Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
प्रादेशिक

उद्धव ठाकरे -राजनाथ सिंग यांच्या
पहिल्याच सभेला आचारसंहितेचा फटका

मुंबई, १९ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच आता आचारसंहितेचे फटकेही राजकीय पक्षांना बसत आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या मैदानांवर राजकीय पक्षांना सभा घेण्याची परवनागी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी कामगार क्रिडा भवन येथे होणाऱ्या युतीच्या पहिल्याच सभेचे ठिकाण बदलण्याची वेळ युतीच्या नेत्यांवर आली. आता ही सभा शिवडी येथे स्वान मिलच्या जागेवर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्या शिवसेना -भाजप युतीतर्फे फोडण्यात येणार आहे. यासाठी कामगार क्रिडा भवन येथे सभा होणार होती.

लोकलमध्ये गळफास लावलेला मृतदेह आढळला
मुंबई, १९ मार्च / प्रतिनिधी

बोरिवली येथे आज पहाटे लोकल गाडीमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेतील इसमाचा मृतदेह आढळल्याने स्थानकात घबराट पसरली. लोकलमध्ये सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास अंधेरी यार्डातून बोरिवली स्थानकात दाखल झालेल्या लोकल गाडीत हा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

सेन्सेक्स नऊ हजारांवर!
महागाई निर्देशांक प्रथमच अध्र्या टक्क्याखाली
मुंबई, १९ मार्च/व्यापार प्रतिनिधी
गेले महिनाभर सुरू असलेला हुलकावणीचा खेळ सोडून शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने आज ९००० अंशांपुढे मजल मारली. तर दुसऱ्या बाजूला मार्च अखेपर्यंत चलनवाढ अर्थात महागाईचा निर्देशांक शून्यावर येईल या अपेक्षित भाकितानुरूप, आज जाहीर झालेल्या महागाईचा निर्देशांक गेल्या सप्ताहातील २.४३ टक्क्यांवरून झपाटय़ाने खाली ओसरून ०.४४ टक्क्यांवर गेल्याचे आढळून आले.

व्हिडिओकॉन जमीन प्रकरणाचे रेकॉर्ड हायकोर्टाने मागविले
मुंबई, १९ मार्च/प्रतिनिधी

व्हिडिओकॉन इंटरनॅशनल या कंपनीस वर्षांला ८० लाख ‘एलसीडी स्क्रीन’ उत्पादित करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन मुंबईतील ‘सिडको’ची १०० एकर (२५० हेक्टर) जमीन देण्याच्या निर्णयासंबंधीचे राज्य सरकार व ‘सिडको’कडील सर्व मूळ रेकॉर्ड उच्च न्यायालयाने मागविले असून या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण तीन जनहित याचिकांवर येत्या ३० मार्चपासून अंतिम सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. त्या वेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट २००८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता व त्याअनुषंगाने औपचारिक शासन निर्णय नगरविकास खात्याने २५ ऑगस्ट रोजी जारी केला होता.

डावी आघाडी स्वबळावर कधीच सत्तेवर येणार नाही - आनंद शर्मा
मुंबई, १९ मार्च / खास प्रतिनिधी
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी काँग्रेस व यूपीएची कामगिरी अधिक चांगली होईल, असा विश्वास परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज व्यक्त केला. तसेच तिसऱ्या आघाडीला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असेही भाकित त्यांनी व्यक्त केले.
डाव्या आघाडीचे सध्या ६३ खासदार असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या खासदारांची संख्या घटेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. देशात काँग्रेस किंवा भाजपप्रणित आघाडीला पंतप्रधानपद मिळू शकते. डाव्या आघाडी स्वबळावर कधीच सत्तेवर येऊ शकत नाही, असेही शर्मा यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदाची इच्छा बाळगण्यात काहीच चुकीचे नाही. मात्र यूपीएमध्ये पंतप्रधानपदासाठी जागा (व्हेकन्सी) शिल्लक नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच टोला हाणला. गेले पाच वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी चांगले काम केले आहे. देशाप्रमाणेच विदेशातही त्यांच्या कामाची प्रशंसा झाली आहे. पाच वर्षे यूपीए सरकारने केलेल्या चांगल्या कामांमुळे काँग्रेसप्रणित आघाडीच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण असले तरी निवडणुकीत त्याचा परिणाम होत नाही हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. २९ नोव्हेंबरला दिल्लीत मतदान झाले होते. तर राजस्थान विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात झाले.

‘अंतरिम अर्थसंकल्पात विकासाचा समतोल’
मुंबई, १९ मार्च/ खास प्रतिनिधी
अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत मंदीच्या पाश्र्वभूमीवर आणि सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरही विकासाचा संपूर्ण समतोल असणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचा दावा अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज विधिमंडळात केला. अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यावर कर्जाचा बोजा असल्याची टीका असली तरी आम्ही करवाढ केलेली नाही की ओव्हरड्रफ्ट काढला नाही. विकासकामांसाठी कर्ज काढले असून सहाव्या वेतन आयोगामुळे पडलेला भार व शेतकरी कर्जमाफीनंतरही विकास कामांवरील खर्चात कोणतीही कपात झाली नसल्याचे ते म्हणाले.