Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

प्रयत्नांची पराकाष्ठा हवी
दशमांत गुरू, राहू लाभांत बुध, मंगळ यांचे सहकार्य मिळूनही मेष व्यक्तींना काही विभागात यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शनी-मंगळ समोरासमोर आहे. शुक्र, रवी व्ययस्थानी असल्याने संशयाने कृतीला विलंब होण्याचा संभव आहे. त्यात आर्थिक प्रश्नांचा समावेश होऊ शकतो. चंद्राच्या शुभभ्रमणाने व्यापार, बढती, बदली, राजकारण यातील घडामोडींना अपेक्षित कलाटणी मिळेल.
दिनांक : १८ ते २१ दरम्यान त्याची प्रचीती यावी.
महिलांना: प्रवास कराल. समाजात मान मिळेल.

प्रगतीचा काळ
भाग्यात गुरू, राहू, दशमांत बुध, मंगळ, लाभात सूर्य, शुक्र अशाच ग्रहकाळांत विचारांमध्ये नवा प्रवाह प्रकटतो. कृती यशस्वी होतात आणि कर्तृत्वाच्या नव्या नव्या बाजू प्रकाशात येत राहतात. रविवारच्या चंद्र-रवी नवपंचम योगापासून या नवकाळास प्रारंभ होत आहे. चतुर्थातील शनीच्या दुष्परिणामांची धार बरीच कमी होत राहील. बुध शनी प्रतियोगात कागदपत्रांचा व्यवहार, शासकीय प्रकरणे घाईगर्दीत उरकू नयेत.
दिनांक : १६, १७, २१ शुभ काळ.
महिलांना : सांसारिक समस्या सुटतील.

श्रेष्ठत्व सिद्ध होईल
भाग्यात बुध, मंगळ, दशमांत रवी, शुक्र पराक्रमी शनी श्रेष्ठत्व सिद्ध करता यावे एवढी ग्रहांची अनुकूलता मिथुन व्यक्तींना लाभणारी असल्याने रविवारच्या चंद-्र रवी नवपंचम योगापासून हालचालींना वेग येईल. निर्णय अचूक ठरू लागतील. कृतींना यश मिळेल. व्यापार, राजकारण, कलाप्रांत, विज्ञान, शिक्षण यात त्याची प्रचिती येईल. अष्टमातील गुरू, राहूमधील व्यत्यय कल्पकतेने दूर करता येईल; हाच योग परमेश्वरी चिंतनातून आनंद देतो.
दिनांक: १५, १८, १९, २० शुभ काळ.
महिलांना : स्थगित योजना मार्गी लागतील.

अपेक्षित टप्पा अवघड
सप्तमात गुरू, राहू भाग्यात शुक्र, रवी यांच्यामुळे नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील, परंतु अपेक्षित यशाचा टप्पा गाठणे; साडेसाती व अष्टमांत बुध- मंगळ असेपर्यंत अवघड ठरेल. तरीही ध्येय कार्यापासून विचलित होऊ नका. अल्पावधीतच नवे मार्ग दृष्टिपथात येणे शक्य आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्योगांचे नवे स्वरूप ठरवले जाईल. शत्रू आणि शासन यांचा हुशारीने बंदोबस्त करणे आवश्यक राहील.
दिनांक : १६, १७, २१ शुभ काळ.
महिलांना : सामोपचाराने समस्या सुटतील.

प्रतिक्रिया त्रस्त करतील
साडेसाती, अनिष्ट गुरू राहू, अष्टमांत शुक्र रवी या ग्रहांमधील प्रतिक्रिया सिंह व्यक्तींना अनेक कार्यप्रांतात त्रस्त करतील. ग्रह पुढे सरकू देत नाहीत. प्रतिष्ठा मागे वळू देत नाही. अशा चक्रात बुध, मंगळाचे सहकार्य रागरंग बघून उपयोगात आणाल तरच आहे तेथे इज्जतीनं उभं राहता येईल. शनिवारच्या चंद्र-रवी शुभयोगाच्या आसपास काही प्रकरणे सामोपचाराने समाप्त करता येतील.
दिनांक : १५, १९, २०, २१ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न करा, मार्ग सापडेल.

प्रयत्नांत कसूर नको
साडेसातीचा शनीसमोर बुध मंगळ असताना तीव्र परिणामांचा ठरतो. त्यामुळे सरळ कार्यातही नसते अडथळे तयार होतात. त्यात विश्वासू मंडळींचाही समावेश होतो. परंतु पंचमात गुरू राहू आहेत. सप्तमात शुक्र रवी आहे, प्रयत्नांत कसूर करू नका. शनिवारच्या चंद्र रवी शुभयोगापर्यंत अपेक्षित स्थळी पोहचू शकाल. व्यापार बढती, बदली, राजकारण, प्रपंच यात यशासाठी युक्तीचाच उपयोग अधिक होऊ शकेल. प्रवास कराल.
दिनांक : १५, १६, १७, २१ शुभ काळ.
महिलांना : सामना करूनच सफलता मिळेल.

संधी कारणी लावा
पंचमात बुध, मंगळ लाभात शनी यांच्यातील अनुकूल प्रतिसाद अचूक टिपले आणि संधी कारणी लावल्या तर शनिवारच्या चंद्र-रवी शुभयोगांच्या आसपास प्राप्तीपासून प्रपंचापर्यंत शांती प्रस्थापित करता येईल. चतुर्थात गुरू, राहू असल्याने चुका, प्रलोभन, साहस असले प्रकार आपत्तीचे प्रवेशमार्ग निर्वेध करतात याचे विस्मरण नको. नोकरीत अधिकारी, व्यापारांत गिऱ्हाईक, राजकारणात सहकारी यांना सध्यातरी नाराज करू नका. प्रकृतीची पथ्ये मोडूच नका.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : मुलांवर लक्ष ठेवा.

