Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

‘ना नफा ना तोटा’
औरंगाबाद, १९ मार्च/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षातून बाहेर पडल्यावर पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आसरा घेतलेले खासदार जयसिंग गायकवाड यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ते औरंगाबाद जिल्ह्य़ात सक्रिय होणार की बीड हीच आपली कर्मभूमी ठेवणार, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. तरीही त्यांच्या येण्याने जिल्ह्य़ात शिवसेनेला फारसा ‘फायदाही नाही आणि तोटाही नाही’, अशीच प्रतिक्रिया शिवसैनिकांनी नोंदविली आहे.

मुंडे यांचा प्रचार जयसिंगराव करणार का?
औरंगाबाद, १९ मार्च/खास प्रतिनिधी

बीड लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक नोंदविणारे खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर ते या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांचा प्रचार करणार का असा प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे. गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव हे एकेकाळचे जिगरी मित्र. गेल्या निवडणुकीपासून मित्रांमध्ये हाडवैर निर्माण झालेले आहे.

‘आमचा राम राम घ्यावा’
बीड, १९ मार्च/वार्ताहर

उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच खासदार जयसिंग गायकवाड यांनी हितचिंतकांना भ्रमणध्वनीवरून ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा’ असा संदेश पाठवून अचानक शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गायकवाड यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आज शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेच्या कसोटीत दुधगावकर ठरले ‘निष्ठावान’!
आसाराम लोमटे, परभणी, १९ मार्च

खासदार फुटीचा शाप असलेल्या शिवसेनेपुढे लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची असा मोठा पेच होता. यापुढे निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल असे सांगणाऱ्या शिवसेनेवर काळानेच सूड उगविला आहे. निवडून आल्यानंतर पक्षाबाहेर पडणाऱ्या उमेदवारांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत असलेल्या शिवसेनेला अखेर बाहेरून शिवसेनेत आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांचा उमेदवार म्हणून विचार करावा लागला.

उस्मानाबादमधून लोकसभेसाठी शिवसेनेचे रवींद्र गायकवाड
उस्मानाबाद, १९ मार्च/वार्ताहर

अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असणारा लोकसभेचा उस्मानाबाद मतदारसंघ खुला झाल्यानंतर निवडणुकीसाठी आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या नावावर शिवसेनेने आज शिक्कामोर्तब केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. शिवसेनेचा योग्य उमेदवार म्हणून त्यांचेच नाव निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत होते.उस्मानाबादकरांनी सलग दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना लोकसभेत पाठविले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या कल्पना नरहिरे निवडून आल्या.

तालावर रंगलेली होळी
सातपुडय़ाच्या रांगांच्या कुशीत जगणाऱ्या आदिवासींच्या उत्थानासाठी अनेक वर्षांपासून झगडणाऱ्या ‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या राष्ट्रीय सचिव प्रतिभा शिंदे दर वर्षी आदिवासींची होळी बघण्यासाठी आग्रहाने बोलवायच्या. या वर्षी जाणं जुळून आलं. दि. १२ मार्चच्या रात्रीचा तो आगळावेगळा होळी-उत्सव स्मरणात राहण्यासारखाच होता.
‘संघर्ष मोर्चा’ने या वर्षीचा होळी-उत्सव अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी या आदिवासी वस्तीवर आयोजित केला होता.

लांजेश्वर गावावर खासदारदेवी प्रसन्न!
सुहास सरदेशमुख, उस्मानाबाद, १९ मार्च

भूम तालुक्यातील लांजेश्वर गावावर खासदार कल्पना नरहिरे यांचे भलतेच प्रेम. त्यांनी पाच वर्षांच्या कारकिर्दीत ९३ लाख रुपयांचा निधी या गावावर खर्च केला! उर्वरित निधीतून ३५ ठिकाणी सांस्कृतिक सभागृह, रस्त्यांची बहुतांशी कामे, करमाळा तालुक्यातील एकाच शाळेला संगणक देण्याची शिफारस करत ८६.१९ टक्के निधी खर्च केला आहे. लांजेश्वर हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचे गाव. उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ाच्या सीमेवर ते आहे. या गावासाठी खासदार कल्पना नरहिरे यांनी सर्वाधिक १२ कामे मंजूर केली.

खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच जल्लोष
औरंगाबाद, १९ मार्च/प्रतिनिधी

शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आणि सायंकाळी समर्थनगर येथील त्यांच्या प्रचार कार्यालयासमोर समर्थकांनी जल्लोष केला. उमेदवारी मिळणारच असे गृहीत धरून सुमारे दीड महिन्यांपूर्वीच खैरे यांनी हे प्रचार कार्यालय थाटले होते, हे विशेष. खासदार जयसिंग गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सकाळी खैरे-समर्थक अस्वस्थ होते. शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी सायंकाळी चार वाजता जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वाच्या नजरा तिकडे लागल्या होत्या. दुपारी श्री. खैरे दिल्लीत होते आणि सायंकाळी मुंबईकडे निघाले होते. श्री. गायकवाड यांच्या आगमनामुळे खैरेही काहीसे अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसले. ‘शेवटी आम्ही आदेशाचे पाईक आहोत, जसा आदेश येईल तसेच होईल,’ असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात औरंगाबाद मतदारसंघाचे व खैरे यांचेही नाव दिसले आणि त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा श्वास घेतला. उमेदवारीची घोषणा होत असताना खैरे विमानात होते. उमेदवारी मिळाल्याचे समजताच शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे गुलमंडी या सेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात जल्लोष केला.

संत मोतीराम सहकारी बँकेवर प्रशासक
गंगाखेड, १९ मार्च/वार्ताहर

पालम येथील संत मोतीराम महाराज सहकारी नागरी बँकेवर भारतीय रिझव्र्ह बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन करणे, संचालक मंडळाच्या मनमानी कारभार आदीचा ठपका ठेवीत पुण्याच्या सहकार आयुक्तांनी बँकेवर गंगाखेडचे सहायक निबंधक बी. डी. दुधाटे यांच्यासह तीन सदस्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. या निर्णयाने पालम तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबतचा आदेश सहकार आयुक्तांनी दि. ३ मार्चलाच काढला. त्यानुसार पालम येथील संत मोतीराम महाराज सहकारी नागरी बँकेने भारतीय जनरल बुक, डे बुक, आर्थिक पत्रके सादर न करणे, सीएलआर व एसएलआर २०४७ चे दाखल न करणे, २००७ पासून संचालक मंडळाची बैठक न घेणे आदी स्वरूपाचा ठपका ठेवीत गंगाखेडचे सहायक निबंधक सहकारी संस्था बी. डी. दुधाटे, जे. एल. पाठक व टी. एस. शेख या तीन सदस्यीय सदस्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. श्री. दुधाटे यांनी पदभार स्वीकारला असून श्री. पाठक व शेख यांनी मात्र अद्यापि पदभार न घेतल्याचे कळते. संत मोतीराम बँकेवरील प्रशासक मंडळ नियुक्तीमुळे भागधारक व खातेधारकांत खळबळ माजली आहे. बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे यांना मात्र हा मोठा हादरा बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांत उमटली आहे.

अल्पवयीन मुलांकडून वृद्धेचा खून
गंगाखेड, १९ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील पांगरी गावात काल सायंकाळी मोबाईल खरेदीसाठी अंगावरील दागिने चोरण्याच्या हेतूने चार अल्पवयीन मुलांनी वृद्ध महिलेचा दगडांनी ठेचून खून केला. नीलाबाई अर्जुन घोबाळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंपळदरी पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नीलाबाई घोबाळे मंगळवारी दुपारी पांगरी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. त्या दरम्यान १५ ते १६ वयोगटातील चार मुलांनी त्यांच्या अंगावर झडप घालून अंगावरील दागिने लुटले. त्यांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या मुलांनी त्यांचा मृतदेह झुडपात फेकून दिला. मृतदेह पोलिसांना काल सकाळी सापडला.आपण मोबाईल खरेदीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून खून केल्याचे एका मुलाने मान्य केले आहे.

लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक
औरंगाबाद, १९ मार्च/प्रतिनिधी

लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार थांबताच त्यालाच लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह तिघांना पोलिसांनी रात्री अटक केली. सलीम कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या टोळीप्रमुखाचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार अल्पवयीन आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सलीम आणि त्याच्या साथीदारांनी वैशाख वेणुगोपाल नायर या दुचाकीस्वाराच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळविली होती. सिडको एन-१ भागात राहणारे नायर हे दुचाकीवरून जळगाव मार्गाने जात असताना अंधाऱ्या ठिकाणी त्यांच्याकडून सलीम याने लिफ्ट मागितली. प्रथम नायर हे थांबले पण आजूबाजूला आणखी दोघे दिसल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी निघण्याचा निर्णय घेतला. हीच संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली आणि तिघेही पळत सुटले. नायर यांनी आरडाओरड करत तिघांचा पाठलाग सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. नायर यांनी लगेच याची माहिती सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम हाती घेऊन सलीम आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.

कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई; पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा
परभणी, १९ मार्च/वार्ताहर

दहावीच्या परीक्षेत कॉप्या करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर एका पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इटोली (ता. जिंतूर) येथील साईबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात ही कारवाई झाली. जिल्ह्य़ात दहावी व बारावी परीक्षेच्या दरम्यान कॉप्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर मोहीम राबविली असून आतापर्यंत विविध उपद्रवी व वादग्रस्त परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. आज अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. धनराज केंद्रे यांनी इटोली येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली असता गणिताच्या पेपरला त्यांना कॉपी आढळून आली. अश्विनी बबनराव सांगळे, नारायण देवबा कोकाटे, बाबुराव मल्लकार्जुन बोले, संजय भाऊराव सातपुते, ज्ञानेश्वर प्रकाश जाधव या पाच विद्यार्थ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर एस. जी. साबळे या पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. केंद्रे यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत श्री. देवडे, श्री. सावंत हे कर्मचारी हजर होते.

आडसकर यांच्या प्रचाराचा प्रारंभ २४ मार्चला परळीत
बीड, १९ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षांतर केले. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार सुरेश धस यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळेच जिल्हा परिषद सदस्य रमेश आडसकर यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गुरुवारच्या बैठकीत येत्या मंगळवारी (दि. २४) परळी येथून निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्याचे निश्चित झाल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस फुलचंद कराड यांनी दिली. बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निश्चितीचा गोंधळ मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर अधिकृतपणे घोषणा करण्याचे श्रेष्ठींनी लांबणीवर टाकले. विद्यमान खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला तर आष्टीचे भाजप बंडखोर आमदार सुरेश धस यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखविल्यामुळे गुरुवारी (१९ मार्च) जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी व प्रदेश अध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत दिवसभर बैठकीत उमेदवारीवर खल झाला. मात्र पक्षश्रेष्ठींनी काहीच निर्णय दिला नाही.

चोराकडून सात मोबाईल जप्त
औरंगाबाद, १९ मार्च/प्रतिनिधी

फेरोज खान या मोबाईल चोरास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल पळविण्यात फेरोज हा तरबेज आहे. काल सायंकाळी तो शहागंज भागात चोरीचे मोबाईल विकण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावला होता. दुकानात येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे सात मोबाईल आढळून आले. हे सर्व मोबाईल चोरीचे होते. त्याने नंतर तशी कबुली दिली. त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. फेरोजकडून आणखी काही मोबाईल आणि अन्य साहित्य हस्तगत होऊ शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

एप्रिलपासून एअर अरेबियाची गोव्यातूनही विमानसेवा
मुंबई, १९ मार्च/ प्रतिनिधी

मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिकेतील पहिली व सर्वात मोठी किफायतशीर दर विमान सेवा कंपनी एअर अरेबियाने आज गोव्यासाठी सुरू करीत असल्याची घोषणा केली. यूएई ते गोवा ही विमानसेवा १६ एप्रिल २००९ पासून सुरू केली जाणार आहे. डॅबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गोवा व एअर अरेबियाचे मुख्य केंद्र शारजा अशी ही विमान फेरी आठवडय़ातून तीन वेळा उपलब्ध असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीपासून गोव्याकरिता थेट विमानसेवा सुरू करणारी यूएईतील एकमेव विमानसेवा कंपनी बनण्याचा मान एअर अरेबियाला मिळेल. मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी एअर अरेबियाची विमाने गोव्याच्या दिशेने उडतील. शारजाहून रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटणारे विमान गोव्याला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल व परतीच्या फेरीचे विमान पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी गोव्याहून निघून शारजाला सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

