Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार
राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर!

मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांंमध्ये ताकद वाढल्याचा दावा करीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून गेल्या पाच वर्षांंमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी व विजयी जागांमध्ये काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. काँग्रेसला सरासरी २५ टक्के तर राष्ट्रवादीला २२.५ टक्के मिळाली आहेत. पाच वर्षांंच्या काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या झालेल्या निवडणुकांचा अहवाल राज्याचे निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी आज प्रसिद्ध केला.

‘शिस्तबद्ध’ पक्षाची बैठक.. ‘बीड’चे सरदार अजून आलेले नसतात. त्यांच्या उशिरा येण्याची सगळ्यांनाच सवय झालेली असते. नागपूरकर सरदार, पुण्यातील कसबेकर आणि एक युवा सिंधुदुर्गकर हे पक्षाचे तीन ‘कॉम्प्लान बॉय’ आणि पुण्यातील एक प्रा. अशा साडेतीन शहाण्यांची खलबते चालू असतात. विषय अर्थातच पुण्याच्या सरदारकीचा. कोणत्याही परिस्थितीत ‘बीड’करांच्या मित्राला पुण्याची सरदारकी मिळू द्यायची नाही, त्यासाठी काय करावं लागेल. हा चर्चेचा विषय असतो. ‘पूनम का चांद’ मुंबईतून उगवू नये यासाठी त्यांनी लावलेली फिल्डिंग यशस्वी झालेली असते.

बडय़ा नेत्यांना अतिरेक्यांकडून धोका
नवी दिल्ली, १९ मार्च/खास प्रतिनिधी

यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, तरुण नेते राहुल गांधी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांचे पिता फारुक अब्दुल्ला आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्यावर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारांनी या नेत्यांच्या सुरक्षेविषयी अतिरिक्त काळजी घ्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

ठाणे आणि कल्याणचे घोडे कोठे अडले?
मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

शिवसेनेने पहिल्या टप्प्यातील यादीत ठाण्याचे आनंद परांजपे वगळता विद्यमान सात खासदारांची (उर्वरित पाच जणांना उमेदवारी दिली जाणार नाही) उमेदवारी जाहीर केली आहे. नेमकी परांजपे यांचीच उमेदवारी का जाहीर झाली नाही, याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. ठाण्यातून अनंत तरे यांनी लढण्यास नकार दिल्याने ठाणे व कल्याणच्या उमेदवारांचा प्रश्न सुटू शकला नाही, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

काँग्रेसबरोबर तिसऱ्या आघाडीची बोलणी शक्य-करात
नवी दिल्ली, १९ मार्च/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकांनंतर तिसऱ्या आघाडीसह सरकार स्थापनेसाठी आपण अद्यापि काँग्रेस पक्षासोबत बोलणी करण्यास तयार आहोत, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे. या विधानामुळे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भविष्यात राजकारणाचा कल काय निश्चित होऊ शकतो, याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. तिसऱ्या आघाडीने निवडणुकांपूर्वी आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल त्याचे नाव जाहीर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही करात यांनी नमूद केले आहे.

राजनाथ सिंहांना भेटूनही जेटलींचा रुसवा ‘कायम’
नवी दिल्ली, १९ मार्च/खास प्रतिनिधी

आपल्या बहिष्कारानंतरही भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी होऊन लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असल्याचे बघून अखेर भाजपचे सरचिटणीस व अनुभवी रणनितीकार अरुण जेटली यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पण आपला रुसवा ‘कायम’ असल्याचे संकेत जेटलींनी दिले आहेत. जेटली प्रभारी असलेल्या बिहार आणि दिल्लीतील भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर आज केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या अनुपस्थितीत शिक्कामोर्तब केले. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीने आज बिहार, दिल्ली, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरच्या १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

चिरंजीवी देणार १०० रुपयांत महिन्याभराचे किराणा सामान
हैदराबाद, १९ मार्च/वृत्तसंस्था

आगामी निवडणुकीत मतदारांनी सत्तेवर आणल्यास राज्यातील गरीब कुटुंबांना १०० रुपयांमध्ये ‘एलपीजी गॅस’ देण्याचे आश्वासन देणारे प्रसिद्ध तेलगू चित्रपट अभिनेते यांच्या ‘प्रजा राज्यम पक्षा’ने आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नव्या घोषणांची खैरात केली आहे. यात महिन्याभराचे किराणा सामान केवळ १०० रुपयांमध्ये देण्याची घोषणा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रत्येक गरीब व्यक्तीला प्रजा राज्यम पक्षाकडूनअन्नधान्याबाबत सुरक्षितता देण्यात येईल, असे या पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नक्षलग्रस्त भागात केंद्र व राज्य राखीव पोलिसांच्या तुकडय़ा
गडचिरोली, १९ मार्च / वार्ताहर

लोकशाही व्यवस्थेला विरोध करणाऱ्या नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणेच बहिष्काराचे आवाहन केले आहे. अलीकडेच धानोरा तालुक्यातील गोडलवाहीच्या जंगलात चकमकीत एक प्लाटून दलम कमांडर ठार झाला. घटनास्थळावर जी पत्रके सापडली त्यात लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याविषयी मजकूर नमूद आहे.

