Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
विविध

भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याला गांधीजीही अनुकूल होते..
तिरुवनंतपुरम, १८ मार्च/पी.टी.आय.

रात्री-बेरात्री रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर तसेच वाहनांवर भुंकणारे भटके कूत्रे हा नागरिकांसाठी मोठा त्रास असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही एका प्रकरणात जर भटके कूत्रे त्रासदायक ठरत असतील तर त्यांना ठार मारावे या मताचे होते असे स्पष्ट नमूद करणारी जनहित याचिका येथील एका ८८ वर्षीय गृहस्थाने केरळ राज्याच्या मानवाधिकार आयोगाकडे दाखल केली आहे. ८८ वर्षीय के. ई. मामेन या गृहस्थाने ही याचिका दाखल केली असून १९२६ साली अहमदाबादमध्ये या भटक्या कूत्र्यांवरून उठलेल्या एका वादाचा उल्लेखही त्यांनी त्यामध्ये मुद्दामहून केला आहे.

जेडला हवी आहे शेवटची पार्टी..
लंडन, १८ मार्च / पी.टी.आय.

गेले काही दिवस कर्करोगाने आजारी असलेली व मृत्यूच्या दारात पोहोचलेली अभिनेत्री जेड गुडी हिने आपल्यासाठी एक शेवटची जंगी पार्टी आयोजित करण्याची इच्छा कुटुंबियांकडे व्यक्त केली आहे. मला सर्वाचा हसत हसत निरोप घेण्याची इच्छा असून मरणाला आपण घाबरत नसल्याचेही जेडने बोलून दाखविले. मृत्युच्या दारात असलेल्या जेडला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी येथे एकच गर्दी केली आहे. या जगात आलेल्याचा मृत्यू अटळ असून मला तो थोडा लवकर येत असल्याचे २७ वर्षीय जेडने सांगितले. ‘बिग ब्रदर’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये वादग्रस्त विधाने केल्याने जेडवर टीकेचा भडिमार झाला होता.

मेघालयमध्ये राष्ट्रपती राजवटीचा निर्णय
नवी दिल्ली, १८ मार्च/पीटीआय

मेघालय विधानसभेवर मंगळवारी अत्यंत वादग्रस्त पद्धतीने विश्वासदर्शक ठरावावर मतदान पार पडून अल्पमतात गेलेले राज्य सरकार वाचविण्यात आले. या सर्व प्रकारावर कडक टीका झालीच शिवाय राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा साफ कोलमडल्या आहेत असा अहवाल राज्यपालांनी केंद्र सरकारला पाठविला होता. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेऊन मेघालयमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. दरम्यान मेघालयमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात उद्या याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पी. ए. संगमा यांनी सांगितले.

दहशतवादविरोधी कारवाईची व्याप्ती वाढविण्याचा अमेरिकेचा विचार
न्यूयॉर्क, १८ मार्च/पी.टी.आय.

पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या तालिबानींचा बीमोड करण्यासाठी सुरु असलेल्या कारवाईची व्याप्ती वाढविण्याचा ओबामा सरकार विचार करीत आहे. पाकिस्तानच्या आदिवासी भागाशिवाय बलुचिस्तानमध्येही तालिबानी अतिरेक्यांचे अनेक तळ असून त्यावर हल्ला चढविण्याचा अमेरिकेचा विचार आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील विद्यमान परिस्थितीसंदर्भात गेल्या काही आठवडय़ात दोन महत्वाचे अहवाल अमेरिकी अध्यक्षांना सादर करण्यात आले.

२१० दहशतवाद्यांना मुक्त करण्याची तालिबानची मागणी
इस्लामाबाद, १८ मार्च/पी.टी.आय.
तालिबानच्या प्रभावाखाली असणाऱ्या वायव्य सरहद्द प्रांतातील मूलतत्त्ववादी संघटनांसोबत शस्त्रसंधी कराराचा भाग म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या २१० दहशतवाद्यांना तातडीने मुक्त करण्याची मागणी तालिबान्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात वायव्य सरहद्द प्रांतामधील सरकार आणि स्वात खोऱ्यातील ‘तेहरिक-त-निफाझ-ए- शरिआ मुहंम्मदी’ यांच्यात झालेल्या शांतता कराराचा भाग म्हणून कैदेत असणाऱ्या या तालिबान्यांची मुक्तता केली जावी, असे तालिबानचे म्हणणे आहे. वायव्य सरहद्द प्रांताच्या सरकारने यापूर्वीच १२ तालिबान्यांना कैदेतून मुक्त केले आहे.

