Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
व्हिवाचं कौतुक करणाऱ्या पत्रांचं आम्हाला निश्चितच कौतुक आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला आवडतील विश्लेषणात्मक पत्रं. तुम्ही विचार करा आणि इतरांना विचार करायला लावा. व्हिवासाठी मजकूर किंवा पत्र खालील पत्यावर पाठवा- व्हिवा-लोकसत्ता, लोकसत्ता संपादकीय, एक्सप्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. अथवा खालील ई मेलवर पाठवा. viva.loksatta@gmail.com

वेगळ्या विचारांच्या वळणवाटा
‘लोकसत्ते’च्या दर गुरुवारच्या अंकाबरोबर प्रसिद्ध होणाऱ्या ‘व्हिवा’ पुरवणीची मी नियमित वाचक आहे. ‘वेगळ्या विचारांच्या वळणवाटा’ चोखाळणारी व्हिवा आपल्या या ब्रीदवाक्याशी सुसंगत असणारे अनेक विचार वाचकांपर्यंत पोहोचवते. शुभदा

 

पटवर्धन यांच्या ‘घरोघरी’ या सदरातील व्हिवा सोसायटी म्हणजे पुण्या-मुंबईच्या हाऊसिंग सोसायटय़ांचे प्रातिनिधिक चित्रणच असतं. ते जितकं आजच्या तरुण वर्गाचं असतं, तितकंच ते त्यांच्या पालकांचं, आजी-आजोबांचं आणि सभोवतालच्या परिसराचंही असतं. आजच्या या पत्रप्रपंचाचं कारण म्हणजे १२ मार्च २००९ च्या अंकातील घरोघरीमधील ‘हुरहूर’ हा लेख! लग्नाच्या दिवस आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या मायलेकींच्या मनातील विचार, बेचैनी, दाटलेल्या भावना या साऱ्या अतिशय संयत शब्दात अगदी अचूकपणे या लेखात उतरल्या आहेत. ‘हुरहूर’ हे शीर्षक नववधूला आपले इतके दिवसांचे हक्काचे घर सोडण्याच्या कल्पनेने येणारी, नव्या घरात रुजवून घेण्याच्या दडपणाने येणारी अस्वस्थता जसं व्यक्त करतं तसंच तिला वाटणारी नव्या नात्याची ओढही दर्शवितं. हुरहूर वाटायला लावणारा तरीही प्रसन्नतेचा शिडकावा करणारा लेख एक आई म्हणून मला अतिशय भावला!
तसाच नॉस्टॉल्जिक करणारा प्रीती छत्रे यांचा ‘अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि बदलाचे खारे वारे’ हा लेख. या लेखाने तर मला पार विद्यार्थिनी बनवून परत शाळेत नेऊन पोहोचविले. इतकंच नाही तर शिक्षिका म्हणून नंतर काम करताना विद्यार्थ्यांच्या काढून घेतलेल्या वह्यांची आठवण करून दिली. या वह्यांची अशी मागची मानं शिक्षकांनाही मनमुराद हसवतात आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेची आठवण करून देतात.
याच पुरवणीतील ‘क्रेझी कॉर्नर’मधील चंद्रहास मिरासदार यांचा लेखही अतिशय खुमासदार आहे. ग्राहकांच्या ‘फुकट’ काही मिळविण्याच्या वृत्तीवर लेखाच्या शेवटाने उपरोधाची चुरचुरीत फोडणी दिली आहे. थर्ड आय, दवंडी ही सदरे नेहमीच वाचनीय असतात. पण याच पुरवणीतील फॉरवर्डस् या सदरातील ‘केशवाचे कपट..’ हा ‘क’च्या बाराखडीचा लेख मात्र वेगळ्या विचारांच्या वळणवाटांवर खडय़ासारखा बोचतो.
स्वाती परांजपे, दादर

