Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
जर्मन भाषा, संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देणारं पाक्षिक सदर
जर्मन भाषेमधले एक अगदी मधुर स्वरांचे गाणे आहे. त्याचा मतितार्थ साधारणत: असा आहे की एक जर्मन प्रियकर मोठय़ा शहरातल्या गजबजाटाला कंटाळून आपल्या प्रियेला म्हणतो आहे: ‘चल ग, सोड हे शहरातले धुरकट वातावरण, हा कामाचा ताण! जाऊ आपण दूर समुद्राच्या, सूर्यप्रकाशाच्या दिशेने! दुसरं काही नको मला. फक्त तुझा हात, वाईनचा चषक आणि थोडासा ब्रेड! प्रत्येक कडव्यानंतर तो प्रियकर आपला म्हणतोय:
Brot, ein glas Wein, und deine Hand!
ब्रोट, आईन् ग्लास वाईन, उंड दाईनऽ हांड!
ब्रेड, एक वाझीन्चा ग्लास, आणि सोबत तुझा हात!
जर्मन जीवनातले वाईन आणि ब्रेड हे अगदी जिव्हाळ्याचे विषय आणि तिसरी अर्थात जर्मन बिअर. इंग्रज लोकांमुळे आपल्याला पांढराशुभ्र कागदासारखा बेचव ब्रेड खायची सवय लागली. अलीकडे ब्राऊन ब्रेड, कोंडय़ाचा ब्रेड हे प्रकार काही ठिकाणी आपल्याकडे मिळू लागले आहेत. परंतु प्रार्थनांनी ओतप्रोत भरलेल्या आणि रंगाने अगदी सावळ्या आणि हट्टय़ाकट्टय़ा अशा जर्मन ब्रेडची तुलना त्याच्याशी करणे अगदी अयोग्य.
आपल्याकडे जसे रोज इवलेसे, पातळ फुलके खाणाऱ्याला एकदम जाडजूड नागलीची भाकरी वाढली की त्याची चव आणि त्यातली मजा समजायला काही काळ जावा लागतो. तसे जर्मन Sehwarzbrot, Bauernbrot (खार्ल्सब्रोट, बाउअर्न
 
