Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

नगर-औरंगाबाद रस्त्यावर शहर वाहतूक शाखा कार्यालयाजवळ गुरुवारी पहाटे कंटेनर दुकानात घुसून अपघात झाला.

सभा टाळणे सत्ताधाऱ्यांसाठी अशक्य
स्थायी समिती निवड

नगर, १९ मार्च/प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समितीची रेंगाळलेली प्रक्रिया गतिमान झाली असून, येत्या काही दिवसांतच यासाठीच्या सर्वसाधारण सभेची सूचना जारी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीशी संबंधित विषय असल्याने त्यासाठीची सभा टाळणे किंवा तिला विलंब लावणे महापौरांना शक्य नसल्याचे समजते. राजकीयदृष्टय़ा स्थायी समिती सदस्यांची निवड होणे अडचणीचे असल्याने महापौरांकडून सभेस विलंब लावला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, त्यांना तसे करणे शक्य नसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तसे केलेच, तर नगरविकास विभागाकडून विचारणा केली जाण्याची तरतूद मनपा कायद्यात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सावधान पृथ्वी तापत आहे
अरे, मधेच कसा काय पाऊस पडला? द्राक्षाची पार वाट लागली! हवामानाच सगळं स्वरूपचं बदलयं. ऋतूचक्र तर पार विस्कळीत झालंय. या वर्षी हिवाळ्यात थंडी अशी कधी जाणवलीच नाही! पाऊस तर काय, वाटेल त्यावेळी पडतोय, कुठे वादळी तर कुठे अजिबात नाही. निसर्गाचं हे चित्र सातत्याने वाढतच चालले आहे. पृथ्वीच्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. हे बदल दीर्घकाळ टिकणारे आहेत. याचा परिणाम सर्वच राष्ट्रांना भोगावा लागणार आहे. यातला मुख्य परिणाम म्हणजे. ‘पृथ्वी तापत आहे’आपल्या शरीराचे तापमान वाढले तर आपण त्याला ‘ताप आला’ म्हणतो आपण लगेच आडवे होतो, डॉक्टरकडे जातो, आवश्यक ती सर्व काळजी घेतो आणि ताप नियंत्रणात ठेवतो. हेच पृथ्वीला झालयं. त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो? सूर्यापासून निघालेली किरणे वातावरणातून पृथ्वीवर येऊन आदळतात. ही किरणे पृथ्वीवर आल्यावर बरीचशी उष्णता जमिनीत शोषली जाते. काही उष्णता पुन्हा वातावरणातून अवकाशात फेकली जाते.

‘संवेदनशील मतदानकेंद्रे नव्या निकषांनुसार निवडा’
जिल्हाधिकाऱ्यांचा पोलिसांना आदेश
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील संवेदनशील मतदानकेंद्रांच्या पोलिसांनी दिलेल्या संख्येबद्दल असमाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी निवडणूक आयोगाच्या नव्या निकषांप्रमाणे संवेदनशील मतदानकेंद्रांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मतदारांना त्रास देऊ शकतील, असे समाजकंटक, राजकीय पक्षांशी संबंधित गुंड यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तत्काळ सुरू करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने त्यांनी आज नियोजन भवन येथे पोलीस अधिकारी, तसेच निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

काकडीतील खातेदारांना जमीन
संपादनाबाबत २६पर्यंत नोटिसा
शिर्डी विमानतळ
पोहेगाव, १९ मार्च/वार्ताहर
शिर्डी विमानतळासाठी काकडीतील ७६३ एकर जमीन संपादनाच्या नोटिसा संबंधित खातेदारांना दि. २६पर्यंत बजावण्यात येतील. संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे करार करून तत्काळ पैसे देण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी गुलाबराव पादीर यांनी दिली. विमानतळ काकडीत उभारण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणाने सर्व पूर्वतयारी केली आहे. विमानतळाची प्रक्रिया गेल्या २-३ वर्षांपासून रेंगाळली. सरकारने बदललेली नियमावली, त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी यात विमानतळ अडकले होते.

