Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

दुसरा गजलनवाज
रिअ‍ॅलिटी शो काही ठराविक काळापर्यंत ठीक आहे.. त्या कालावधीत तुम्ही अक्षरश: सेलिब्रिटी असता. लोकं तुमच्या सह्या घेतात, जिकडे जाल तिकडे कौतुक होते, अभिनंदनाचा वर्षांव होतो, मोठमोठे हेर्डिग्ज लागतात, हातात पैसा खुळखुळायला लागतो.. पण नंतर काय?\ चार-पाच महिन्यांचा तो कालावधी संपल्यानंतर सगळी नशा उतरते. सेलिब्रिटी पुन्हा जमिनीवर येतो, लोकल ट्रेनने प्रवास करू लागतो, आपल्याला आता खूप काम मिळेल ही आशा फोल ठरायला लागते. या इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळविण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्याच्या आयुष्यात ‘स्ट्रगल’चा दुसरा अध्याय सुरू होतो. ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून बाहेर पडलेल्यांमध्ये एक-दोन अपवाद सोडता आज सगळ्यांची हीच अवस्था आहे. कार्यक्रम भरपूर आहेत, पैसाही मिळतोय. परंतु जी स्वप्ने घेऊन या मायानगरीत दाखल झालो होतो ती स्वप्ने पूर्ण होण्यास आजही अपार मेहनत करावी लागतेय.. इथे काम आहे, पण त्यासाठी तुमचे कॉन्टॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. आता आपण ‘स्टार’ झालो आहोत. कामं आपल्याकडे स्वत\:हूनच चालून येतील, अशी वृत्ती ठेवाल तर तुम्ही इंडस्ट्रीमधून फेकले जाणारच. कोणताही मोठा संगीतकार तुमच्याकडे स्वत:हून येणार नाही. तुम्हालाच त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. काम मागण्याची लाज बाळगण्याचे काहीएक कारण नाही. कारण तुम्हाला शेवटी याच फिल्डमध्ये नाव कमवायचे आहे.. ही खंत आहे अशाच एका ‘रिअ‍ॅलिटी शो’मधील एका गुणवान गायकाची.. विजय गटलेवार याची! विजय गटलेवार हा ‘झी सारेगमप’च्या अंतिम फेरीतला एक स्पर्धक. ज्या स्पर्धेत अभिजीत कोसंबी महागायक झाला त्यावेळी गटलेवार अंतिम पाचजणांपर्यंत पोहोचला होता. विदर्भावर नेहमीच अन्याय होतो, विदर्भाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते, हे राजकारण्यांच्या बाबतीत ठीक असले तरी गटलेवारच्या वाटय़ाला मात्र कधी ही भावना आली नाही. चंद्रपूरच्या या गायकावर ‘सारेगमप’च्या काळात उभ्या महाराष्ट्राने प्रेम केले. त्याचा गाण्याचा बाज, त्याची चिकाटी, मेहनत ही तमाम प्रेक्षकांना दिसत होती. सारेगमपच्या ‘डेंजर झोन’मध्ये असतानाही गटलेवारने स्वत: कंपोझ केलेली इलाही जमादार यांची ‘आयुष्यावर जबरदस्त मी प्रहार केला, ओठ शिवूनी मृत्यूशी मी करार केला’ ही गझल गाण्याचे धाडस केले आणि त्यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आले.

चॉईस इज युवर्स
अनुभव दंगलग्रस्तांचे
‘फिराक’ या उर्दू शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे ‘शोध’ आणि दुसरा अर्थ विभागणी. दंगलीसारख्या घटनांमध्ये माणूस स्वत:चाच शोध घेत असतो. दंगल, फाळणी इत्यादी विषयांवर आतापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. ‘बॉम्बे’, ‘परझानिया’, ‘१९४७ - अर्थ’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’ इत्यादी. यापैकी प्रत्येक चित्रपटात हिंसेला बळी पडलेली माणसे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या भावना चित्रित करण्यात आल्या आहेत. दंगलीसारख्या घटनेत भिन्नधर्माच्या दोन मैत्रिणींमधील नाते, पती-पत्नी, लहान मुले, शोषित समाजामध्ये जागृत झालेली बदल्याची मानसिकता, त्यातून घडणारी हिंसा इत्यादींचे चित्रण येते. ‘फिराक’ ही सुद्धा गुजरातच्या दंगलीच्या पाश्र्वभूमीवर घडलेली कथा आहे. विविध प्रसंगांमध्ये मानवी भावभावनांची होणारी गुंतागुंत या चित्रपटात टीपण्यात आली आहे. नंदीता दासचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न. एक सक्षम अभिनेत्री म्हणून नंदिता दासची नेहमीच प्रशंसा होत आली आहे. तिच्या दिग्दर्शकीय प्रयत्नाला सुद्धा ‘एशियन फस्टिवल ऑफ फर्स्ट फिल्म्स’मध्ये या चित्रपटाला सवरेतकृष्ट चित्रपट, पटकथा, परपल ऑर्किड पुरस्कार इत्यादींनी गौरविण्यात आले आहे. इतरही काही पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत. नसीरुद्दीन शहा, परशे रावल, रघुवीर यादव, दीप्ती नवल, अमृता सुभाष इत्यादी कसलेले अभिनेते या चित्रपटात आहेत. केवळ विनोदी चित्रपटांचा अट्टाहास नसणाऱ्यांसाना हा चित्रपट एक चांगला अनुभव देऊन जाईल, अशी अपेक्षा आहे.
स्त्रीभ्रूणहत्येवरील ‘चिंगी’
प्रेक्षक चित्रपट पाहायला का जातो? मनोरंजनासाठी असे उत्तर असेल तर मनोरंजन म्हणजे काय? हा अजून एक प्रश्न उभा राहतो. केवळ हसणे की विचारमंथन करायला लावणे? समाजाला भेडसावणाऱ्या चित्रपटांवर आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट तयार करण्यात आले आहेत. दर दहा चित्रपटांपैकी एक चित्रपट स्त्रीच्या संघर्षांवर असतोच. स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील ‘चिंगी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी दाखल होत आहे. पहिला मुलगाच व्हावा या हट्टाने पेटलेली सासरची माणसे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या भावनिक परिस्थितीत असलेली स्त्री, असे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. गिरीजा ओक, मिलिंद गवळी, रवींद्र बेर्डे इत्यादी कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. राज इसरानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कथेत नावीन्य नसले की चित्रपटाचा कस दिग्दर्शकीय हाताळणीवर लागतो. हा चित्रपट समीक्षण वाचायच्या आधीच पाहायचा की नंतर हा प्रश्न आहे. पण याचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधायचे आहे.