Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आयपीएल’वाला पंतप्रधान नको
उद्धव ठाकरे यांचा गुगली
मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

युतीमधील प्रदीर्घकाळचा भागीदार भाजपचे नाक दाबण्याची खेळी करताना शरद पवारांच्या

 

राष्ट्रवादीशी चुंबाचुंबी करीत असलेल्या शिवसेनेने आज अचानक आपले हात झटकले. आयपीएलला नव्हे तर देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा पंतप्रधान शिवसेनेला हवा, अशी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसशी चाललेली घसट संपुष्टात आल्याचेच स्पष्ट केले आणि भाजपलाही चुचकारले.
उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या २२ पैकी १५ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि उर्वरित सात उमेदवारांबाबत काहीही मतभेद नसून येत्या दोन दिवसांत त्यांची नावे जाहीर करणे हा शिवसेनेच्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले. याप्रसंगी शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील मंदीची लाट थोपवणारा पंतप्रधान शिवसेनेला हवा आहे. शिवसेना-भाजप युती भक्कम असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत दुरावा जराही नाही.
ठाणे, कल्याण आदी जागांवरचे उमेदवार जाहीर न करणाऱ्या शिवसेनेने मुंबईतील तिन्ही जागांवरचे उमेदवार जाहीर केले. दक्षिण मुंबईसाठी खासदार मोहन रावले, उत्तर-पश्चिमसाठी आमदार गजानन कीर्तिकर आणि दक्षिण-मध्यसाठी आमदार सुरेश गंभीर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दक्षिण-मध्य मुंबईसाठी शिवसेनेने योग्य उमेदवाराचा बराच काळ शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने अखेर गंभीर यांना राजी करण्यात आले.
उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत अशा शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आज बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकेकाळचे भाजपचे खासदार असलेल्या गायकवाड यांनी भाजप आणि विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच गोपीनाथ मुंडेंवर सडकून टीका करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मुंडेंचे राजकीय विरोधक असलेल्या गायकवाड यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत आणल्याबद्दल राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. गायकवाड यांनी या वेळी पत्रकारांना निवेदनपत्र वाटले. त्यामध्ये गायकवाड यांनी केलेल्या कार्यक्रमात भाजप आणि मुंडे यांची नस, नाडी ओळखणारा नेता असे नमूद करण्यात आले आहे.