Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

नेपाळ येथील थोरांगला पासची अवघड चढाई साताऱ्याच्या तीन साहसवीरांनी नुकतीच पार केली. या मोहिमेत या खिंडीत तिरंगा फडकवताना राहुल देशपांडे, किरण गेंगजे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी.

साताऱ्यातील साहसवीरांनी केली ‘थोरांगला पास’ची यशस्वी चढाई
सातारा, १९ मार्च/प्रतिनिधी

रक्त गोठविणारी थंडी, गार वारे, अति उंचीवरील प्रवासामुळे ऑक्सिजनचे होणारे विरळ प्रमाण, उणे १५ अंश तापमान अशा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत साताऱ्यातील तीन साहसवीरांनी नेपाळ पश्चिममधील जगातील सर्वात मोठा पास असणाऱ्या अन्नपूर्णा पर्वत रांगेमधील थोरांगला पास (५४१६ मीटर) १७,७६४ फूटची चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

महाआघाडीला पाठिंबा दिल्यास भाजपमध्ये बंडखोरी
गणेश जोशी, सांगली, १९ मार्च

सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील पुरस्कृत विकास महाआघाडीच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी पवार यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास आपण पक्षांतर्गत बंडखोरी करणार असल्याचा इशारा भाजपचे वरिष्ठ नेते दीपक शिंदे- म्हैसाळकर यांनी दिला आहे. सांगली मतदारसंघात भाजपच्या भूमिकेविषयी विटा येथे आयोजित केलेल्या पक्ष बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी संभाजी पवार यांना टीकेचे लक्ष बनवित ते वैयक्तिक राजकीय लाभासाठी भाजपला विकास महाआघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहेत, असा आरोप केला.

महाआघाडीतर्फे सांगलीत आमदार अजित घोरपडे?
सांगली, १९ मार्च / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असून विकास महाआघाडीच्या माध्यमातून कवठेमहांकाळचे काँग्रेसचे राज्यमंत्री व विद्यमान आमदार अजित घोरपडे यांनी बंडखोर म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांना जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

घडलंय बिघडलंय..
निवडणुकीच्या सारीपाटावर कधी सोंगटय़ा उलटय़ा पडतील हे सांगता येत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार याचा अनुभव घेत आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश या इच्छुकाला आला आणि भारावलेल्या मनाने त्याच्या तयारीने वेग घेतला. हा इतका जोरात की त्याने आपली पूर्वकथा सांगताना जीवनाशी कसा झगडा केला याचा इतिहासच वाचला. त्यानंतर त्याने आपली हुकूमी खेळी करताना काही मंडळींना चक्क घडय़ाळाचे वाटप केले.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराने कार्यकर्त्यांची अडचण
राजेंद्र जोशी, कोल्हापूर, १९ मार्च

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या ४ पैकी ३ उमेदवारांना कामाला लागण्याचा संदेश दिल्यामुळे तिघांनीही आपली प्रचाराची मोहीम गतिमान केल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच स्पर्धेतील उमेदवारांनी मेळावे, जेवणावळीचा सपाटा लावल्याने नेमका कोणाच्या प्रचारमोहिमेत सहभागी व्हायचे या चिंतेने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ग्रासले असून पक्षाचा नसला, तरी किमान आमच्या निष्ठेचा तरी विचार करा असे सांगण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर आली आहे.

निवृत्त जिल्हा न्यायाधीश नारायण कुलकर्णी यांचे निधन
सातारा, १९ मार्च/प्रतिनिधी

सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानचे कोर्ट नियुक्त विश्वस्त, युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी संचालक निवृत्त जिल्हा न्यायाधीश नारायण महादेव कुलकर्णी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना असा परिवार आहे. मिरज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सातारा व मिरज येथील वकील, डॉक्टर, नागरिक या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नारायण कुलकर्णी १९७७ ते १९७८ या कालावधीत सातारा येथे जिल्हा न्यायाधिश होते. १९९७ पासून रामदास स्वामी संस्थानचे कोर्टनियुक्त विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. संस्थानच्या कार्याला चालना देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. ते समर्थ रामदास स्वामींचे भक्त होते. सज्जनगडावर त्यांनी सुधारणा घडवून आणण्यात मोठा हातभार लावला आहे.

सांगलीत दुसऱ्यादिवशीही अतिक्रमण मोहीम सुरूच
सांगली, १९ मार्च / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरूवारी दुसऱ्या दिवशी अतिक्रमण मोहीम सुरूच ठेवली. मुख्य बसस्थानक परिसरातील खोकीधारकांनी केलेली रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फायदा घेत महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. बुधवारी नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर आज बसस्थानक व शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. बसस्थानक परिसरात एका अपार्टमेंटसमोर रस्त्यावरच फुटपाथ तयार करण्यात आला होता. हा फुटपाथही काढून टाकण्यात आला. तसेच १५ ते २० खोकीधारकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली होती. तीही या पथकाने उद्ध्वस्त केली.

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या कराडमध्ये जप्त
कराड, १९ मार्च/वार्ताहर

कराड नगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील सहा दुकानांवर छापे मारून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या तीनशे किलो वजनाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅग जप्त केल्या. त्यांची किंमत सुमारे ३० हजार रुपये इतकी आहे. मे. मोतीलाल छत्रीवाला, प्लॅस्टिक हाऊस, सोना ट्रेडर्स, सोलंकी एन्टरप्रायजेस, परमार स्टोअर्स,मंगल व्हरायटी येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाईची ही मोहीम अशीच चालू राहणार असून नागरिकांनी ९ बाय १२ इंच आकारातील प्लॅस्टिक पिशव्या वापरू नयेत. पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या एक रुपया किंमतीच्या साडी बॅग्ज वापराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपअभियंता ए. आर. पवार यांनी केले आहे.