तरुण पिढीने व्हिवातल्या लेखांवर विचार करावा
‘चतुरा’ बंद झाल्यावर चुकल्यासारखे वाटत होते, थोडी खिन्नता आली होती, पण आता मात्र चतुराने पेहराव बदलला व व्हिवाच्या रूपात दर गुरुवारी भेटायला लागल्यावर परत जीवाभावाची मैत्रीण भेटल्याचा आनंद प्रत्येक आठवडय़ात मिळायला लागला. ‘वेगळ्या विचारांच्या वळणवाटा’ हे शीर्षक समर्पक आहे.
‘घरोघरी’मध्ये शाल्मलीने नेहाला दिलेला सल्ला योग्य आहे. नव्या घरी आपली पाटी कोरी असताना आपले विचार आपली मते दुसऱ्यांना स्पष्टपणे सांगितली नाहीत तर कायम समोरच्याला खूश ठेवण्याच्या नादात आपण आपले मतच गमावून बसतो व कायम आपल्या इच्छेविरुद्ध ते लोढणे गळ्यात पडते व त्यातून सुटका होत नाही.
सरकारने अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला तरी अठराव्या वर्षी वैचारिक प्रगल्भता येत नाही. जिथे २५ वर्षे संसार करूनसुद्धा मुलांचे विवाह जमविण्याच्या वेळी अपरिपक्व पालक पाहिले की, मुलांमध्ये वैचारिक प्रगल्भतेची अपेक्षा चुकीची वाटते.
आपण समाजात राहतो त्यामुळे समाजाचे नियम पाळणे हे गृहीत धरलेले असते. त्यामुळे तरुण पिढीवर थोडय़ा फार प्रमाणात समाजाचा धाक असतो. तरुण पिढीने व्हिवातल्या सगळ्या लेखांवर विचार करावा. स्वत:चे आयुष्य बरबाद होऊ नये यासाठी काही नियम स्वत:वर घालून त्याचे कटाक्षाने पालन करावे.
प्रेम व शारीरिक आकर्षण यामध्ये गल्लत करू नये. प्रेम कधीच प्रिय व्यक्तीचे वाईट चिंतत नाही. प्रत्येक मुलीने नाही म्हणण्याचा हक्क स्वत:कडे ठेवावा. मजा दोघेही करतात, पण सजा मात्र मुलीच्या वाटय़ाला. शारीरिक, मानसिक, आर्थिक झळ मुलींना पोहोचते. कधीही आत्महत्येचा विचार मनात येऊ देऊ नये व कोणी ब्लॅकमेल करत असेल तर त्याला जे करायचे असेल ते करू द्यावे पण एक चूक लपविण्यासाठी अनेक चुका करू नयेत. मालिकेतल्या मुली विवाहापूर्वी मातृत्व आल्यावर मूल वाढविण्याचा निर्णय घेतात. वास्तवात हे खूप कठीण आहे. स्वत: आर्थिक दृष्टय़ा स्वावलंबी नसताना मुलाची जबाबदारी पेलवणे सोपे नाही. त्याला विनाकारण समाजाकडून टोमणे का झेलायला लावायचे. सगळ्याच गोष्टींचा विचार करावा. बाकी आता व्हिवा आहेच मार्गदर्शनाला. त्याचा उपयोग करून घेतला नाही तर आपल्यासारखे करंटे दुसरे कोणी नाही. १५ जानेवारीचे सगळे लेख विचार करायला लावणारे आहेत.
मंदाकिनी परब, बांद्रे

