Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

स्वस्त सरबताची विक्री सुरूच; कारवाई कोणी करायची याबाबत प्रश्नचिन्ह कायम
प्रसाद मोकाशी

मुंबईकरांच्या आरोग्याची ऐशीतैशी करीत सर्वत्र स्वस्त दरामध्ये मिळणाऱ्या सरबताची विक्री अद्यापही सुरू असून, त्यावर कोणी कारवाई करायची याबाबत संबंधित यंत्रणांमध्येच संभ्रम आहे. पालिकेचा आरोग्य विभाग, राज्य शासनाच्या अखत्यारीतील अन्न आणि औषध प्रशासन आणि केंद्र शासनाचा अन्न प्रक्रिया विभाग नेमकी कोणती कारवाई करायची याच प्रश्नावर अडून बसली आहे.

गेले सात महिने होमगार्ड्स भत्त्याविना
सुनील डिंगणकर

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ३१ डिसेंबर, निवडणुका या प्रसंगी शासनाला गृहरक्षक दलाची (होमगार्ड) आठवण होते. अनेक वेळा पोलीस, वाहतूक पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे साडेतीन हजार जवान तैनात असतात. या कामासाठी त्यांना प्रतिदिनी २०० रुपये भत्ता देण्यात येतो. मात्र गेले सात महिने होमगार्ड भत्त्याविनाच काम करीत आहेत. या संदर्भात तक्रार करणाऱ्या होमगार्डस्ना घरी बसा असे सांगण्यात येते. त्यामुळे मुंबई होमगार्डची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी झाली आहे.

मराठी कलावंतांचा ‘चिरायू’ स्नेहमेळावा!
नाटय़-प्रतिनिधी

१९९३ साली विनय आपटे आणि मंगेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रांतील कलावंतांचा ‘चिरायू’ स्नेहमेळावा भरविण्याची कल्पना गुढी पाडव्याचे औचित्य साधून पहिल्यांदाच मूर्त स्वरूपात आली होती. सहभागी कलावंतांच्या आर्थिक सहभागातून मराठी संस्कृती- परंपरा जागविण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा स्नेहमेळावा कलाक्षेत्रात भ्रातृभाव रुजविण्यात यशस्वी ठरला होता. यानिमित्ताने पारंपरिक वेशभूषा, खाद्यपदार्थ, खेळ, नाचगाणी यांची लयलूट चिरायू मेळाव्यात होत असे.

इको-फ्रेण्डली प्रतिकात्मक गुढी महोत्सव
प्रतिनिधी

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मुंबई हट’तर्फे इको-फ्रेण्डली प्रतिकात्मक गुढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाशी संतुलन राखणाऱ्या साहित्यापासून बनवलेल्या आणि शो-केशमध्ये, कार्यालयामध्ये, लहानग्यांच्या भातुकलीमध्ये सामावली जाईल अशी शोभिवंत गुढी व कारमध्ये गणेशाच्या मुर्तीसोबत दिमाखात उभी राहील अशी कार-गुढी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.

म्हाडातील दलालाला चार घरांचे वाटप!
आणखी एक घोटाळा उघड

निशांत सरवणकर
मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार कोटा, विनिमय १६, म्हाडा कायदा १३ (२) या अंतर्गत घरांचे परस्पर वितरण करून घेण्याचा गृहनिर्माण विभागातील घोटाळा ताजा असतानाच आता भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये आता एका दलालाला चार घरांचे वाटप झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. यापैकी दोन घरे म्हाडाने ताब्यात घेतली आहेत. या घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

नादानुभव आणि आनंदानुभव
मराठी नवकवितेचे प्रवर्तक कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सध्या सुरू आहे. १ डिसेंबर १९०९ हा त्यांचा जन्मदिन आणि २० मार्च १९५६ हा त्यांचा स्मृतिदिन. त्यामुळे मी त्यांच्या कवितांना संगीतबद्ध करून केलेल्या कार्यक्रमांच्या स्मृतींनी मनात गर्दी केली. त्या स्मृती जागविण्याचा हा प्रयत्न. कवितांची गोडी लहानपणापासून होती. त्यामुळे वेगवेगळ्या कवींच्या, मासिकांतून किंवा कवितासंग्रहातून प्रसिद्ध झालेल्या कविता वाचत होतोच.