पाकिस्तानने मुंबई हल्ल्याबाबत केलेली चौकशी वरवरची-भारत
नवी दिल्ली, १८ मार्च/पीटीआय

पाकिस्तानने मुंबई हल्ल्यासंदर्भात केलेली चौकशी तसेच त्यासंदर्भात भारताला पुरविलेली माहिती ही वरवरची व तुटपूंजी असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानने मुंबई हल्ल्यासंदर्भातील चौकशीबाबत ठोस माहिती द्यावी असे नमुद करून भारताने म्हटले आहे की दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानला संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

कर्नाटकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापे
कोल्हापूर, १८ मार्च / विशेष प्रतिनिधी

कर्नाटकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या बेळगाव, कोल्हापूर व मुंबई येथील निवासस्थानांवर बुधवारी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुमारे ५० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.

दोन बहिणींना जिवंत जाळले
संबलपूर, १८ मार्च / पी.टी.आय.

एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या माथेफिरू तरुणाने दोन किशोरवयीन बहिणींना पेट्रोल ओतून जिवंत जाळले. ओरिसाच्या तुरेनिकतिमल येथे हा भयंकर प्रकार घडला. जगेश्वर माझी या तरुणाचा स्नेहलता धाना (१५) आणि संजुलता धाना (१३) या दोन बहिणींवर डोळा होता. तो वारंवार त्यांना त्रास द्यायचा. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दोघींनाही संपवण्याचे ठरवले. दोघी बहिणी जंगलातून लाकडे घेऊन परतत असताना त्याने दोघींनाही रस्त्यात गाठून कॅनमधील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले. पेट घेतल्यानंतर दोघीही जीवाच्या आकांताने ओरडू लागल्या. त्यांचे ओरडणे ऐकून गावकरी धावत आले. मात्र, तोवर वेळ निघून गेली होती. दोघीही ७० टक्क्यांपेक्षा जास्त जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्नेहलता जागीच मरण पावली तर संजुलताने राऊरकेला इस्पितळात प्राण सोडला. या दोन्ही मुली अनाथ होत्या आणि जंगलातील लाकडे विकून उदरनिर्वाह करत होत्या. या घटनेनंतर माझी फरार आहे.

भारताने दिलेल्या सीडी मुंबई हल्ला कटातील आरोपींना दाखविणार
इस्लामाबाद, १८ मार्च/पीटीआय

मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असल्याबद्दल पाकिस्तानात अटक केलेला लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी लखवी, झहर शाह व अबु अल कामा व अन्य आरोपींना या हल्ल्यासंदर्भात भारताने पुराव्यादाखल दिलेल्या सीडी दाखविण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपासास प्रारंभ होईल. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हिस्टिगेशन एजन्सीच्या विशेष तपास विभागाने लखवी, शाह व अल कामा यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती दहशतवादविरोधी न्यायालयाला केली होती. त्याप्रमाणे न्यायालयाने लखवी व शाह यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. पाकिस्तानच्या ३० प्रश्नांना दिलेल्या उत्तरासोबत भारताने मुंबई हल्ल्यासंदर्भातील काही सीडीदेखील त्या देशाला दिल्या होत्या. या सीडी आता या आरोपींना दाखविण्यात येतील व नंतर पुढील तपासास प्रारंभ होईल.

त्रिवेणी रॅगिंग प्रकरणी तडजोडीचे प्रयत्न
गुंटूर, १८ मार्च / पी.टी.आय.
गुंटूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्रिवेणी नामक विद्यार्थिनीला रॅगिंगच्या नावाखाली कपडे काढून नाचण्यास सांगितल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाच विद्यार्थिनींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थिनींच्या पालकांनी त्रिवेणीच्या मातापित्यांना सदर प्रकरणात पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्याची विनंती केली असून तडजोडीने प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पाचही विद्यार्थिनींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.