ब्रोट-शब्दश: भाषांतर करायचे झाले तर काळा पाव, शेतकरी पाव) यातली रुची जाणवायला थोडा वेळ जावा लागतो. अनेक तऱ्हेची भरड दळलेली धान्य, पीठ आंबवण्याची पिढय़ान् पिढय़ांपासून सतत सुधारत आणलेली पद्धत, ब्रेड बनवण्यातला काटेकोर शास्त्रशुद्धपणा अशा सर्वाचा परिपाक म्हणजे जर्मन ब्रेड आणि त्यातली विविधता. त्यामुळे त्याचा एखादा स्लाईस पोटभरीचा ठरतो. लहान गावांमधल्या बेकरीज् आपली शंभर-दोनशे वर्षांची परंपरा दुकानाच्या पाठीवर अभिमानाने मिरवताना दिसतात. खूप लोक कितीही थंडी-वाऱ्या पावसात आपल्या नेहमीच्या बेकरीतून प्रात: प्रात: उष:काली न्याहारीसाठी गरमा गरम ताज्या-ताज्या ब्रेडची खरेदी करण्याकरिता येताना दिसतात. ब्रेकफास्ट, लंच डिनर तिन्हीत्रिकाळ ब्रेड खाऊन खूपदा भारतीय मंडळींना कंटाळा येतो. गरमा गरम रोटीशी त्याची थोडीच तुलना होणार? परक्या देशात वेगळ्या रुचिसंवर्धनाची सवय करून घ्यावी लागते.
जी गोष्ट ब्रेडची तीच गोष्ट वाईन आणि बिअरची. आपल्याकडे ‘केस्टो मुखर्जी’ , ‘एकच प्याला’ इत्यादी स्टिरियोटाईप्समुळे वाईन/बिअर म्हणजे ‘दारू’, ‘शांतम् पापम’, ‘गटारात लोळणे’, ‘घरादाराचा सत्यानाश’ अशा तऱ्हेच्या माशा एकदम डोक्यात घोंघावायला लागतात. तो गोंगाट थोडा बाजूला ठेवून एक सांस्कृतिक ठेव्याचा आणि अभिरुचिचा भाग म्हणून वाईनकडे बघणे हे आपल्या मानसिकतेला प्रथम फार कठीण जाते. वाईनप्राशनालासुद्धा एक लय, ताल, काल आणि मान आहे. ते पाळले की तोही एक सोहळा होऊन जातो. त्याची सुरुवात होते ग्लासाच्या अगदी ठेवणीतल्या आकारापासून. तो हाताच्या ओंजळीत एखाद्या कमळासारखा अलगद धरायचा. प्रथम त्यात घोटभरच वाईन ओतायची. मग त्याचा सुगंध नाकात भरून घ्यायचा. चषक जरा गोल गोल हलवायचा. म्हणजे म्हणे हाताच्या उबेने त्या वाईनचा अरोमा आणखी खुलतो आणि दरवळतो. मग पहिला इवलासा घोट घेऊन तोही या गालातून त्या गालात असा जरा घोळवत घोळवत मग हळूवारपणे प्यायचा. मनासारखा स्वाद जमला की जर्मन निळे-निळे डोळे मग अशा काही प्रसन्नतेने लुकलुकतात की आपण आपली वाईन पिणे विसरून जातो. बरोबर तऱ्हेतऱ्हेच्या चीजचे तुकडे, ब्रेडवर हर्बज् बटर लावलेले छोटे छोटे स्लाईसेस आणि टप्पोरी द्राक्षे असा मेवा. अतिशय संथ लयीत प्राशन करत मेणबत्तीचा प्रकाश आणि मुलायम आवाजातल्या संवादाने रंगलेल्या संध्या मग मनावर कायमच्या रेखल्या जातात. ऱ्हाईन, मोझेल या नद्यांच्या काठावरील सर्वभाग तेथील वाईनसाठी प्रसिद्ध आहे. या छोटय़ा छोटय़ा खेडय़ांमध्ये अगदी प्रवेशद्वारापासून वाईनचे तेथील जीवनातले मध्यवर्ती स्थान जाणवत राहते. अशा खेडय़ापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला भरदार घोसांनी लगडलेले द्राक्षांचे वेल विस्तृत भूभागावर, पर्वतांच्या उतरणीवर असे सर्वत्र आणि सर्वदूर पसरलेले दिसतात. साताठशे वर्षांपूर्वीची द्राक्षाचा रस काढण्यासाठी वापरली जाणारी ओबडधोबड यंत्रे, लाकडी अवजारे मोठय़ा निगुतीने या खेडय़ातील मोक्याच्या ठिकाणी विराजमान झालेली असतात. ती आपल्याला आवर्जून दाखवली जातात.
नवीन वाईन तयार झाली की, ‘वाईन प्रोब’ Weinprobe म्हणजे वाईन टेस्टिंगचे समारंभ प्रत्येक वाईनची लागवड करणारे शेतकरी कुटुंब आपापल्या अंगणात साजरे करते. पंचक्रोशीतील अनेक लोक आपल्या मित्रमैत्रिणींसह, कुटुंबासह हे समारंभ अटेंड करतात. एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या वाईनची ख्याती जर सर्वदूर पसरलेली असेल तर आसपासच्या शहरातूनही शनि-रविवारी लोक मुद्दाम येतात. इथे अजूनही एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात आहे. त्यामुळे कुटुंबातली वृद्ध थोरली मंडळी सर्वाची खातीरदारी नीट होते आहे ना हे बघत लोकांमधून फिरत असतात. हवे नको बघतात. गावठी भाषेत आणि रांगडय़ा स्वरात आपल्या खरबरीत हाताने शेकहँड करत स्वागतोपचाराचे बघतात. मधली पिढी छोटय़ा छोटय़ा चषकांतून वाईनचे प्रकार एका मागून एक सादर करण्यात दंग असते. त्या आधी त्या वाईनप्रकाराची समग्र कुळकथा, त्यावरचे संस्कार, आधीच्या व या वाईनमधला फरक अशी खमंग आणि खुसखुशीत कॉमेंट्री चालू असते. जर्मन भाषेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला त्यातील गावरान मृद्गंध इतका मोहित करतो की त्यापुढे वाईनप्राशनही विसरून जावे. पोळ्यातून मध ठिबकावा तशी आपल्या वाईन बनविण्याच्या प्रक्रियेतील आत्मीयता त्या शेतकरी कुटुंबाच्या प्रत्येक शब्दातून, कृतीतून ठिबकत असते. शेकडो वर्षांच्या त्यांच्या कौटुंबिक परंपरेचा अभिमान डोळ्यात चमकत असतो. तरुण पिढी, स्त्रिया मधून मधून चीज, ब्रेड ऑलिव्ह, मळ्यातल्या गाजर- काकडीचे तुकडे सव्‍‌र्ह करत असतात. असे आठ दहा प्रकारच्या वाईनच्या टेस्टिंगची आवर्तने झाली की लोक आपापल्या आवडीनुसार क्रेटच्या क्रेट खरेदी करतात. आणि आपापल्या गावी निघून जातात. पुन्हा पुढच्या वर्षी नक्की यायचं बरं का, असा प्रेमळ आग्रह तो कुटुंबप्रमुख करतो. त्याची आज्जी तोंडांचे बोळके पसरवत आणि लुकलुकणाऱ्या डोळ्याने ‘आदेऽऽऽ’ म्हणजे गावरान भाषेतले बाय बाय करते. अनेक शहरी जर्मन कुटुंबांचा त्यांच्या आवडीच्या द्राक्षमळ्यांशी अनेक वर्षांचा क्वचित एक दोन पिढय़ांचा घरोबा जमलेला असतो. अशा वेळी मग ‘उत्पादक’ आणि ‘ग्राहक’ अशा भांडवलशाही संज्ञा केव्हाच अस्त पावलेल्या असतात. परंपरेचे जतन करणारा आणि या जतनाचे कौतुक करणारा इतकेच शिल्लक राहते. भारतीय मानसिकतेला अशा एखाद्या संध्याकाळी मग ७००० कि.मी. अंतरावर कुठेतरी छोटासा भारत भेटतो. सांस्कृतिक साम्य आणि फरक अशा दुहेरी विणीचे वस्त्र खुणावत राहते. पूर्वीचे हळदीकुंकवाचे समारंभ, पिढय़ान्पिढय़ा जतन केलेली आणि या दिवसासाठी उजळवलेली चांदीची उपकरणी, गौरीची आरास खुणावत राहते. परंपरांना, इतिहासाला दिला जाणारा राजकारणी भडक रंग मनावर अस्वस्थता वोळून आणतो. मनाच्या कोषात महात्मा गांधींचे शब्द निनादत राहतात.
‘माझ्या घराच्या उघडय़ा तावदानातून जगभरच्या इतर संस्कृतीच्या झुळुका आपल्या घरभर जरूर खेळल्या पाहिजेत. परंतु त्यापैकी कोणत्याही झुळुकेने झंझावाताचे रूप घेऊन मला पायापासून उखडवून टाकण्याचा प्रयत्न केला तर तो मात्र मला मान्य नाही.’
आजच्या भाषावर्गात आपण खाद्य संस्कृतीच्या संदर्भातली आणखी काही छोटी वाक्ये शिकणार आहोत. प्रसंग कल्पूया की तुम्ही जर्मनीमध्ये एका रेस्तराँमध्ये गेला आहात. बरोबर तुमचा मित्र/ मैत्रीण आहे. वेळ आहे दुपारची.