शशी थरूर यांना काँग्रेसची उमेदवारी?
नवी दिल्ली, १९ मार्च/पीटीआय

प्रसिध्द लेखक व संयुक्त राष्ट्रांमधील राजनैतिक अधिकारी शशी थरूर यांना केरळ येथील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. शशी थरूर यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा मनोदय यापूर्वीच व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदासाठी २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी शशी थरूर हे भारताकडून उमेदवार होते व भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी राष्ट्रसंघात कायमच चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत, असे थरूर यांनी सांगितले होते. काँग्रेसकडूनच उमेदवार म्हणून लढण्यात आपल्याला रस आहे हे देखील थरूर यांनी कधी लपविले नव्हते.

प्रकाश झा यांच्या प्रचाराला कतरिना येणार
नवी दिल्ली, १९ मार्च / पी.टी.आय.

बिहारमधील बेतिया मतदारसंघातून लोकजनशक्ती पक्षातर्फे राजकारणाच्या आखाडय़ात उतरलेले ‘गंगाजल’ फेम दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या प्रचारासाठी कतरिना कैफने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. मी माझ्या मतदारसंघात कोणत्याही स्टार मंडळींना प्रचारासाठी फिरवणार नाही असे सांगतानाच प्रकाश झा यांनी कॅतरिना जर येणार असेल तर तिचे स्वागतच आहे असे ‘डिप्लोमॅटिक ’ उत्तर दिले. विशेष म्हणजे झा यांच्या आगामी ‘राजनिती’ या चित्रपटामध्ये कॅतरिनाची भूमिका सोनिया गांधी यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारी असल्याचे सांगण्यात येते. कतरिनाला राजकारणाचा गंध नसला तरी ती उत्तम प्रचार करू शकेल, असा विश्वासही प्रकाश झा यांनी व्यक्त केला. दरम्यान चित्रपटांच्या सेटवरून राजकारणाच्या आखाडय़ात आलेल्या झा यांच्या वेषभूषेतही फरक झाला आहे. आता ते कुर्ता व पायजमा या वेषात मतदारांना सामोरे जाणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. आमचा पक्ष समाजवादी विचारसरणी मानणार असल्याने शक्यतो आम्ही प्रचरासाठी कोणत्याही स्टार मंडळींना आणणार नसल्याचे स्पष्ट करतानाच रामविलास पासवान यांना कॅतरिना त्याला अपवाद असल्याचे स्पष्ट केले.

गुजरातमध्ये मोदी प्रभाव नऊ विद्यमान खासदारांना वगळले
नवी दिल्ली, १९ मार्च / वृत्तसंस्था

गुजरातमधील लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी १४ विद्यमान खासदारांपैकी नऊजणांना वगळले असून नवीन उमेदवारी देताना आता अनेक लक्षणीय बदल भाजप उमेदवारांच्या यादीत झाले आहेत. मोदींनी तयार केलेल्या या यादीमध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेसजनही आता येत्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. पूर्वीचे शत्रू आता मित्र झाल्याने झालेल्या या बदलाचा फटका नऊ विद्यमान खासदारांना बसला आहे. पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांबरोबरच डॉक्टर्स, शिक्षणक्षेत्रातील नामवंत, कामगार क्षेत्राशी संबंधित इतकेच नव्हे बिगर राजकीय व्यक्ती अशा उमेदवारांना भाजपच्या यादीत स्थान मिळाले आहे. मोदी यांचे यादीवर वर्चस्व कायम असल्याचे दिसत आहे. भाजपच्या वगळलेल्या विद्यामान खासदारांमध्ये बडोद्याच्या जयाबेन ठक्कर, धानधुकाचे रतीलाल वर्मा, गोध्रा येथील भूपेंद्रसिंह सोळंकी, कच्छच्या पुष्पदा गंधावी, पाटण येथील महेश कनोडिया, पोरबंदर येथील हरिलाल पटेल, राजकोट येथील डॉ. वल्लभभाई कथिरिया, सूरतचे कांशिराम राणा व सुरेंद्र नगर येथील निलंबित असलेले सोमाभाई पटेल या नऊजणांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांनी पाटणचे विद्यमान आमदार महेश कनोडिया यांना वगळून त्यांनी आता आपले नवे मित्र आणि काँग्रेस आमदार भावसिंह राठोड यांना पाटणमधून उमेदवारी दिली आहे.