Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

‘आयपीएल’वाला पंतप्रधान नको
उद्धव ठाकरे यांचा गुगली

मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

युतीमधील प्रदीर्घकाळचा भागीदार भाजपचे नाक दाबण्याची खेळी करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चुंबाचुंबी करीत असलेल्या शिवसेनेने आज अचानक आपले हात झटकले. आयपीएलला नव्हे तर देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा पंतप्रधान शिवसेनेला हवा, अशी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसशी चाललेली घसट संपुष्टात आल्याचेच स्पष्ट केले आणि भाजपलाही चुचकारले. उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या २२ पैकी १५ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि उर्वरित सात उमेदवारांबाबत काहीही मतभेद नसून येत्या दोन दिवसांत त्यांची नावे जाहीर करणे हा शिवसेनेच्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले. याप्रसंगी शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील मंदीची लाट थोपवणारा पंतप्रधान शिवसेनेला हवा आहे. शिवसेना-भाजप युती भक्कम असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत दुरावा जराही नाही.

साहित्यसंमेलन अध्यक्षांविनाच
आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित; अध्यक्षीय भाषणही होणार नाही

सुनील माळी / गणाधीश प्रभुदेसाई
महाबळेश्वर, १९ मार्च

साह्त्यि संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवून अध्यक्षांविना संमेलन पार पाडण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या आज रात्री येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षांचे भाषण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांची निवड आणि ठराव-चर्चेवरून वाद होण्याची परंपरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नवीन नाही. परंतु, अध्यक्षांविना आणि अर्थातच अध्यक्षीयभाषणही न होताच संमेलन भरविण्याचा अभूतपूर्व प्रसंग मात्र प्रथमच घडत आहे.

भारत, चीनबरोबर स्पर्धा करायची तर शिक्षणाचा दर्जा सुधारा
ओबामांचे देशवासीयांना आवाहन

वॉशिंग्टन, १९ मार्च/पी.टी.आय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मुलांनी स्पर्धा करायची असेल तर आपल्याकडील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे, असे आवाहन कुणा येरागबाळ्याने नव्हे तर दस्तुरखुद्द अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना केले आहे.कॅलिफोर्नियातील कोस्टा मेसा येथील नागरी भवनात काल एका कार्यक्रमात ओबामांनी आपल्या देशवासियांना शिक्षणविषयक काही खडे बोल सुनावले. आपली मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर बावळट अथवा सुमार दर्जाची ठरू नयेत, अशी इच्छा असेल तर शिक्षणक्षेत्राच्या सार्वत्रिक दर्जासुधारणेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव सोनियांना अमान्य काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम
मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यापेक्षा महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळावर सर्व ४८ मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करावेत म्हणून पक्षातून मोठय़ा प्रमाणावर दबाव असला तरी काँग्रेस हायकमांडने ही मागणी मान्य केलेली नाही. राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवण्याची सूचना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील नेत्यांना केली असून, जागावाटपात २६ व २२ जागांचे सूत्र मान्य होईल अशी चिन्हे आहेत. अमरावतीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली असून, जालन्यासाठी राष्ट्रवादीची मागणी मात्र काँग्रेसने मान्य केलेली नाही.

संतसूर्य नामक ‘फ्लायटेड’ने पुरोगाम्यांबरोबरच हिंदुत्ववाद्यांचाही त्रिफळा
पुणे, १९ मार्च/प्रतिनिधी

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या मुद्दय़ावर एरवी बाह्य़ा सरसावून बोलणाऱ्या साहित्यिक आणि विचारवंत क्षेत्रातील मंडळींची आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीनामक गुगलीने चांगलीच पंचाईत झाली आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा खरेतर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांच्या दृष्टीने उंची दिलेला चेंडू असतो. अशा उंची दिलेल्या चेंडूवर अनेक विचारवंत, साहित्यिक मंडळींनी या पूर्वी क्रीझबाहेर येऊन षटकार ठोकले आहेत. पण वारकरी मंडळींनी टाकलेल्या या फ्लायटेड चेंडूवर क्रीझबाहेर येऊन षटकार राहू द्या, पण चौकार ठोकण्याचीही हिंमत भल्याभल्यांना झालेली नाही. आपण पुढे येऊन फटका मारण्याची हिंमत दाखविली तर यष्टिचित होऊ या भीतीने या मंडळींना ग्रासले असावे, असे दिसत आहे. एवढेच नव्हे तर ‘यादव हे परिवारातले’ असे अभिमानाने सांगणाऱ्या मु. पो. ३०९, शनिवार या कुळाशी नाते सांगणाऱ्या मंडळींनी यादवांची जाहीर पाठराखण टाळली आहे.

वरुण गांधी आणखी अडचणीत!
नागरिकांना पैसे वाटून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका
पिलिभित, १९ मार्च/पी.टी.आय.
आपल्या तथाकथित मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वरुण गांधी आता नव्या अडचणीत सापडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे येथील उमेदवार असणाऱ्या वरुण यांनी येथील काही नागरिकांना पैसे वाटल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. नागरिकांना पैसे वाटून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका उपजिल्हा न्यायदंडाधीकाऱ्यांनी वरुण यांच्यावर ठेवला आहे.

संगमा भडकले, काँग्रेसशी कुठेही युती न करण्याचा राष्ट्रवादीकडे आग्रह
नवी दिल्ली, १९ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने देशभरात कुठेही युती करू नये, असा आग्रह करून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य पी. ए. संगमा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आपल्या पक्षापुढे पुन्हा राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसशी युती केल्यामुळे संतप्त होऊन संगमा यांनी पवार यांच्याविरुद्ध बंड केले होते. मेघालयात राष्ट्रवादीचे समर्थन असलेले सरकार अल्पमतात आल्यानंतर ज्या विधानसभा अध्यक्षांच्या मतामुळे कसेबसे तरले. पण केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेघालयात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली. त्यामुळे संगमा भडकले आहेत. आज दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद बोलावून संगमा यांनी काँग्रेस पक्ष, मेघालयचे राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते यांच्यावर जोरदार आगपाखड केलीआणि राष्ट्रपती राजवट लादण्याच्या केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.

 


प्रत्येक शुक्रवारी