Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संतसूर्य नामक ‘फ्लायटेड’ने पुरोगाम्यांबरोबरच हिंदुत्ववाद्यांचाही त्रिफळा
पुणे, १९ मार्च/प्रतिनिधी

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या मुद्दय़ावर एरवी बाह्य़ा सरसावून बोलणाऱ्या साहित्यिक आणि विचारवंत

 

क्षेत्रातील मंडळींची आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीनामक गुगलीने चांगलीच पंचाईत झाली आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा खरेतर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांच्या दृष्टीने उंची दिलेला चेंडू असतो. अशा उंची दिलेल्या चेंडूवर अनेक विचारवंत, साहित्यिक मंडळींनी या पूर्वी क्रीझबाहेर येऊन षटकार ठोकले आहेत. पण वारकरी मंडळींनी टाकलेल्या या फ्लायटेड चेंडूवर क्रीझबाहेर येऊन षटकार राहू द्या, पण चौकार ठोकण्याचीही हिंमत भल्याभल्यांना झालेली नाही. आपण पुढे येऊन फटका मारण्याची हिंमत दाखविली तर यष्टिचित होऊ या भीतीने या मंडळींना ग्रासले असावे, असे दिसत आहे. एवढेच नव्हे तर ‘यादव हे परिवारातले’ असे अभिमानाने सांगणाऱ्या मु. पो. ३०९, शनिवार या कुळाशी नाते सांगणाऱ्या मंडळींनी यादवांची जाहीर पाठराखण टाळली आहे.
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या मुद्दय़ावर महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक आणीबाणीत तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात उभे ठाकले होते. १९७६ साली कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांनी व्यासपीठावर बसू नये, अशी भूमिका साहित्यिकांनी घेतली होती. १९७७ मध्ये आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत हिंदुत्ववादी, समाजवादी अशा परस्परविरोधी विचारांच्या साहित्यिकांनी काँग्रेसच्या विरोधात प्रचाराचे रान उठविले होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. हा मुद्दा साहित्यिकांच्या, विचारवंतांच्या प्रचारसभांतून जोरकसपणे मांडला गेला. पण आनंद यादव यांनी कादंबरी मागे घेतली, माफी मागितली, त्याही पुढे जाऊन साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. तरीही पुरोगामित्वाचा उद्घोष करणाऱ्या विचारवंत, साहित्यिकांनी या विरोधात जाहीरपणे बोलण्याची शामत दाखवलेली नाही. ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने या क्षेत्रातील काही मंडळींशी संपर्क साधल्यावर त्यांनी हा प्रकार म्हणजे वारकऱ्यांची झुंडशाही असल्याचे सांगितले. मात्र यापूर्वी अशी जाहीर भूमिका का घेतली नाही, असे विचारल्यावर ‘हा वाद वाढू नये’ अशी इच्छा असल्याने आम्ही पत्रक वगैरे काढले नाही, असा पवित्रा या मंडळींनी घेतला आहे.
यादव यांच्या राजीनामा प्रकरणाने पुरोगामी विचारवंतांबरोबरच हिंदुत्ववादी मंडळींची चांगलीच कोंडी झाली आहे. एरवी कोणा समाजवादी, डाव्या संघटनांमुळे यादव यांना राजीनामा द्यावा लागला असता तर समस्त ‘दक्ष’ लेखक मंडळींनी हलकल्लोळ केला असता. पण आपल्याच भाऊबंदाने यादवांविरोधात दंड थोपटल्यावर प्रभात शाखेवर जाणाऱ्या साहित्यिक स्वयंसेवकांनी ‘उपविश’ करणे पसंत केले आहे.
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या तालिबानीकरणाची ही सुरुवात असल्याचे सांगितले. ही भूमिका यापूर्वीच जाहीरपणे का मांडली नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, हा वाद सामंजस्याने मिटावा अशी माझी इच्छा होती. वारकरी संघटनेच्या विरोधात मी जाहीर भूमिका मांडली असती तर गोंधळ आणखी वाढला असता.
मात्र झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी असून, वारकरी संप्रदायाची ही झुंडशाही तालिबान्यांना शोभण्यासारखी आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित अभ्यंकर यांनीही वारकरी संप्रदायाने यादव यांच्या राजीनाम्यासाठी झुंडशाहीचा अवलंब करणे ही या संप्रदायाच्या थोर परंपरेला काळिमा फासणारी घटना असल्याचे नमूद केले. मात्र अशी भूमिका मांडणारे पत्रक आम्ही प्रसिद्धीस दिले नव्हते हेही त्यांनी मान्य केले.
विद्रोही चळवळीतील पार्थ पोळके यांनी मात्र यादव यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. यादव यांनी राजीनामा दिला ते योग्यच केले, असे पोळके म्हणाले.
पतित पावन या हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या मुद्दय़ावर आमची कोंडी झाल्याचे मान्य केले. आम्हाला वारकरी संप्रदायाविरोधात जायचे नव्हते, असे हा पदाधिकारी म्हणाला.
वारकरी संप्रदायाला दुखवायचे नाही या एकमेव भूमिकेतून हिंदुत्ववादी साहित्यिक मंडळींनी काही बोलायचे टाळले आहे.
प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या की, मूळात आनंद यादवांनी आपले पुस्तक मागे घेण्याची गरज नव्हती. हीच एक नकारात्मक बाब आहे. पुस्तकात लिहिलेल्या मताशी यादव यांनी ठाम राहीले पाहिजे होते. महामंडळाचे पदाधिकारी या वादात आधी पडले नाहीत. राम शेवाळकरांनी काय तो प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी या वादाची दखल घेणे आवश्यक होते. अशा पद्धतीने राजीनामा मागणे गैर आहे आणि तो देणेही वाईट प्रथा आहे. आता शेवटच्या क्षणी दुसरा अध्यक्ष निवडला जाणार असेल तर त्यांच्यावर अजून कोणी काही अोक्षेप घेईल, याला काही अंत आहे की नाही ?
संजय पवार ( विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) म्हणाले की,लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या अध्यक्षांना अशा पद्धतीने राजीनामा देण्यास भाग पाडणे हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. हे वारकरी आहेत की ‘वार’करी ? आनंद यादव यांनी जे काही लिहिले त्याच्या गुणवत्तेवर चर्चा होऊ शकते. मात्र त्यांनी पुस्तक मागे घेतले, माफी मागितली तरीही संमेलन उधळून लावण्याची धमकी देणे आणि महामंडळाने ते सहन करणे म्हणजे वारकऱ्यांचा बोलविता धनी कोणी तरी वेगळाच आहे, असे दिसते.

