Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरुण गांधी आणखी अडचणीत!
नागरिकांना पैसे वाटून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका
पिलिभित, १९ मार्च/पी.टी.आय.

आपल्या तथाकथित मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वरुण गांधी आता

 

नव्या अडचणीत सापडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे येथील उमेदवार असणाऱ्या वरुण यांनी येथील काही नागरिकांना पैसे वाटल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. नागरिकांना पैसे वाटून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका उपजिल्हा न्यायदंडाधीकाऱ्यांनी वरुण यांच्यावर ठेवला आहे.
नायब तहसीलदार झांकी प्रसाद यांनी केलेल्या चौकशीत वरुण गांधी यांनी ४ मार्च रोजी येथील दोन व्यक्तींना पैसे वाटल्याचे उघड झाल्याचे उपजिल्हा न्यायदंडाधीकारी एम.ए. अख्तर यांनी सांगितले. विलासपूर येथील निवडणुक दौऱ्यावर असताना त्यांनी येथील काही नागरिकांना वरुण यांनी पैसे वाटल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका विक्रेत्याच्या नातेवाईकांना १० हजार रुपये तर आणखी काही जणांना ५ हजारांची मदत त्यांनी केल्याचे या तक्रारींमध्ये म्हटले होते. जिल्हा न्यायदंडाधीकारी एम.पी अग्रवाल यांनी या तक्रारींच्या आधारावर चौकशीचे आदेश दिले होते. उपजिल्हा न्यायदंडाधीकाऱ्यांनी काल याबाबत तक्रारीशी संबधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली. यात वरुण यांच्यावरील तक्रारीत तथ्य आढळले आहे.
अटक टाळण्यासाठी वरुण गांधी उच्च न्यायालयात
तथाकथित वक्तव्यांमुळे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या वरुण गांधी यांनी अटकपूर्व जामिनासाठी आज दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. उत्तर प्रदेशात अटकपूर्व जामीनाची तरतूद नसल्यामुळे कोणत्याही क्षणी वरुण यांना अटक होऊ शकते, असा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने दिल्ली उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.पी.शाहा यांच्या खंडपीठापुढे सादर केला.