सगळा अंकच वाचनीय
‘व्हिवा’ वरचेवर खूप वाचनीय होत आहे. २६ फेब्रुवारीच्या ‘घरोघरी’तील शुभदा पटवर्धन यांचा आई व मुलीतील संवाद फार भावला. परीक्षा, विद्यार्थी व पालक यांच्यामधील जिव्हाळ्याचा संवाद तर छानच आहे, पण नमस्काराचे महत्त्व चांगल्या प्रकारे व्यक्त केले आहे. परीक्षेची तयारी व घरोघरी हेच चालते. शेवटी मात्र मराठीच्या पेपरला पट्टी लागत नाही हे अवंतिकेचे वाक्य थोडेसे हसायला लावते. लिखाणशैली उत्तम आहे.
व्हिवामधील पान चारवरील, ‘एक बेचारा आलु’ हे सदरही फार आवडले. बटाटय़ाचे अनेक पदार्थ प्रकार विष्णु मनोहरांनी नमूद केले आहेत. मागील वर्षी व्हिवामधून काही रेसिपी मागवल्या होत्या. त्यात ‘ऑफ बीट बटाटा’ असे पदार्थ पाठवावेत असे व्हिवातून निवेदन होते. नवीन काही पदार्थ हवे होते. मी त्या वेळी मोठय़ा बटाटय़ाचा फ्लॉवर पॉट (कोथिंबीरचा) व छोटे मिनी बटाटे याचे ‘स्वीट मिनी बटाटा’ असे दोन पदार्थ करून, डिश सजवून व्हिवाला पाठवले व ते कृतीसह छापूनही आले. तर अशी ही व्हिवाची प्रोत्साहन देणारी आवृत्ती नेहमीच मला आवडते.
मी गुरुवारी व्हिवाची वाट पाहत असते. सगळा अंकच वाचनीय असतो.
७१ वर्षे वय व गुढग्याची व्याधी यामुळे फारसे बाहेर जाता येत नाही. त्यामुळे वाचन हा छंद व लोकसत्ता- व्हिवा लाडक्या सदराचा भरगच्च मजकूर!
उषा खैराटकर, ठाणे

चांगला लेख
गुरुवारच्या व्हिवातील ‘हुरहुर’ हे लेख वाचला. खरंच किती सुंदर विचार आहेत तुमचे. आपले विचार आवडले. तुमच्या या कथेत सर्वात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल तर ती म्हणजे रेखा.. (आई). अपेक्षा करुयात की, या जगात सगळ्या आया, रेखासारखा विचार करतील.
निलेश हंकारे

डोळ्यासमोर पात्रं उभी राहिली
गुरुवारच्या व्हिवातील घरोघरी मधला ‘हुरहुर’ हा लेख वाचला. खरं सांगू.. माझ्याकडे शब्दच नाहीत लेखाचं कौतुक करायला. संवाद लिहीणं सोपी गोष्ट नाही. एक वेळ लेख लिहीणं सोपं आहे. पण संवाद लिहीताना दोन किंवा जास्त पात्रं आपापला दृष्टीकोन शब्दात मांडत असतात. आणि तो शुभदा पटवर्धन यांनी सहजपणे या लेखात सादर केला आहे की त्याला तोड नाही. आई आणि मुलीमधला इतक्या नाजूक विषयावर संवाद इतक्या सोप्या भाषेत लिहीला आहे की, नकळतपणे डोळ्यासमोर (अनोळखी) पात्रं उभी राहतात. खूपच सुंदर लेख आहे.
मंदार जांबोटकर

