Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
लोकमानस

याचसाठी केला का अट्टहास?

आपली संतपरंपरा महान आहे आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पायाच आहे असे म्हटले जाते. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर या सर्व संत मंडळींनी समाजाकडून होणाऱ्या निंदा-कुचाळक्यांची पर्वा

 

न करता आपले कार्य चालू ठेवले व शेवटी समाजाला त्याची नोंद घ्यायला भाग पाडले. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनीदेखील ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले आहे. डॉ. आनंद यादव यांनी आपल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीतील आक्षेपार्ह लेखनाबद्दल माफी मागितली, इतकेच नव्हे तर हे पुस्तक मागेही घेतले; (हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा!) परंतु यानंतरही गळ्यात तुळशीमाळ घालून संत संप्रदायाची पताका पुढे वाहून नेणाऱ्या वारकरी संप्रदायाचे हे वर्तन म्हणजे वारकरी परंपरेला लागलेला बट्टाच आहे असे वाटते.
वारकऱ्यांच्या या दुराग्रही वर्तनाची तुलना पैठणच्या त्या काळच्या ब्रह्मवृंदाशीच होऊ शकेल. डॉ. आनंद यादव भले कोणी संतमहंत नसतील, पण मराठी सारस्वत संप्रदायाचे सच्चे वारकरी ते नक्कीच आहेत.
नीलिमा लोहोकरे, प्रभादेवी, मुंबई

प्रार्थनेसाठी माइकचा वापर बंद करावा

अखंड हरिनाम सप्ताह चालतो तेव्हा माइकवरून आपण ध्वनिप्रदूषण करत आहोत, अभ्यास करणाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणत आहोत याचे भान हरिनाम घेणाऱ्यांना नसते. तसेच दिवसातून अनेकदा माइकवरून मोठय़ाने बांग देणाऱ्यांना हे कळत नाही की यानेही एक प्रकारे ध्वनिप्रदूषण होत आहे.
असे दिसून येते की, धार्मिक प्रार्थना माइकवरून केल्याने इतर धर्मीयांमध्ये असंतोष व राग निर्माण होतो. तसेच हा धुमसता असंतोष निमित्त मिळाल्यास बाहेर येऊन भडका उडवू शकतो. मुख्य म्हणजे याद्वारे ध्वनिप्रदूषण व मानसिक प्रदूषण वाढवतो.
यासाठी हे माइकवरून धार्मिक प्रार्थना करणे बंद केले पाहिजे. हे कायद्यानेच होऊ शकते. म्हणून एक तर जनहित याचिका दाखल करावी किंवा यावर सरळ कायदा करावा. अशा बाबी एकटय़ादुकटय़ाच्या नाहीत. येथे योग्य नेत्यांची आवश्यकता आहे किंवा लोकांनी एकत्र येऊन याबाबत आवाज उठवावा. कुठल्याही प्रकारच्या प्रार्थना माइकवरून करण्यावर पूर्णपणे बंदी आली तर सामाजिक स्वास्थ्यही सुधारेल, पण सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोनाली तळेकर, घाटकोपर, मुंबई