राहुरीत दोन दुकाने फोडून
चोरी, दोघांना ताब्यात घेतले
राहुरी, १९ मार्च/वार्ताहर

नगरसेवक अरुण ठोकळे यांचे नवीपेठेतील चप्पले व शेजारील धावडे यांचे देशी दारूचे दुकान रात्री फोडून रोख रक्कम, सुटी नाणी, तसेच अन्य ऐवज लुटण्यात आला. पोलिसांनी या बाबत दोघांना ताब्यात घेतले. बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर महामार्गानजीक ठोकळे यांचे दुकान आहे. चोरटय़ांनी शटरच्या साईडपट्टय़ा कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला.

‘शिर्डीत बाहेरील उमेदवार नको’
श्रीरामपूर, १९ मार्च/प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने स्वतकडे ठेवून कार्यकर्त्यांला उमेदवारी द्यावी. बाहेरील उमेदवार लादू नये, अशी मागणी इच्छूक उमेदवार प्रेमानंद रूपवते यांनी केली आहे.
उमेदवारीसाठी रूपवते नवी दिल्लीत तळ ठोकून असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, पक्षाचे प्रभारी ए. के. अ‍ॅण्टोनी, पक्षाचे निवडणूक निरीक्षक मलिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार बाळासाहेब विखे यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. शिर्डी मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे.

शिंपी समाजाच्या ‘नामावली’चे आज प्रकाशन
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी
शिंपी समाजाचा परिचय असलेल्या ‘नामावली’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (शुक्रवारी) संत नामदेवमहाराजांचे १७वे वंशज ज्ञानेश्वर तुळशीदास नामदास (रेळेकर) महाराज (पंढरपूर) यांच्या हस्ते होणार आहे. शिंदे मळा (सावेडी रस्ता) येथील संत नामदेव मंदिरात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या सोहळ्याला चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर, आमदार अनिल राठोड, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, शिवाजी शेलार, पत्रकार दत्ता वडे, बबन वाकळे आदी उपस्थित राहणार आहेत. समाजबांधव व हितचिंतकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लोळगे, सुनील लोळगे आदींनी केले आहे.

‘घराला घरपण मिळण्यास ज्येष्ठांना मानसन्मान हवा’
श्रीरामपूर, १९ मार्च/प्रतिनिधी

प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीत महिलांचा मोठा हातभार असून, घराला घरपण येण्यासाठी ज्येष्ठांना मानसन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे आवाहन पंचायत समितीच्या उपसभापती सुनिता गायकवाड यांनी केले.अशोकनगरच्या महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. त्याप्रसंगी गायकवाड बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच हिराबाई गायधने होत्या. घरातील ज्येष्ठ महिला कुटुंबाचा आधार असतात. मात्र, आज ज्येष्ठांची हेळसांड केली जाते. ज्येष्ठांना सर्वानी मानसन्मानाची वागणूक द्यावी, असे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज नियोजन भवनात बैठक
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी उद्या (दि. २०) जिल्ह्य़ातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यांनी बोलावलेली ही दुसरी बैठक. पहिल्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस वगळता काँग्रेस, सेना, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह सर्वानीच पाठ फिरवली. फक्त एकच प्रतिनिधी पहिल्या बैठकीला उपस्थित असलेला बघून खुद्द जिल्हाधिकारीही चकित झाले. त्यामुळेच दुसऱ्या बैठकीची सर्वाना व्यवस्थित माहिती द्या, असे निवडणूक शाखेला त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे या शाखेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीची माहिती दिली आहे. उद्या सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृहात ही बैठक होईल. निवडणुकीची बहुचर्चित आचारसंहिता, तसेच काही नवे नियम, अटी, कायदे यांची माहिती या वेळी दिली जाणार आहे.

भिंगारच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा गांधींसाठी राजीनाम्याचा इशारा
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी
दिलीप गांधी यांना नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही, तर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या भिंगार शहर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न देऊन अन्याय केलेल्या गांधी यांच्यासारख्या निष्ठावान नेत्याला पुन्हा टाळले जात असेल, तर कार्यकर्ते ते सहन करणार नाहीत. पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे शिवाजी दहिहंडे, हिरालाल माखिजा, सुनील देवतरसे, श्रीधर भालेराव आदींनी म्हटले आहे.