यशमार्ग निर्वेध होतील
पराक्रमी गुरू, राहू, पंचमात शुक्र, रवी दशमात शनी, रविवारच्या चंद्र-रवी नवपंचम योगापासूनच वृश्चिक व्यक्तींच्या हालचालींना वेग येईल. यशाचे मार्ग निर्वेध होऊ लागतील. त्यामुळे काळजीचे कारण नाही. नवी नवी मंडळी भेटतील. त्यांच्या संपर्कातून मिळणाऱ्या माहितीमधून नव्या कृतीची ठिकाणे पक्की करू शकाल. शनिवारच्या चंद्र-रवी शुभयोगापर्यंत या प्रवासात चतुर्थातील बुध, मंगळ खो घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु विचलित होऊ नका. तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा. बलवान ग्रहांच्या आधाराने अपेक्षित ठिकाणी पोहोचता येईल. विनाकारण काळजी करू नका. कायद्याची बंधने मात्र झुगारू नका. रहदारीत सावधानता बाळगा.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : प्रपंचातील प्रश्न सुटतील. प्रकृती सुधारेल. प्रवास कराल.

आघाडीवर ठेवणारी ग्रहस्थिती
पराक्रमी बुध, मंगळ, मीन, शुक्र, भाग्यांत शनी आणि गुरू, राहूचे सहकार्य ही ग्रहस्थिती धनू व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर ठेवणारी आहे. रविवारच्या सूर्य-चंद्र नवपंचम योगापासून त्याची प्रासाद चिन्हे प्रत्ययास येत राहतील. या ग्रहस्थितीचे परिणाम विज्ञान, कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने दिसून येतील. नोकरीचा प्रश्न सुटेल आणि व्यापारात पैसा मिळेल. त्यामुळे अवास्तव चिंता करू नका. बुध, शनी प्रतियोगांत आश्वासन, कागदपत्र, शोधकार्य यात मात्र सतर्क राहावे लागते.
दिनांक : १८ ते २० शुभ काळ.
महिलांना : समाजात सन्मान मिळतील.

समाधानकारक प्रवास
राशीस्थानी गुरू, राहू पराक्रमी, शुक्र, रवी कुंभ राशीत अशी ग्रहस्थिती आहे. बुध, मंगळ या ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आपला अधिकाधिक प्रवास समाधानाचा होणार आहे. अष्टमातील शनी आणि बुध-शनी प्रतियोग यांनी प्रवासात व्यत्यय आणू नये यासाठी सत्य आणि संयम यांचं संरक्षणच उपयुक्त ठरेल. आर्थिक, सामाजिक, प्रापंचिक, व्यावसायिक क्षेत्रांत तुमच्या प्रतिष्ठेला कोणताही धोका पोहोचणार नाही. मात्र तुमची कोणतीही अवास्तव कल्पना कृतीत आणता येणार नाही हे पक्के ध्यानात ठेवा. देवधर्म मन:शांतीसाठी उपयुक्त ठरेल.
दिनांक : १५, १६, १७, २१ शुभ काळ.
महिलांना : प्रिय आप्तांच्या भेटी होतील. प्रकृती सुधारेल. समाजात प्रभाव वाढेल.

गाडी पुढे सरकेल
राशीस्थानी बुध, मंगळ, मीन राशीत आहे. शुक्र, रवी सप्तमात शनी याच ग्रहांचा लाभ उठवून कुंभ व्यक्तींना व्यवहाराची गाडी कमी-अधिक वेगाने पुढे घेऊन जाता येईल. गुरू, राहूचे अशुभ परिणाम आणि बुध- शनी प्रतियोग यामुळे वेग सारखा राहिला नाही तरी इभ्रतीला धोका पोहचणार नाही. मंगलकार्ये ठरतील, तीर्थयात्रा संभवतात. नवीन उपक्रमांचा आरंभ होईल. व्यापारी अंदाज अचूक ठरतील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : १५ ते २० गाडी पुढे घेऊन जाता येईल.
महिलांना : सतर्क राहून प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल.

सतर्क राहा, यश मिळेल
राशीस्थानी शुक्र, रवी, लाभात गुरू, राहू अशी ग्रहस्थिती आहे. मीन व्यक्तींचा प्रभाव प्रस्थापित करणाऱ्या या ग्रहांच्या कृती कार्यामध्ये व्ययस्थानचे बुध, मंगळ व्यत्यय आणणार असल्याने शनिवारच्या चंद्र, रवी शुभयोगापर्यंत सतर्क राहूनच कार्यभाग साधावा लागणार आहे. व्यापारी सौदे, सामाजिक चळवळी, प्रापंचिक जबाबदाऱ्या महत्त्वाची खरेदी-विक्री यांचा त्यात समावेश राहील. प्रवासात घाईगर्दी करूच नका. असली पथ्ये, यश सोपे करण्यास उपयुक्त ठरतील. भक्तिमार्ग प्रसन्नता देईल.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न-प्रगतीच्या समन्वयासाठी संयम उपयुक्त ठरणार आहे.