिकण्याची जिद्द बघून गोखल्यांनी तिला तबला शिकवण्याचे मनावर घेतले. रोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास सुलक्षणा जिद्दीने शिकत होती. अष्टमीच्या कार्यक्रमात तिला साथसंगत करायला तिला प्रथम संधी मिळाली. पुढे अनेक कार्यक्रम सादर करायला मिळाले. संस्कार भारतीतर्फे आयोजित अनेक कार्यक्रमात तिचा सहभाग असे. अनेक भजनी मंडळात तिने साथ केली. १९८८ सालापासून तबल्याचे अनेक सोलो कार्यक्रम पंढरपूर, सांगली, विजापूर इ. ठिकाणी सादर करून तिने वाहवा मिळवली. तबला वादनात अधिक प्राविण्य मिळवण्यासाठी तिने मुंबईला पंडित अल्लारखाँचे शिष्य अशोक गोडबोले यांच्याकडे दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. कार्यक्रम स्टेजवर कसा सादर करायचा, बसण्याची पद्धत, माईकपासूनचे अंतर, तबला वादनातील इतर बारकावे इ. बरेच शिकायला मिळाले. आईवडिलांचे प्रोत्साहन व तरुण मुलीला मुंबईसारख्या शहरात पाठवण्याची तयारी यामुळेच तिला प्रशिक्षण शक्य झाले. ती आज जे काय तबलावादन शिकू शकलीय ती ते केवळ आईवडिलांनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वस व पािठबा यामुळेच.
लग्नानंतर तबलावादक विनायक फाटक यांची सून व तबला अलंकार प्रशांत विनायक यांची पत्नी बनून आलेल्या सुलक्षणाला माहेराइतकेच प्रोत्साहन व पािठबा मिळाला ही फार भाग्याची गोष्ट. सासरच्या घरात तर सगळे वातावरणच तबलामय होते. सुलक्षणा सांगते, ‘आमचा तिघांचा रियाझ चालतो, त्यामुळे तबल्याचे बोल घराच्या कानाकोपऱ्यात सतत निनादत असतात. सासरे आणि पती त्यात पारंगत असल्याने माझ्या तबलावादनाचे घरातही खूप कौतुक होते. माझ्या मंगळागौरीला मधुरा दातार यांचा कार्यक्रम होता, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मलाच तबल्याची साथ करायला लावली होती. युववाणी, बालचित्रवाणी इ. आकाशवाणीवरील कार्यक्रमात माझा सहभाग असतो. प्रतिभा इनामदार यांच्या महिला ऑकैस्ट्राच्या अनेक कार्यक्रमात मी तबल्याला साथीला होते, त्यामुळे माझी कला फार थोडय़ाच दिवसांत पुणेकरांपर्यंत पोहचलीय.’
तबला वाजवायला फार शक्ती लागते का? सतत तीन - चार तास तबला वाजवल्यावर बोटे दुखतात का? बोटांचा स्टॅमिना वाढावा म्हणून काही व्यायाम करता का? या माझ्या बाळबोध आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर उमटलेली सुलक्षणा झटकन उत्तरली, ‘छे! छे! अजिबात नाही. तबला हा वाजवायचा असतो, बडवायचा नसतो. योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे बोटे फिरली की सुंदर नाद तयार होतो. बोटे फिरवण्याचे, हाताचा तळवा तबल्यावर सरकवण्याचे कौशल्य महत्त्वाचे. ते सरावाने व रियाजानेच येते. तबला वाजवायला फार ताकद लागते असा गैरसमज असल्यामुळेच पालकांचा मुलींना तबला शिकवण्याकडे कल नसतोच. मी तबला शिकवण्याचे क्लासेस घेते, माझ्या क्लासमध्ये एखादी मुलगी क्वचितच येते. खरं म्हणजे मुले किंवा मुली, कोणालाही सहज जमणारे हे वाद्य आहे. पण त्यासाठी हवी मेहनत व चिकाटी.’
निवेदिता व सुलक्षणा यांची यशस्वी वाटचाल पाहून जाणवलं की एखादी वेल धडपडत वाढत असतेच पण वृक्षाच्या आधाराने ती ताठ राहते, अधिक जोम धरते, त्याचप्रमाणे या दोघींना कुटुंबात आई, वडील, पती, सासू, सासरे यांचे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांच्या कलेचा अधिक जोमाने विकास होत आहे. या दोघींचे या आगळय़ा वेगळय़ा वादनक्षेत्रातील यश अनेक मुलींना आत्मविश्वास प्राप्त करून देईल.
प्रा. शैलजा सांगळे