Guten Tag!
गुटन् टाग्!
शुभ दिन!
FÜr zwei Personen, bitte!
फ्यूॅर त्स्वाय् पेरसोनन्, बिटऽ!
दोघांसाठी (टेबल) हवे आहे.

Nehmen sie bitte Platz hier am Fenster!
नेह््मन् झी बिटऽ प्लाट्त्स हीअर आम फेन्स्टर!
आपण या इथे खिडकीजवळची जागा (टेबल) घेऊ शकता.

Die Speisekarte, bitte!
दी श्र्पाय्झऽ कार्टऽ बिटऽ
मेन्यू कार्ड प्लीज

Können Sie etwas Vegetarisches empfehlen?
क्योनन् झी एट्वास् व्हेगेटारिशस् एम्फेह््लन्?
आपण (आमच्यासाठी) काही शाकाहारी पदार्थाची शिफारस कराल का?

Ja, Sehr gern
या, झेह््र गेर्न!
हो, जरूर (अगदी आनंदानं)

Die Tomatensuppe und danach die
GemÜsepfanne!
दी टोमाटन् सुप्प उंड दानाख् दी गेम्यॅूझ्प्फान्न!
टोमॅटोचे सूप आणि त्यानंतर (तुम्ही) परतलेल्या मिश्र भाज्या (मेन कोर्स म्हणून) घेऊ शकता.

Das Klingt gut!
दास क्लींग्ट गूऽट!
वर्णनावरून तर छान वाटतंय.

Wir nehmen das
वियर नेहमन् दास.
आम्ही तेच घेतो (ऑर्डर करतो)
vaishalikar@web.de