Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
वीर मुन्शी यांचं पेंटिंग प्रदर्शन
वीर मुन्शी हे गेली १७ वर्षे कलाक्षेत्रात आहेत. त्यांनी अनेक पेंटींग्ज, शिल्प, पब्लीक आर्ट प्रॉजेक्ट्स केले आहेत. सध्या भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात मुन्शी यांचे दोन कला प्रकार ठेवण्यात आले आहेत. ‘द चेम्बर’ ही दैनंदिन जीवनाचे प्रतिनिधीत्व करणारी चित्रे आणि ‘पंडित हाऊसेस’ हे छायाचित्र प्रदर्शन अशा दोन कलाप्रकारांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. १९ मार्च ते चार एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन संध्याकाळी ६.३० नंतर सर्वांसाठी खुले असेल.
स्थळ: ताओ आर्ट गॅलरी, द व्ह्यू, अ‍ॅनी बेझंट मार्ग.

फुलली काटेसावर
पक्षी मित्रांसाठी एक पर्वणी

मध्य आशिया व पूर्व युरोपातून स्थलांतर करून भारतात येणाऱ्या भोरडी मैना (Rosy startling) च्या शोधात मी वसई किल्ल्यात गेलो होतो. इथे ‘बटरफ्लाय ट्रेल’ नावाने प्रसिद्ध जागा आहे, या रस्त्यावर अनेक काटेसावरीची झाडे फुलांनी बहरून आली आहेत. या झाडांवर प्रामुख्याने दिसतात ते राखाडी कोतवाल, मलबारी मैना (Chestnut Tailed Starling), साळुंकी, कावळे व तांबट. काटेसावरच्या झाडावर असंख्य लाल फुलांबरोबर काही पोपटी, हिरव्या शेंगादेखील दिसतात. तांबट पक्ष्याची तुमच्याकडे पाठ असेल तर जणू काही ही शेंगच

 

आहे असा भास होतो. एका ठिकाणाहून कधी सुभग पक्ष्यांची मंजुळ शीळ, तर दुसरीकडून तांबट पक्ष्यांचा पुक पुक असा आवाज, साळुंकीचं ओरडणं तर कधी दोन दयाळ नरांचं स्वत:च्या हद्दीसाठी भांडण, हे सर्व एकाच वेळी घडत असताना तुम्ही पूर्णपणे संमोहित होऊन जाता. तहान, भूक, वेळ कसलंच भान राहत नाही. सूर्य देव वर येऊन उष्मा जाणवायला लागतो तशी जमिनीलगतची फुलपाखरांची दुनिया जागी होऊन अनेक फुलपाखरं तुमच्या आसपास फिरू लागतात. यामध्ये प्रामुख्याने असतात स्ट्राईप टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, सेलर, पिकॉक पँझी. यानंतर सुरू होते आपली तारेवरची कसरत, झाडावर बघू की, जमिनीलगतची फुलपाखरं पाहू!
इथे कावळ्यांचा थोडा त्रास होतो. आपल्या पाठीपाठी येऊन, काटेसावरवर बसलेल्या छोटय़ा पक्ष्यांना पळवून लावतात. एका राखाडी कोतवालाने कावळ्याची बराच वेळ पाठ काढून काटेसावरीच्या झाडापासून त्याला लांब हुसकावून लावले, तेव्हा मला फार आनंद झाला. मैना, राखाडी कोतवाल फुलातील मध किती नजाकतीनं पितात. उलट सुलट होत, फुलाला जरादेखील धक्का न लागू देता; तर या कावळेबुवांचा सगळीकडेच धसमुसळेपणा. मध पिताना हमखास फुलं खाली पडलीच पाहिजेत. या फुलांच्या खाली पडण्यातदेखील एक सुंदरता आहे. फुलांचं भिरभिरत खाली पडणं न विसरता येण्यासारखं, न वर्णन करता येण्यासारखं, प्रत्यक्ष अनुभवावं असं. तुम्ही एप्रिल, मे मध्ये साल वृक्षांचं जंगल असलेल्या कान्हा अथवा बांधवगडला गेलात तर साल वृक्षांची फुले झाडावरून खाली पडताना पाहण्याची संधी सोडू नका, ती तर काटेसावरीच्या फुलांपेक्षा सुंदर दिसतात.
मला जांभळ्या पुठ्ठय़ाच्या शिंजीर पक्ष्याचं हवेवर झुलणारं घरटं इथेच दिसलं. मादी घरटय़ामध्ये अंडी उबवायला बसली होती, पण ज्या भोरडी मैनेसाठी मी गेलो होतो ती काही दिसली नाही.
कसे जाल- वसई स्टेशन पश्चिमेला एस. टी. स्टँड आहे. तिथून किल्ला बंदर बसनं शेवटच्या थांब्यावर उतरायचं. तसंच पुन्हा मागं फिरायचं. डाव्या बाजूला विहीर आहे, नंतर रस्त्यालगत पांगाऱ्याचे फुललेले झाड आहे. वळणदार रस्त्यानंतर डाव्या बाजूला एक मातीचा रस्ता आहे, तिथून आंत जायचं. मात्र सकाळी ७.३० पर्यंत तरी इथं पोहोचायला हवं.
रत्नदीप पाटील