इंडियन सीमलेसमध्ये महामृत्यूंजय याग
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी
जिल्हा मजदूर सेनेतर्फे एमआयडीसी येथील इंडियन सीमलेस कंपनीमध्ये नुकताच सव्वा लाख महामृत्यूंजय मंत्राचा जप व याग करण्यात आला. जागतिक मंदीचे सावट दूर व्हावे, कारखान्याची भरभराट व्हावी, अकाली मृत्यू पावलेल्या कामगारांना सदगती लाभो आदी कारणांसाठी या यागाचे आयोजन करण्यात आले होते. पौरोहित्य संजय कुलकर्णी गुरुजी यांच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणवृंदांनी केले. संयोजन मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबू टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस वसंतसिंग यांनी केले. या यागाच्या पूर्णाहुतीसाठी राजू सावंत, अनिल गिरी, अशोक वीर, भाऊसाहेब वाकळे, मिलिंद शेटे आदी सहभागी झाले होते.

आयुक्त केळकर आज रूजू होणार
नगर, १९ मार्च/प्रतिनिधी
महापालिका आयुक्त कल्याण केळकर उद्या (शुक्रवारी) रूजू होत आहेत. ते आजारपणाच्या दीर्घ रजेवर होते. मनपातील राजकीय चढाओढीस कंटाळून आयुक्तांनी रजा घेतली असल्याची चर्चा होती. ते रजा वाढवून घेणार असल्याचे बोलले जात होते. पंधरा दिवसांची रजा त्यांनी पुन्हा १ आठवडा वाढवल्याने या चर्चेला पुष्टी मिळत होती. मात्र, केळकर खरोखरच आजारपणाच्या रजेवर होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी विश्रांती म्हणून रजा घेतली होती.

साईबाबा संस्थानचे डॉ. माने, उपकार्यकारी अधिकारी
राहाता, १९ मार्च/वार्ताहर

डॉ. यशवंत माने यांची श्रीसाईबाबा संस्थानच्या उपकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
संस्थानच्या विश्वस्तांनी भाविकांची वाढती गर्दी व विविध भक्तोपयोगी प्रकल्प विचारात घेऊन सरकारच्या मान्यतेने प्रशासनात उपकार्यकारी अधिकारीपदाची निर्मिती केली. डॉ. माने यांना पहिले उपकार्यकारी अधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. पशुवैद्यकीय शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. माने यांनी यापूर्वी तहसीलदार म्हणून कोल्हापूर, सांगली, माळशिरस व राहाता येथे काम केले आहे. माळशिरस येथे असताना श्रीक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी न्यासाच्या विकासकामांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. डॉ. माने यांचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

हार्वेस्टरखाली सापडून एकाचा मृत्यू
देवळाली प्रवरा, १९ मार्च/वार्ताहर
राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे हार्वेस्टर अंगावरून गेल्याने एकजण जागीच ठार झाला. याबाबत पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील तुळशीराम शंकर खपके यांच्या शेतात १७ मार्च रोजी गव्हाची मळणी चालू होती. सतीश पाटोळे हा चालक हार्वेस्टरमधील (एमएच १७ व्ही १६९४) गहू रात्री १० वाजण्याच्या सुमारास खाली करण्याकरिता चालला असताना जनार्दन पोपट खपके (वय ३०) हा त्याखाली सापडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोपट लक्ष्मण खपके (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक पाटोळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार आर. डी. गवांदे करीत आहेत.

धनादेश न वटल्याने शिक्षा
नगर १९ मार्च/प्रतिनिधी

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने राजेश कुंदनमल उपाध्ये (रा. नवीपेठ) यास ३ महिने कैद व ४ लाख रुपये नुकसानभरपाई अशी शिक्षा ठोठावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुप्रिया निकम यांनी हा निकाल दिला. फिर्यादी महेश नागरी पतसंस्थेतर्फे वकील प्रदीप भंडारी यांनी काम पाहिले. उपाध्ये याने कर्जाच्या थकबाकीपोटी पतसंस्थेस धनादेश दिला होता. मात्र तो न वटल्याने न्यायालयाने उपाध्ये यास शिक्षा ठोठावली.