Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
मला माझ्या बालपणीचा दूरदर्शनचा काळ आठवतो. दूरचित्रवाणीचं दूरदर्शन झालं नव्हतं तेव्हाचा काळ. संध्याकाळी सहा वाजता टीव्ही सुरू होऊन अकरा वाजता मिटायचा. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांइतकीच तिथली माशीही प्रसिद्ध होती. एकमेव चॅनेल असल्यामुळे लोकांसमोर पर्याय नव्हते हे एक कारण आणि नवीन नवीन सगळं असल्यामुळे मुळातच सगळा विचार ताजा होता. रेडिओवरच्याच मंडळींना प्रशिक्षित
 
करून दूरदर्शन सुरू झालं. सगळ्यांसाठी कार्यक्रम असायचे आणि सर्व भाषेतले. सांताकुकडी, आवो मारी साथे, कामगार विश्व, किलबिल, युवदर्शन असे एखाद्या मासिकातल्या वेगवेगळ्या सदरांसारखे कार्यक्रम. किलबिलमध्ये हुंडाबळीवरचा कार्यक्रम करणारे निर्मातेही दूरदर्शनवर होते. पण गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा असेही उत्तम कार्यक्रम व्हायचे..
गजरा, छायागीत, फूल खिले है गुलशन गुलशन आणि सिनेमा हे कार्यक्रम त्या वेळी तुफान पॉप्युलर होते. आयपॉड कानाला लावून फिरणाऱ्या आणि डीव्हीडी पाहणाऱ्या पिढीला फर्माईशी गाणी ऐकण्याचा किंवा पाहण्याचा काय आनंद होता हे कधीच कळणार नाही. दर शनिवारी मराठी सिनेमे आणि रविवारी हिंदी सिनेमा.. फुकट सिनेमा पाहायला मिळणे म्हणजे काय याची कल्पना तर त्या वेळी भक्तिभावाने इमारतीतल्या एकुलत्या एका कृष्णधवल सेटसमोर साडेपाचपासून नंबर लावून ज्यांनी सिनेमा पाहिला आहे त्यांनाच करता येईल.
‘आज मैं जवान हो गयी हूँ, गुलसे गुलिस्तान हो गयी हूँ’ आणि ‘परदेसियों से ना अखियाँ मिलाना’ ही गाणी छायागीतात टॉप टेनमध्ये होती. अध्र्या तासाचे छायागीत पाहायला दोन तासांची हुरहूर आणि नंतर दोन तासांची कटकट असायची. पण कोणाच्या तरी घरात सांदीकोपऱ्यात झुरळासारखे कोंबून घेऊन, चोरटे स्पर्श आणि चोरटय़ा नजरांनीच त्या वेळच्या पिढीचं प्रेम फुलायचं.
दूरदर्शनच्या टॉवरखाली तेव्हा उत्तम कार्यक्रम करणारेही काही निर्माते होते. विनय आपटे होते, विजया जोगळेकर होत्या. विनय धुमाळे होते. सुहासिनी मुळगावकर होत्या.. सई परांजपेंनीसुद्धा केलेला एक गजरा मला अजून आठवतोय. सगळे मान्यवर कलाकार त्यात असायचे. भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर, प्रदीप भिडे असे उत्तम निवेदक होते.
विनय आपटेंनी मला एक किस्सा सांगितला तो सांगायचा मोह आवरत नाही. एका गजऱ्यासाठी बेस्टची बस हवी होती पण ती कशी मिळणार? ती भाडय़ाने आणण्याएवढं बजेटच दूरदर्शनकडे नव्हतं. मग विनयने बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना फोन करून अडचण सांगितली. ते म्हणाले मी बस देऊ शकतो, पण भाडय़ाशिवाय बस कशी देणार? बस डेपोतून बाहेर पडली की तिने धंदा हा केलाच पाहिजे, असा नियम आहे. काहीतरी करा.. अशा विनवण्या केल्यावर त्यांनी विचारलं की, किती वेळ तुम्हाला बस हवीय. तर दोन तासांत आमचं काम होईल, असं सांगितल्यावर ते म्हणाले, मी तुम्हाला डबल डेकर बस देतो. ही बस लांब पल्ल्याची होती. वरच्या मजल्यावर तुम्ही शूटिंग करा.. खाली बस नेहमीप्रमाणे व्यवसाय करील.. चला ठरलं. त्याप्रमाणे शूटिंग झालं. वरती शूटिंग. बस प्रत्येक बसस्टॉपवर थांबत होती. वरचा कंडक्टर जिन्यात उभा राहून वर जागा नाही, असं सांगत होता आणि वर सुखात शूटिंग चालू होतं. झालं ना काम. हे करायला कुणी विनयला किंवा त्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना चार चव्वल जास्त दिले नव्हते. पण एक चांगला कार्यक्रम करू या म्हणून त्यांनी हे नियमांच्या बाहेर जाऊन लोकांना काहीतरी चांगलं पाहायला मिळावं म्हणून केलं. परिणाम? विनय आपटेंना मेमो मिळाला. की ही बस तुम्ही बजेटमध्ये कशी बसवलीत? प्लीज एक्सप्लेन.
