Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव सोनियांना अमान्य काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम
मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यापेक्षा महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळावर सर्व ४८ मतदारसंघामध्ये

 

उमेदवार उभे करावेत म्हणून पक्षातून मोठय़ा प्रमाणावर दबाव असला तरी काँग्रेस हायकमांडने ही मागणी मान्य केलेली नाही. राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवण्याची सूचना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील नेत्यांना केली असून, जागावाटपात २६ व २२ जागांचे सूत्र मान्य होईल अशी चिन्हे आहेत. अमरावतीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली असून, जालन्यासाठी राष्ट्रवादीची मागणी मात्र काँग्रेसने मान्य केलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून उभय पक्षांमध्ये कटुता वाढली होती. महाराष्ट्रात यूपीएच्या घटक पक्षांमध्ये डॉ. मनमोहन सिंग व शरद पवार हे पंतप्रधानपदाचे दोन उमेदवार कसे असू शकतात, असा सवाल उपस्थित करून स्वतंत्र लढण्याची मागणी काँग्रेसमध्ये जोर धरू लागली होती. विशेषत: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यासाठी आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे आदी नेते आघाडी व्हावी याच मताचे होते. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात आघाडी कायम ठेवावी, अशी सूचना सोनियांनी राज्यातील नेत्यांना केल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने आघाडी कायम ठेवण्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ शरद पवारांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदावरून शरद पवारांवर टीका केली.
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. शिर्डीच्या बदल्यात नगरची जागा मिळावी ही काँग्रेसची मागणी अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादीची जालन्याची मागणी मान्य झालेली नाही.