Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साहित्यसंमेलन अध्यक्षांविनाच
आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित; अध्यक्षीय भाषणही होणार नाही
सुनील माळी / गणाधीश प्रभुदेसाई
महाबळेश्वर, १९ मार्च

साह्त्यि संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवून अध्यक्षांविना

 

संमेलन पार पाडण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या आज रात्री येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षांचे भाषण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांची निवड आणि ठराव-चर्चेवरून वाद होण्याची परंपरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नवीन नाही. परंतु, अध्यक्षांविना आणि अर्थातच अध्यक्षीयभाषणही न होताच संमेलन भरविण्याचा अभूतपूर्व प्रसंग मात्र प्रथमच घडत आहे.
यादव यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीतील मजकुरास आक्षेप घेऊन यादव यांच्या राजीनाम्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. त्यानुसार यादव यांनी संमेलनास तीन दिवस बाकी असतानाच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी महामंडळाची तातडीची बैठक संमेलनाच्या आदल्या रात्री महाबळेश्वर येथील हॉटेल निता येथे झाली. त्यात हा निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते.
आजच्या बैठकीत महामंडळाच्या वीस सदस्यांपैकी १८ सदस्य उपस्थित होते. त्यात महामंडळाच्या पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा साहित्य संघाचे प्रतिनिधी, तसेच कर्नाटक, हैदराबाद, मध्यप्रदेश, गोवे, छत्तीसगड, गुजरात, बडोदे संलग्न व समाविष्ट संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर हे मात्र या वेळी अनुपस्थित होते.
कर्नाटकाचे प्रतिनिधी जे. एन. कदम हे रात्री पावणेदहा वाजता महाबळेश्वर येथे पोहोचले आणि रात्री दहा वाजता बैठक सुरू झाली. ती रात्री उशिरा संपली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आनंद यादव यांचा राजीनामा मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आणि ती आजच्या महामंडळाच्या बैठकीतही मांडली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे तीन मुद्दे मांडण्यात आले. त्यात, राजीनामा मंजूर करू नये, याबरोबरच तो मंजूर करून नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली तर मसाप ते मान्य करणार नाही आणि ज्या प्रवृत्तींमुळे यादव यांना राजीनामा देणे भाग पडले त्या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे अशा तीन मुद्यांचा चर्चेत समावेश होता. तसेच, या प्रवृत्तींचा महाराष्ट्राच्या आगामी पंचवीस वर्षांतील सांस्कृतिक, सामाजिक जीवनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा प्रवृत्ती वेळीच रोखल्या पाहिजेत, असेही मत परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आले.
संमेलनासाठी स्थानिक समितीने चोख व्यवस्था केली असून संमेलनासाठी मांडव उभारणी, इतर व्यवस्था उभी करण्याचे काम आज सायंकाळी वेगाने सुरू होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्या, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन हातकणंगलेकर यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र हातकऱ्णंगलेकर आजच्या बैठकीत अनुपस्थित असल्याने ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनास ते उपस्थित राहणार किंवा नाहीत याबाबतचा उलगडा होऊ शकला नाही. संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता विख्यात पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते येथे पोलीस परेड ग्राऊंडवर होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होईल.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने राजीनामा दिला अथवा अन्य काही कारणाने त्याने माघार घेतली तर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठीची बैठक बोलाविण्यासाठी किमान ७ दिवसांची सूचना दिली जावी, अशी तरतूद महामंडळाच्या घटनेत आहे. परिणामी आजच्या बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अध्यक्ष आणि अध्यक्षीय भाषणाविना संमेलन भरविण्याचा निर्णय घ्यावा लागला. अध्यक्षांविनाच संमेलन भरविण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही घटना अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक असून हा आमचा पराभवच असल्याची भावना बैठकीतील काही सदस्यांनी बोलून दाखविली.