सोलापुरात सावकाराकडून कर्जदार महिलेला जाळण्याचा प्रयत्न
सोलापूर, १९ मार्च/प्रतिनिधी

कर्जवसुलीसाठी खासगी सावकाराने एका गरीब महिलेचा अमानुष छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील होटगी रस्त्यावरील हत्तुरे वस्तीत घडली. याबाबत विजापूरनाका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करताना त्यात मुंबई सावकारी नियंत्रण अधिनियम कायद्याचा वापर केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जैनबबी सबनू शेख (वय ४२, टिकेकरवाडी, सोलापूर) असे या घटनेत गंभीर भाजून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. यात नबीसाब करीम आतार (रा. हत्तुरेवस्ती) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे.
नबीसाब हा खासगी सावकारीचा बेकायदा व्यवसाय करतो. त्याच्याकडून जैनबबी हिने ६ टक्के व्याजदराने दहा हजारांचे कर्ज घेतले होते. तिने वेळोवेळी व्याजासह कर्जाची रक्कम देऊनसुद्धा आपली रक्कम द्यावी म्हणून सावकाराने त्रास देणे सुरू केले. तेव्हा जैनबबी हिने नबीसाबच्या घरी जाऊन आपण पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. तेव्हा संतापलेल्या नबीसाबने आताच्या आता पैसे हवेत, नाही तर तुला खलास करतो, म्हणून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती गंभीर भाजली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुले सूतगिरणीला सलग तिसऱ्यांदा प्रथम पुरस्कार
पेठवडगाव, १९ मार्च / वार्ताहर

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत वाठारनजीक कार्यरत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला यंदा सलग तिसऱ्यावेळी मशीन प्रॉडक्टीव्हीटी इंडेक्स (एम. पी. आय.) या प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेने माजी समाज कल्याणमंत्री जयवंतराव आवळे संस्थापक असलेल्या या सूतगिरणीचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग मंत्री अनिस अहमद यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महात्मा फुले सूतगिरणीचे कार्यकारी संचालक डी. बी. बोडके, प्रॉडक्शन मॅनेजर बी. के. स्वामी, खरेदी - विक्री विभागाचे (पर्चेस इनचार्ज) एस. डी. सावळजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबद्दल तांत्रिक व प्रशासकीयसह सर्व कर्मचाऱ्यांचे महात्मा फुले ब्रँडचे सूत तयार करणाऱ्या सूतगिरणीचे अध्यक्ष संजय आवळे यांनी आभार मानले.

पुणे-सोलापूर इंटरसिटीच्या मुदतवाढीबाबत स्पष्टीकरण
सोलापूर, १९ मार्च/प्रतिनिधी

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्स्प्रेस प्रायोगिक तत्त्वावर पुणे-सोलापूर इंटरसिटीच्या स्वरूपात धावत असून, प्रवाशांकडून लाभत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे या गाडीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा कोठेही उल्लेख केला गेला नव्हता. परंतु याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त विपर्यास करणारे आहे, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वे सोलापूर विभाग परिचालन प्रबंधक सुशील गायकवाड यांनी दिले आहे. पुणे-सोलापूर इंटरसिटीला मिळालेल्या मुदतवाढीच्या संदर्भात गायकवाड यांनी गेल्या ७ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजिली होती. त्या वेळी त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा अजिबात उल्लेख नव्हता. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताशी आपला यत्किंचितही संबंध नाही, असे गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रविवारी सांगलीत एकदिवसीय सावरकर साहित्य संमेलन
सांगली, १९ मार्च / प्रतिनिधी

क्रांतिवीर बाबाराव सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २२ मार्च रोजी एकदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथील मारुती चौकातून भव्य ग्रंथदिंडीही काढण्यात येणार आहे. या संमेलनात भागवताचार्य वा. ना. उत्पात (पंढरपूर), अभिव्यक्तया श्रीमती अपर्णा रामतीर्थंकर (सोलापूर), प्रदीप रावत (पुणे), कवी किरण जोगळेकर (कल्याण), राजेंद्र ठाकूर (पिंपळगाव) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट व अन्य क्रांतिकारकांची चित्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चित्रमय चरित्र पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच स्मृती प्रतिष्ठानकडे जमा झालेल्या एक हजाराहून अधिक ग्रंथांच्या ग्रंथालयाचे उद्घाटनही श्री. उत्पात यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी या साहित्य संमेलन व ग्रंथदिंडीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सोलापुरात प्राणायाम शिबिर
सोलापूर, १९ मार्च/प्रतिनिधी

योगॠषी स्वामी रामदेवबाबांच्या स्वाभिमान भारत संकल्पनेनुसार सोलापुरातील आजी - माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दि. २२, २३ व २४ मार्च रोजी मोफत प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. विजापूर रस्त्यावरील माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहात हे शिबिर होणार आहे. रविवारी सकाळी सहा वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात पतंजली योग पीठाच्या योग प्रशिक्षकांकडून योग व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर शंकरराव खांडेकर व सचिव अविनाश जळगावकर यांनी कळविली आहे.