नंतर कधीतरी दूरदर्शनच्या मनोऱ्याखाली मालिकांचा बाजार सुरू झाला. तेरा भागांच्या मालिका होत्या तेव्हा. त्यासाठीही पैशाची देवाणघेवाण होऊ लागली आणि अधोगतीला सुरुवात झाली. १९९९ साली दूरदर्शनव्यतिरिक्त ‘अल्फा मराठी’ ही चोवीस तास चालणारी उपग्रह वाहिनी सुरू झाली. या वाहिनीच्या जन्माचा मी साक्षीदार आहे. कार्यक्रम अधिकारी म्हणून मी तिथे होतो. मला आठवतंय चार ऑगस्टला दुपारी ठरलं की, पंधरा ऑगस्टला चॅनेल लाँच करायचं आणि ते झालं. डब केलेल्या हिंदूी मालिका होत्या हातात. बातम्या होत्या आणि बरे-वाईट मराठी सिनेमे होते. या शिदोरीवर अल्फा मराठीने वाटचाल सुरू केली. नुकतीच त्यांनी दहा वर्षे पूर्ण केली.
त्यानंतर ‘ई टीव्ही’ आणि‘प्रभात’ नावाची दोन चॅनेल आली. ई टीव्ही अजून आहे.. प्रभातची संध्याकाळ लगेचच झाली. अल्फा मराठी (आता झी मराठी)ला मिळालेल्या यशामुळे मराठी प्रेक्षकांची भूक माध्यमातल्या लोकांना कळली होती. मग मायबोली, इंद्रायणी अशी एखाद दोन चॅनेल केव्हा येऊन गेली ते लोकांना कळलंही नाही.
जाहिरातींचा ओघ या चॅनेल्सकडे येऊ लागला. आज या घटकेला झी मराठी, ई टीव्ही, स्टार प्रवाह, मी मराठी, साम अशी पाच चॅनेल्स आहेत. त्यांपैकी साम आणि मी मराठी धडपडताहेत. स्टार प्रवाहचंही आस्ते कदम बस्तान बसत आहे. एवढय़ांना प्रेक्षक आहे का असा एक प्रश्न माध्यमांमध्ये विचारला जाऊ लागला आहे. तर माझ्या मते आहे.
पण शेवटी ज्या चॅनेलला पहिल्या क्रमांकावर जाण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्यांना इतर चॅनेल्सच्या करमणूक क्षेत्रात उतरून त्यांच्यापेक्षा सरस ठरूनच त्यांना चीत करावे लागेल. लोकांची ज्या प्रकारचे कार्यक्रम पाहण्याची मानसिकता झालेली आहे त्याच्या संपूर्णपणे विरोधात जाऊन कितीही चांगले कार्यक्रम केले तरी लोकांना त्या कार्यक्रमांकडे ओढून आणायला खूप वेळ लागेल. सराफ बाजारात एका बाजूला एक असलेल्या सगळ्या दुकानांचा धंदा होतोच.. पण सरस ठरतो तो वेगळे दागिने करणारा, उत्तम सेवा देणारा सराफ. तिथे लोखंडाचे दुकान चालणारच नाही असं नाही. पण लोकांची वहिवाटीची सवय तोडणे हे खूपच कठीण आहे. ही चॅनेल्स आहेत आणि रिलायन्सच्या आगमनाची दवंडी पिटली जाते आहे. येईल तेव्हा येईल पण या सगळ्यात उत्तम कथा असणाऱ्या मालिका एखाद्या चॅनेलला पहिल्या क्रमांकावर घेऊन जातील. पण प्रेक्षकांना फायदाच फायदा आहे. ग्राहकांचे राज्य आहे. ते ठरवणार त्यांना काय पाहिजे. म्हणून ज्या मालिका किंवा कार्यक्रम आपल्याला आवडत नाहीत ते कृपया सवय आहे म्हणून पाहू नका. ज्यांच्या घरी टीआरपी मीटर्स आहेत त्यांनी तर हे नक्कीच लक्षात ठेवा. तरच खरोखर सर्वाना आवडणारे कार्यक्रम करण्याची स्फूर्ती या चॅनेल्सना मिळेल.
asparanjpe1@gmail.com