Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

मधुराला स्वयंपाकघरात फारसे कष्ट न करता, पटकन् होतील असे पदार्थ करायला आवडतात. तिची खासियत आहे मस्त चविष्ट बोंबिल फ्राय आणि रसगुल्ला विथ आईस्क्रीम ..

लहानपणी शाळेच्या गॅदरिंगमध्ये स्टेजवर काम करताना बाबांना (प्रदीप वेलणकर) प्रेक्षकात बसलेलं बघून घाबरून आत पळून जाणारी मधुरा ते आजची यशस्वी अभिनेत्री मधुरा वेलणकर हा तिचा प्रवास नक्कीच लक्षणीय आहे. तिने जेव्हा तिच्या लहानपणाचा हा किस्सा सांगितला तेव्हा क्षणभर विश्वासच बसला नव्हता.
तिच्याच शब्दात सांगायचं तर, ‘पुढे ही भीती कशी कमी होत गेली आणि मला या क्षेत्राचं आकर्षण वाटू लागलं हे कळलंदेखील नाही. मी सुरुवातीला एका मालिकेत बाबांबरोबर काम केलं होतं त्या वेळी जरा भीती वाटली होती, पण तीही प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंतच. त्यानंतर माझ्या नशिबानं मला मालिका, चित्रपटांतून चांगली कामं मिळत गेली आणि मग कधी

 

मागे वळून बघावंच लागलं नाही.’
आता मधुरा आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर उभी आहे. सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजीत साटमबरोबर तिचं नुकतंच लग्न झालंय. सध्या घर सांभाळण्यात मश्गुल असल्याने मधुरा नव्या चित्रपट किंवा मालिकात दिसत नाही.
घर सांभाळण्याची सुरुवातच मुळी स्वयंपाकघरापासून होते. तिला स्वयंपाक करण्याची किती आवड आहे? सांगताना ती म्हणते, ‘आवड आहे पण कधी वेळ आलीही नाही आणि कामापायी वेळ झालाही नाही, त्यामुळे फारसं स्वयंपाकघरात काम करणं नाही झालं. सासरी, नुकतंच लग्न झालं असल्यानं अजून फारशी जबाबदारी पडलेलीच नाही. माहेरी सकाळी शूटिंगला निघताना आईने भरून दिलेला बोर्नव्हिटा घातलेला दुधाचा कप आणि जो काही गरम नाश्ता असेल तो करून निघायचं. मला आईने जर दुधाचा कप भरून दिला तर मी दोन-चार कपसुद्धा दूध पिईन, पण आपणहून हाताने एक कपही घेणार नाही! तशीच मला आईच्या हातची मटकीची उसळ खूपच आवडते.’
लग्न झाल्यावर नवऱ्यावर काही खास प्रयोग करून बघितलेस की नाही? ‘अजून तरी नाही, पण तसे मी स्वयंपाकातले प्रयोग करून बघितले आहेत. पहिला प्रयोग केला तो पाचवीत असताना. तेव्हा आई शाळेत नोकरी करत असे. ती शाळेतून दमून येते म्हणून मी पोळ्या करण्याचा घाट घातला. कणिक फ्रिजमध्ये भिजवलेलीच होती. जाड, कडक अशा काही तरी विचित्र पोळ्या होऊ लागल्यावर आणखी कणिक वाया न घालवायचा निर्णय घेऊन दोन पोळ्यांतच तो प्रयोग बंद केला. नंतर मी जे काही थोडंफार करू लागले ते बरं करते. मी एकदा चॉकलेट ब्राऊनी करून बघितलं होतं ते छान झालं होतं म्हणून माझ्या मामाच्या वाढदिवसाला सगळ्यांनी मला ब्राऊनी करण्याचा आग्रह केला. मी ते केलं, छान सजवलं वगैरे पण जेव्हा मामांनी ते कापायला घेतलं तेव्हा समजलं की तो इतका कडक झाला आहे की कापलाच जात नाहीये. त्या दिवसापासून आजतागायत कधीही मी चॉकलेट ब्राऊनी करण्याच्या फंदात पडलेली नाही.’
स्वयंपाकघरात रमायला तिला वेळच मिळाला नाही, इतकी ती अभिनय क्षेत्रात व्यस्त होती. सध्या जरी ती नवीन काही करत नसली तरी तिने केलेले चित्रपट लवकरच झळकतील यावर तिचं लक्ष लागलं आहे. जसा तिची वेगळी भूमिका असणारा बहुचर्चित ‘मेड इन चायना’ चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर झळकतो आहे.
या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणते, ‘मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ही भूमिकादेखील वेगळी आहे. यात मी प्राची जगदाळे या परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या महत्त्वाकांक्षी मुलीची भूमिका करते आहे. तिचे वडील आमदार असतात. वडील जी काही बरीवाईट कामं करत असतात त्यात मी त्यांना मदत करत असते ती आपल्याला त्यांच्यानंतर या जागी उभं राहायचं आहे या एकाच महत्त्वाकांक्षेनं. पुढे अशी वेळ येते की तिच्या तितक्याच महत्त्वाकांक्षी भावांना डावलून ती निवडणुकीला उभी राहते. इथे चित्रपटात माझा पूर्ण मेकओव्हर होतो. परदेशाहून शिकून आल्याने पाश्चिमात्य राहणीचा प्रभाव असणाऱ्या या मुलीचं निवडणुकीला उभं राहताना पूर्ण भारतीय मुलीत परिवर्तन होतं आणि मग तिचं आयुष्यच कसं बदलत जातं. अगदी टिपीकल नायिकेपेक्षा वेगळी अतिशय प्रॅक्टिकल भूमिका आहे ही. त्यामुळे याला ग्रे-व्हाईट दोन्ही शेड्स आहेत.’
संतोष कोल्हेलिखित-दिग्दर्शित या चित्रपटाने केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रादेशिक भाषेतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून पुरस्कार मिळवला आहे. याशिवाय बहुतेक सगळ्या मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाचं विविध विभागात नामांकनही झालं आहे. आता तो प्रेक्षकांच्याही पसंतीस पडेल अशी मधुराला अपेक्षा आहे.

