Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

राजस्थानच्या वाळवंटाने व्यापलेल्या व एरवी रखरखाट असलेल्या या प्रदेशात सुवर्णाने मढलेले दिवस पाहायचे असतील तर ‘जैसेलमेर डेझर्ट फेस्टिवल’मध्ये देहभान विसरून स्वत:ला झोकून द्यावे असाच अनुभव मला व माझ्याबरोबर असलेल्या मुंबईच्या छायाचित्रकारांना आला. आधीच जैसेलमेर वाळवंटाच्या पठारांनी नटलेले शहर. त्यात माघी पौर्णिमेलाच आखलेला हा ‘डेझर्ट फेस्टिवल’. राजस्थानी नृत्य व लोकसंगीताने नटलेल्या व चांदण्याच्या प्रकाशात डुंबून गेलेल्या या रात्री अनुभवताना कुणाच्याही अंगावर रोमांच न उठले तरच नवल! फेस्टिवलच्या तीन दिवसांत बहुरंगी व बहुढंगी राजस्थानचे विविध पदर
 
पाहायला मिळाले आणि छायाचित्रकारांचे कॅमेरे सुखावले. राजस्थानला स्वत:च्या पारंपरिक पोशाखाचा व अंगावरच्या आभूषणांचा खूप अभिमान आहे याची प्रचीती या फेस्टिवलमध्ये वेळोवेळी येत होती. सवरेत्कृष्ट महिला व सवरेत्कृष्ट पुरुष स्पर्धेत रंगमंचावर उभे राहिलेले स्पर्धक पाहिले तरी त्यांच्या देखणेपणाची प्रचीती यावी. या वर्षी सवरेत्कृष्ट महिलाचे ‘मूमल’ पारितोषिक व सवरेत्कृष्ट पुरुषाचे ‘महेन्द्र’ पारितोषिक कुणाला मिळणार याची उत्सुकता विशेषत: स्थानिक लोकांना होतीच. रस्त्यावरून निघालेल्या मिरवणुकीत सजवलेल्या उंटांची लांबच लांब गेलेली रांग, रंगीबेरंगी पायघोळ घागरे घालून गिरक्या घेत बेभान नाचणारे स्त्री-पुरुष, डोक्यावर रंगीत घट घेऊन पारंपरिक गाणी गात जाणाऱ्या बायकांच्या रांगा, मिरवणुकीच्या अग्रभागी विविधांगी वाद्ये वाजवीत सदरा, धोतर व फेटय़ातील वादक, उंटांच्या गाडीत सजविलेले देखावे असे अनेक प्रकार पाहावयास मिळत होते.
या फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. त्यात उंटांच्या शर्यती, उंटावरून खेळला जाणारा पोलो यांचे जास्त आकर्षण लोकांना होते. जिथे साधे चालणे आम्हाला कठीण वाटत होते तिथे हे उंट बेभान धावणार होते. वाळवंटातून त्यांचे लांब पाय टाकून धावणे हे लक्षवेधी होते. राजस्थानी पुरुषांच्या वळणदार आकर्षक मिशा, त्यानी डोक्यावर चढविलेला रुबाबदार फेटा यांच्या स्पर्धा होत्या. या फेस्टिवलकरिता अनेक परदेशी पर्यटक वेगवेगळ्या भागातून आले होते. कमीत कमी वेळात फेटा बांधणे ही स्पर्धा परदेशी पाहुण्यांकरिताही होती. स्त्री-पुरुषांकरिता एकत्रित असलेल्या या पाहुण्यांच्या स्पर्धेत इंग्लंडच्या स्पर्धक स्त्रीने सर्वात अगोदर फेटा बांधला व प्रेक्षकांची वाहवा मिळविली. याव्यतिरिक्त देशी विरुद्ध परदेशी अशी रस्सीखेच, कबड्डी या स्पर्धाही खूप रंगल्या. लोकनृत्य व लोकसंगीत हे प्रकार राजस्थान संस्कृतीत खूप खोलवर रुजलेले आहेत. त्याचे विविध प्रकार इथे प्रेक्षकांना बघावयास मिळाले. याशिवाय पेन्टिंग, रांगोळी, भरतकाम, मातीकाम या गोष्टीही प्रदर्शनात मांडलेल्या होत्या. जोडीला कळसूत्री बाहुल्यांचे खेळही रोज होत होते.
जैसेलमेरचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे वाऱ्याच्या झोताने तयार होणाऱ्या वेगवेगळ्या आकारांच्या वाळूच्या टेकडय़ा. दूरवर पसरलेल्या वाळवंटाच्या पठारावर या टेकडय़ा फारच मोहक दिसतात. नक्षीदार लहरींच्या रांगा त्या सोनेरी वाळूवर उमटलेल्या असतात व त्यावरून होणाऱ्या उंटाच्या हालचाली खूप भावतात. सोनेरी प्रकाशाचे कवडसे त्या टेकडय़ांवर पडतात तेव्हा तर स्वर्गच खाली उतरलेला असतो. मावळतीचा सूर्य उंटाच्या लांबसडक पायाशी रेंगाळत राहतो. जसजसा सूर्य वाळूच्या पठारामागे बुडत जातो तसतसा वातावरणातला देखणेपणा वाढतच राहतो. एक मंतरलेली संध्याकाळ उपभोगायची असेल तर जैसेलमेरच्या या ‘साम सॅण्ड डय़ून्स’पुढे उभे राहून सूर्यास्त न्याहाळावयास यावे. राजस्थानात जैसेलमेर डेझर्ट फेस्टिवलबरोबरच ‘पुष्कर कॅमल फेअर’ व ‘बिकानेर कॅमल फेस्टिवल’ दरवर्षी भरत असतात, पण जैसेलमेर फेस्टिवलला जाणाऱ्या पर्यटकांना राजस्थानी नाचगाणी, उंटांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, पारंपरिक पोशाखातील आभूषणाने नटलेल्या महिला या लोभस गोष्टी तर आहेतच, पण त्याचबरोबर वाळवंटातील सॅण्ड डय़ून्सही पाहून डोळ्यांचे पारडे तुम्हाला फिटविता येईल आणि म्हणूनच या सॅण्ड डय़ून्स पाहावयास जैसेलमेरला प्रत्येकाने जरूरच भेट द्यावी.
श्रीकांत मलुष्टे
smalushte@hotmail.com