Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संगमा भडकले, काँग्रेसशी कुठेही युती न करण्याचा राष्ट्रवादीकडे आग्रह
नवी दिल्ली, १९ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने देशभरात कुठेही युती करू नये, असा आग्रह करून राष्ट्रवादी

 

काँग्रेसचे संस्थापक सदस्य पी. ए. संगमा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आपल्या पक्षापुढे पुन्हा राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसशी युती केल्यामुळे संतप्त होऊन संगमा यांनी पवार यांच्याविरुद्ध बंड केले होते.
मेघालयात राष्ट्रवादीचे समर्थन असलेले सरकार अल्पमतात आल्यानंतर ज्या विधानसभा अध्यक्षांच्या मतामुळे कसेबसे तरले. पण केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेघालयात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली. त्यामुळे संगमा भडकले आहेत. आज दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद बोलावून संगमा यांनी काँग्रेस पक्ष, मेघालयचे राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते यांच्यावर जोरदार आगपाखड केलीआणि राष्ट्रपती राजवट लादण्याच्या केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.
मेघालयात राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेणाऱ्या बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. आपण या निर्णयाचा जोरदार विरोध केला. पण एकाकी पडलो, असे पवार यांनी आपल्याला फोन करून सांगितले, अशी माहिती संगमा यांनी दिली. मात्र, सूत्रांच्या मते मेघालयात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या निर्णयाला बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवार यांनी फारसा विरोध केला नाही. गृहमंत्री चिदंबरम यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यामागची पाश्र्वभूमी समजावून सांगताच पवार यांचा विरोध मावळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण मेघालयमधील सरकार बडतर्फ होताच संगमा संतप्त झाले असून काँग्रेसशी राष्ट्रवादीने देशभरात कुठेही निवडणूक समझोता करू नये, असा आग्रह त्यांनी धरला आहे. अर्थात आपण पवार यांना अशी विनंती करणार असून याविषयी भूमिका घेणे त्यांच्यावर अवलंबून असेल, असेही संगमा म्हणाले. तारीक अन्वरसारख्या व्यक्तीसाठी बिहारमध्ये एक जागा सोडण्यासाठी काँग्रेसला पुढाकार घेता येऊ नये, यावर त्यांनी रोष व्यक्त केला. २००४ साली लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी सोनिया गांधी पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर संगमा असेच संतप्त झाले होते.एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मूळ पक्ष असल्याचा निवडणूक आयोगात दावा केला होता. यंदा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमुळेच संगमा यांचा भडका उडाला आहे.
मेघालयात जे काही घडले त्याचे खापर संगमा यांनी राज्यपाल मुसाहारी यांच्यावर फोडले. मुसाहारी यांना आयुष्यात केवळ दुसऱ्यांच्या आदेशांचे पालन करण्याचेच काम जमले, अशी बोचरी टीका त्यांनी केली. लपांग यांनी १३ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रातील मुद्दे उचलून राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले, असाही आरोप संगमा यांनी केला.
मुसाहारी लपांग यांच्या आदेशानुसार वागले, असेही ते म्हणाले.ओपन हार्ट सर्जरीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीची अध्यक्षता करणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यपाल मुसाहारींचा राष्ट्रपती राजवटीचा बेकायदेशीर प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल संगमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व या निर्णयाचे ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वत्र पडसाद उमटतील, असा इशारा दिला.