रसगुल्ला विथ आईस्क्रीम
बाजारातून तयार व्हॅनिला आईस्क्रीम आणून ते एका भांडय़ात काढून घ्या. थोडंसं वितळू लागलं की त्यात अंगुरी रसगुल्ले घाला. जर अंगुरी रसगुल्ला नाही मिळाला तर मोठा रसगुल्ला पाक काढून तुकडे करून घाला. आंब्याच्या छोटय़ा फोडी करून त्या वरून घाला. यात स्ट्रॉबेरीसारखी इतर सिझनल फळही छान लागतात, पण आंब्याची सर बाकी कशाला येत नाही. मग तो बाऊल परत सेट करायला फ्रिझरमध्ये ठेवून द्या. सव्‍‌र्ह करताना परत वरून थोडय़ा आंब्याच्या छोटय़ा फोडी घाला. पक्वान्न म्हणजे करण्याचा मोठाच घाट असतो, हे डेझर्ट करायला तर सोपं आहेच आणि चवीलाही मस्त!

बोंबिल फ्राय
बोंबिल स्वच्छ धुऊन घ्यावेत. ते ताटात घेऊन त्याचं पाणी काढून न टाकता त्याला हळद, मीठ, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट आणि चिंचेचं पाणी लावून १०-१५ मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं. तांदळाच्या पीठात थोडासा रवा, गरम मसाला, तिखट, मीठ घालून त्याचं भज्यांना भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचं. या पीठात बोंबिल घोळवून तळून घ्यायचे. बोंबलाचं पाणी तसंच ठेवल्याने ते आतून त्याचा मऊसरपणा तसाच राहतो आणि वरून छान कुरकुरीत होतात.

मधुरा अशी आहे..

तुझ्या व्यक्तिमत्त्वातलं बलस्थान?
मीच नाही तर आम्ही सगळेच वेलणकर खूप हळवे आहोत आणि यातूनच कठीण प्रसंगी ठामपणे एकमेकांसाठी उभं राहाण्याची आमची क्षमता वाढते.
तुझ्या स्वभावातला तुला आवडणारा आणि नावडणारा गुण?
मी स्वत:ला विसरून दुसऱ्याला मदत करायला धावते, ज्याचा कधी-कधी खूप त्रास होतो, ते मला नाही आवडत आणि आवडणारा गुण म्हणजे माझं सहसा कोणाशी भांडण होत नाही.
आयुष्यातला अविस्मरणीय क्षण?
तसे अनेक आहेत पण आजच्या घडीला माझं लग्न!
आवडतं पुस्तक? लेखक?
रारंगढांग आणि तोतोचान. आवडते लेखक पुल, शिरवाडकर आणि श्याम मनोहर
तुला मिळालेली संस्मरणीय कॉम्प्लिमेंट? आणि टीका?
एक गृहस्थ मला म्हणाले होते, आम्ही जिथे तुझा फोटो किंवा चेहरा बघतो ती मालिका, चित्रपट असेल किंवा एखाद्या नियतकालिकातला तुझ्यावरला लेख ते आवर्जून वाचतो, बघतो कारण ते उत्तमच असेल याची आम्हाला खात्री असते. आम्ही नुकताच मराठी तारका म्हणून शो केला होता. त्यात मी सुलोचना दीदींच्या ‘खुलवते मेंदी’ या गाण्यावर नृत्य केलं होतं. दीदी तिथे प्रत्यक्ष हजर होत्या. त्या म्हणाल्या हे गाणं बघताना मला माझी आठवण झाली. यापेक्षा चांगलं इतर कोणी करूच शकणार नाही. टीका म्हणायची तर फार मोठी टीका कधी झाली नाही आणि जी काही झाली असेल ती लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून धडा घेणं मी पसंत करते.
मधुरा म्हणजे?
चारचौघींसारखी! पुढे सांगायचं तर लोकांवर प्रेम करायला आवडणारी.
तुला जर तीन गोष्टी मागण्याचं वरदान मिळालं तर काय मागशील?
मला देवानं खूप दिलंय, जे दिलंय त्याची किंमत करण्याची बुद्धी द्यावी, ज्यायोगे मला जगातल्या विविध गोष्टींचा आनंदाने अनुभव घेता येईल.
पुढच्या जन्मी कोण व्हायला आवडेल?
अर्थातच मधुरा वेलणकर.. प्रदीप आणि रजनी वेलणकरांची मुलगी!
मनीषा