येथे आपली संस्कृती कुठे जाते?
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या संस्कृतीरक्षकांनी आपले ढोल बडविण्यापूर्वी याचे आत्मपरीक्षण करावे.
१) व्हॅलेंटाईन डे ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक म्हणून आपला विरोध. मग इंग्रजी नववर्षदिन १ जानेवारीला मध्यरात्री आपण धिंगाणा का घालता? त्याला कुणीच अटकाव करीत नाही.
२) आपला नववर्ष दिन-गुढी पाडवा आपण साजरा करतो का?
३) व्हॅलेंटाईन डे वर्षांतून एकदाच येतो, परंतु टी.व्ही. चॅनेल्सवर पॉप म्युझिक वा अन्य परदेशी टय़ून्सवर बारा महिने/ चोवीस तास अर्धनग्न नाच चालू असतो, तो आपल्या संस्कृतीत बसतो का? नसेल तर त्याला विरोध का होत नाही?
४) याच टीव्ही चॅनेल्स, चित्रपटगृहे व सिरियल्स, गाणी यामधून मिठय़ा-मुक्यांची रेलचेल चालू असते, आपण व आपले आप्तेष्ट ते चवीने बघता. हे सर्व आपल्या संस्कृतीचे रक्षण करते का हो? नसेल तर आपल्या स्वत:च्याच टीव्हीवर एक छोटा खडा तरी मारलाय का?
५) एवढंच काय वृत्तपत्र, नियतकालिकांतून उत्तान देहप्रदर्शनांची चित्रे दररोज प्रसिद्ध होत असतात हे पण आपल्या संस्कृतीचे प्रतीकच का? नसेल तर त्यातील एकतरी चित्र जाळले जाते का?
६) आपली कॉलेजची मुले कॉलेजच्या निदान Traditional day ला धोतर-टोपी व नऊवारी साडी असा पोशाख करतात का?
७) आपल्या घरातील स्त्रिया घरामध्ये कुंकू व मंगळसूत्र वापरतात?
८) शेवटचे पण महत्त्वाचे दोन मुद्दे- आपण भारतीय संस्कृतीचा आणि अस्मितेचा अभिमान असलेल्या तिरंग्याला १५ ऑगस्ट/ २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांना अभिवादन करतो का? हे राष्ट्रीय सण रविवारला जोडून आल्यावर आपण हा सण साजरा न करता लोणावळा/ खंडाळ्याला जाऊन पेग मारत बसतो. हीच का आपली भारतीय संस्कृती?
९) या राष्ट्रीय सणांच्या संध्याकाळी व दुसऱ्या दिवशी शाळांच्या आसपास व बाजारात छोटे तिरंगे धुळीत पडलेले असतात. त्यातील एकतरी उचलायचे आपण कष्ट घेता का? तिरंगे धुळीत फेकू नये असे आपल्या घरातील मुलांना सांगता का?
१०) कुठल्याही शैक्षणिक- सामाजिक संस्थांमध्ये कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रगीत होते. त्यावेळी ती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करता का? हे राष्ट्रमातेलाच वंदन असते ना? तरी तिला विसरता?
वरील मुद्यांवर विचार करून काही उत्तर सापडतंय का बघावं. एका मेंढरानं शिंग मारलं म्हणून बाकीच्यांनी मारायचं ही ‘मेंढर संस्कृती’ आपल्या मानव संस्कृतीला शोभते का? याचा जरूर विचार व्हावा.
सुधीर देशपांडे, विलेपार्ले

भाषांचे विकेंद्रीकरण व्हावे
एक दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी भाषांच्या जंगलातूनच जावे लागते. पुढे-मागे काम-धंद्याचा व्याप वाढल्यानंतर आपोआपच त्यांचा फायदा होतो. २६-०२-२००९ च्या व्हिवातील ‘दवंडी’मध्ये लेखक अभय परांजपे यांनी या ज्ञानाच्या भुकेचे चांगले विश्लेषण केले आहे. दहावी-बारावीतील युवा वर्गाने या सूचना अमलात आणल्यास खरोखरच भविष्यात त्यांना फार तप करण्याची गरज भासणार नाही. माध्यमक्षेत्रांची क्रांती असली तरी भाषाक्षेत्रांतून ‘उडदामाजी काळे गोरे’ आपोआप निवडले जातात. खरे तर भाषा शिकण्याची अनास्थाच मराठी माणसाला मारक ठरली असून आगामी काळातही मराठी तरुण त्याबाबत जर अस्पृश्य राहिले तर त्यांचेसारखे कमनशिबी तेच ठरतील. परांजपेसरांनी टाकलेला बाऊंसर थेट मराठी बांधवांच्या हिताचाच असून त्यावर सखोलपणे चर्चा व्हायला हवी. आज महाराष्ट्रातच काम मिळेल या भ्रमात कोणी राहू नये व सीमापारची संधी आल्यास भाषेचे संकट उभे राहील. तेव्हा भागते भागते गया अन् धापक्यान पडय़ा! व्हायला नको. दवंडी अति सुंदर, खरेच त्यावर मंथन व्हावे.
देवराम खणसे, पुणे