Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भारत, चीनबरोबर स्पर्धा करायची तर शिक्षणाचा दर्जा सुधारा
ओबामांचे देशवासीयांना आवाहन
वॉशिंग्टन, १९ मार्च/पी.टी.आय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मुलांनी स्पर्धा करायची असेल

 

तर आपल्याकडील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे, असे आवाहन कुणा येरागबाळ्याने नव्हे तर दस्तुरखुद्द अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना केले आहे.कॅलिफोर्नियातील कोस्टा मेसा येथील नागरी भवनात काल एका कार्यक्रमात ओबामांनी आपल्या देशवासियांना शिक्षणविषयक काही खडे बोल सुनावले. आपली मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर बावळट अथवा सुमार दर्जाची ठरू नयेत, अशी इच्छा असेल तर शिक्षणक्षेत्राच्या सार्वत्रिक दर्जासुधारणेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे काम केवळ शिक्षकांचेच नाही तर पालकांनीही यात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. पालकांनी मुलांकडून गृहपाठ नीट करून घेतला नाही, अवांतर वाचन करून घेतले नाही, सवरेत्कृष्ट बनण्याची इष्र्या त्यांच्यात जागविली नाही, ज्ञानार्जनाची भूक त्यांच्यात निर्माण केली नाही आणि मग मुले अपयशी ठरली तर तो दोष शिक्षकांचा नाही. शिक्षक भले कितीही उत्कृष्ट असू दे, असा उपदेश ओबामांनी केला. शिक्षणक्षेत्रातील सुधारणांवर आपण अध्यक्षपदासाठीच्या प्रचार मोहिमेपासून भर देत आलो आहोत. दर्जा सुधारणे म्हणजे केवळ एक कडक परीक्षा घेणे नव्हे तर संपूर्ण प्रक्रियाच सुदृढ आणि कार्यक्षम बनविणे आपल्याला अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.