अंध व्यक्ती करू शकणार डोळसपणे मतदान
प्रतिनिधी

मतदान करण्यासाठी अंध व्यक्तींना आतापर्यंत एखाद्या डोळस व्यक्तीची मदत घ्यावी लागत असे. यंदाच्या निवडणुकांमध्ये मात्र अंध व्यक्ती स्वतंत्रपणे मतदान करू शकणार आहेत. कारण प्रत्येक उमेदवाराचे नाव, पक्ष आणि चिन्ह यांची माहिती ब्रेल लिपीमध्ये असलेली माहितीपत्रिका प्रत्येक मतदान केंद्रात उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरही ब्रेलमध्ये क्रमांक असणार आहेत. त्यामुळे अंध व्यक्तिंना डोळस व्यक्तीच्या मदतीशिवाय मतदान करता येणार आहे. त्याचप्रमाणे पायाने अधू असलेल्यांना मतदान केंद्रात सहज प्रवेश करता यावा, यासाठी लाकडाचे रॅम्पही तयार करण्यात येणार आहेत. या संदर्भात माहिती देताना ‘नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड’ या संस्थेचे सचिव सुहास कर्णिक यांनी सांगितले की, भारतातील अपंगांची संख्या सुमारे ५ ते ६ टक्के आहे. २००१ साली झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अंधांची संख्या सुमारे १८ लाख आहे. मतदानाच्या बाबतीत असुविधा असल्यामुळे मतदानाचा हक्क असलेल्या अपंग व्यक्ती मतदानाविषयी फारशा उत्सुक नसतात. ते पुढे म्हणाले की, भारतातील अपंगांचा विकास करण्याच्या दृष्टीने कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख नसतो. यंदाच्या निवडणुकीत देण्यात आलेल्या या सुविधेमुळे अपंग व्यक्तींकडून होणाऱ्या मतदानाच्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा कर्णिक यांनी व्यक्त केली.

‘स्लमकिड्स’साठी ‘परिवर्तन’चे करिअर फेअर
प्रतिनिधी

शाळा-महाविद्यालयांतून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सर्वत्रच करिअर फेअर आयोजित केल्या जातात. मात्र कधीही शाळेतून गेलेल्या अथवा परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडाव्या लागलेल्या झोपडपट्टय़ांमधील मुलांसाठी त्यांचे आयोजन कोणीही करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन वांद्रे येथील युवा परिवर्तन या स्वयंसेवी संघटनेने येत्या २८ व २९ मार्च रोजी ‘स्लमकिड्स’साठी आगळ्यावेगळ्या करिअर फेअर आयोजन केले आहे. यंदा या करिअर फेअरचे सहावे वर्ष असून वांद्रे येथील संस्थेच्या मुख्यालय असलेल्या खेरवाडी परिसमालयात हे फेअर भरणार आहे.
या करिअर फेअरमध्ये सहभागी मुलांना व पालकांना करिअरविषयी माहिती, समुपदेशन आणि संधी या चार दृष्टीने विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवा परिवर्तन गेली १० वर्षे ‘स्लमकिड्स’साठी कार्यरत आहे. मुंबई-पुण्याखेरीज ठाणे, वसई, कल्याण, वाडा, खोपोली, नाशिक आणि ग्रामीण व शहरी भागांत संस्थेकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघटनेकडून झोपडपट्टीतील मुलांना रिपेअरींग, मोटार मॅकेनिक, ड्रायव्हिंग व मुलींना ब्युटीशियन, टेलरिंग आदी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. काही उद्योगसमूहांकडून नोकऱ्यांची संधीही या मुलांना उपलब्ध करून दिल्या जातात. अधिक माहितीसाठी मृणालिनी खेर-२६४७४३८१ यांना संपर्क साधावा.

प्रात:स्वरमध्ये शशांक मक्तेवार यांचे गायन
प्रतिनिधी

मुंबईतील शास्त्रीय संगीताचे चाहते आणि त्यातील तज्ज्ञांसाठी ‘पंचम निषाद’ने येत्या २२ मार्च रोजी ‘प्रात:स्वर’अंतर्गत शशांक मक्तेवार यांच्या गायनाचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. २२ मार्च रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिराशेजारील कला अकादमीच्या खुल्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता रसिकांना हा गायनाचा आस्वाद घेता येणार आहे. शशांक मक्तेवार यांना या वेळी तबल्यावर भारत कामत आणि हार्मोनियमवर अजय जोगळेकर साथ देणार आहेत. कार्यक्रमाविषयीच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी रवींद्र नाटय़मंदिर-२४३१२९५६, पंचम निषाद- २४१८८४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘चालले मी संगतीने’ ध्वनिफीत प्रकाशित
प्रतिनिधी

अवघ्या आठ दिवसांत, आठ गाण्यांना अप्रतिमपणे स्वरबद्ध करणाऱ्या संगीतकार उषा टिकेकर- देशपांडे यांच्या विद्वत्तेला सलाम करायला हवा, असे कौतुकास्पद उद्गार विख्यात संगीतकार श्रीधर फडके यांनी येथे बोलताना काढले. रसिकांच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या ‘चालले मी संगतीने’ या ध्वनिफितीच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सोहम प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात पार पडला. या ध्वनिफितीचे अनावरण श्रीधर फडके आणि विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केले. या ध्वनिफितीच्या गीतकार, निवेदिका आणि निर्मात्या सविता दामले यांच्या लेखणीचे आणि साधना सरगम, वैशाली सामंत, विद्या करलगीकर, अंजली नांदगावकर- तळेकर, मंदार आपटे या गायकांच्या अदाकारीचे श्रीधर फडके यांनी कौतुक केले. या वेळी सविता दामले, उषा टिकेकर- देशपांडे आणि संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांनी या ध्वनिफितीच्या निर्मितीमागील कल्पना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या वेळी साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी या ध्वनिफितीमधील प्रत्येकी एका गीताची झलक सादर केली, तर आरती अंकलीकर- टिकेकर यांनी एक बंदिश सादर करून सर्व कलाकारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. आयोजक विनीत गोरे यांनी सूत्रसंचालन केले.