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या तालिबानीकरणाची ही सुरुवात असल्याचे सांगितले. ही भूमिका यापूर्वीच जाहीरपणे का मांडली नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, हा वाद सामंजस्याने मिटावा अशी माझी इच्छा होती. वारकरी संघटनेच्या विरोधात मी जाहीर भूमिका मांडली असती तर गोंधळ आणखी वाढला असता. मात्र झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी असून, वारकरी संप्रदायाची ही झुंडशाही तालिबान्यांना शोभण्यासारखी आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली.

प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या की, मूळात आनंद यादवांनी आपले पुस्तक मागे घेण्याची गरज नव्हती. हीच एक नकारात्मक बाब आहे. पुस्तकात लिहिलेल्या मताशी यादव यांनी ठाम राहीले पाहिजे होते. महामंडळाचे पदाधिकारी या वादात आधी पडले नाहीत. राम शेवाळकरांनी काय तो प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी या वादाची दखल घेणे आवश्यक होते. अशा पद्धतीने राजीनामा मागणे गैर आहे आणि तो देणेही वाईट प्रथा आहे. आता शेवटच्या क्षणी दुसरा अध्यक्ष निवडला जाणार असेल तर त्यांच्यावर अजून कोणी काही अोक्षेप घेईल, याला काही अंत आहे की नाही?

संजय पवार ( विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या अध्यक्षांना अशा पद्धतीने राजीनामा देण्यास भाग पाडणे हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. हे वारकरी आहेत की ‘वार’करी? आनंद यादव यांनी जे काही लिहिले त्याच्या गुणवत्तेवर चर्चा होऊ शकते. मात्र त्यांनी पुस्तक मागे घेतले, माफी मागितली तरीही संमेलन उधळून लावण्याची धमकी देणे आणि महामंडळाने ते सहन करणे म्हणजे वारकऱ्यांचा बोलविता धनी कोणी तरी वेगळाच आहे, असे दिसते. यादव अध्यक्ष झाल्यावरच हा वाद का निर्माण झाला? यादवांचे पुस्तक जुने आहे. ते वारकऱ्यांनी आधी वाचले नाही का ? महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खरे तर वारकऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणे आवश्यक होते. ते गप्प का बसले ?

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित अभ्यंकर यांनीही वारकरी संप्रदायाने यादव यांच्या राजीनाम्यासाठी झुंडशाहीचा अवलंब करणे ही या संप्रदायाच्या थोर परंपरेला काळिमा फासणारी घटना असल्याचे नमूद केले. मात्र अशी भूमिका मांडणारे पत्रक आम्ही प्रसिद्धीस दिले नव्हते हेही त्यांनी मान्य केले.