‘मर्क इंडिया’द्वारे शार्प अॅण्ड अॅक्टिव्ह उपक्रम
मुंबई, १९ मार्च/ प्रतिनिधी

जर्मनी येथील मर्क एजी या जगातील सर्वात जुन्या औषधी व रसायन क्षेत्रातील कंपनीच्या ग्राहकोपयोगी आरोग्यनिगा विभागाने भारतात ‘शार्प अॅण्ड अॅक्टिव्ह’ उपक्रम सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. लोहातील कमतरतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वरवर निरूपद्रवी दिसणाऱ्या त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्षण केल्यास पंडुरोग (अॅनिमिया) उद्भवतो आणि या रोगाची लागण झालेल्या सर्वाधिक लोक असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एक-तृतीयांश लोक अॅनिमियाचे बळी आहेत. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. यामुळेच शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवठा होण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. २००६ सालच्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे’नुसार जवळपास ५६ टक्के भारतीय महिला अॅनिमियाने पिडित आहेत. वेगाने बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात व घराबाहेरही स्त्रियांना बजवावी लागणारी मुख्य भूमिका, करिअरबाबत महिलांमधील सक्रियता, यामुळे भारतीय महिलांमध्ये आरोग्यविषयक प्रमुख समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. केस गळणे, चिडखोरपणा, एकाग्रतेचा अभाव आणि थकवा ही सामान्यपणे लोहाची कमतरता दर्शविणारी लक्षणे आहेत.

‘वैद्यकीय क्षेत्रात तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता’
बीड, १९ मार्च/वार्ताहर

वैद्यकीय क्षेत्रात नव्या संशोधनामुळे तंत्रज्ञांची कमतरता भासत असल्याने विद्यापीठ व खासगी संस्थांच्या माध्यमातून आता तांत्रिक शिक्षण सुरू केले आहे. असे तंत्रज्ञ घडविण्याचे काम शांताबाई तापडिया पॅरामेडिकल कॉलेज करीत असल्याचे मत डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी केले.
बीड शहरातील शांता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या शांताबाई तापडिया पॅरामेडिकल कॉलेजला पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र तापडे, उपाध्यक्ष संजय मालाणी, सचिव डॉ. सुदर्शन जाजू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरकचंद जाजू यांनी स्वागत केले. डॉ. लहाने म्हणाले, देशाला वैद्यकीय क्षेत्रातील प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, शस्त्रक्रियागृह, सहायक नेत्रतज्ज्ञ, नर्सेस आदींची मोठी गरज आहे. त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठदेखील पुढाकार घेत आहे. आगामी काळात खासगी संस्थांमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होणार आहे. पॅरामेडिकल क्षेत्रातील तंत्रज्ञांना शासकीय सेवेत नोकऱ्या मिळाव्यात यासाठी भरतीच्या नियमात बदल करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. नटराजन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक; औरंगाबाद विभागीय संचालक डॉ. वांगीकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. राम पाटील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू
नांदेड, १९ मार्च/वार्ताहर

इयत्ता दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी अनिल जग्गू जाधव (वय १६) विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे काल रात्री ही घटना घडली. कमळेवाडी येथे विद्यानिकेतन पब्लिक स्कूल आहे. याच शाळेत शिकणारा अनिल दहावीची परीक्षा देत होता. परीक्षेहून आल्यानंतर काल तो गच्चीवर अभ्यास करत होता. संध्याकाळी तो जेवण्यासाठी हजर नसल्याने त्याची शोधाशोध सुरू केली तेव्हा शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डबक्यात तो आढळला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

‘न्यूझीलंड हॉलिडे पॅकेज’
मुंबई, १९ मार्च/ प्रतिनिधी

न्यूझीलंडच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी सेल्फ-ड्रायव्हिंग हॉलिडेज ही योजना आखण्यात आली आहे. जगभरातल्या इतर कुठल्यही देशात सेल्फ-ड्रायव्हिंग हॉलिडेजचा इतका उत्तम अनुभव येत नाही, असं खुद्द इथे येणाऱ्या पर्यटकांचंच मत आहे. या देशातल्या कुठल्याही भागात जा, तिथे ट्रॅफिक कमी तर असतंच, पण निसर्गाने जागोजागी सौंदर्याची उधळणही केलेली दिसते. मग वाट कसली पाहताय? निसर्गरम्य न्यूझीलंडचा आनंद लुटा. थॉमस कुकचं सेल्फ-ड्राइव्ह हॉलिडे पॅकेज ६ रात्री आणि ७ दिवसांचे असून प्रत्येकी ६९हजार ९९० रुपये अशी त्याची किंमत आहे.