Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

सराफा व्यापाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ नागपूरच्या सराफा व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सराफा बाजार बंद
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

एका सराफा व्यापाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी आज त्यांची दुकाने बंद ठेवली. या व्यापाऱ्यांनी इतवारी परिसरातमोर्चा काढून निदर्शने केली. पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.

बीजगणिताच्या पेपरला कॉपीचा ऊत
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

कॉपी पुरवताना शिक्षकाला पकडले
२०० पेक्षा अधिक विद्यार्थी सापडले
नागपूर विभागात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मौदा, उमरेड या तालुका ठिकाणी २०० पेक्षा अधिक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांसह गोंदिया जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला कॉपी पुरवताना पकडण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा अतिशय महत्त्वाचा पेपर. अनेक विद्यार्थी या विषयात अनुतीर्ण होत
असतात.

बी.सी. सेलमध्ये दडलंय काय?
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत वाद

नागपूर, १९ मार्च/ प्रतिनिधी

िबदूनामावलीच्या (रोस्टर) मुद्दय़ाला धरून व्यवस्थापन परिषदेतील प्रशासनाच्या दोन अधिकाऱ्यांमधील खडाजंगी आणि त्यानंतर कुलगुरूंबरोबर झालेल्या गुप्त बैठकीमुळे मागासवर्गीय कक्षाच्या (बी.सी. सेल) बिंदूनामावलीत नेमके दडलंय काय? अशी शंका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. शासनामार्फत बिंदूनामावली प्रमाणित करण्यास प्रशासनातील काहींचा विरोध असल्याने नेमके बी.सी. सेलमध्ये दडलंय काय?

मटका कुल्फीची दुकाने थाटली
नागपूर, १९ एप्रिल/ प्रतिनिधी

शहरात नावाजलेल्या आईस्क्रीमची दुकाने चौकाचौकात असूनही उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसांची धाव असते ती रस्त्यावर थाटलेल्या मटका कुल्फीवरच. उन्हाळाची चाहूल लागली की हात ठेल्यावर किंवा चौकात मिळेल त्या जागी उभे राहून छोटे व्यवसायिक व्यवसाय करीत असतात. २ ते १० रुपयापर्यंत मिळणारी ही मटका कुल्फी खाण्याचा मोह मुलेच नव्हे तर वडीलधारी मंडळींना आवरत नाही.

‘स्टार वॉर’च्या आरोपाची धुळवड सुरूच!
गोंधळाबद्दल भाजप, काँग्रेसचे परस्परांवर आरोप

नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

वास्तवातील होळीचा शिमगा आठवडाभरापूर्वीच संपला असला तरी स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ या कार्यक्रमात बुधवारी झालेल्या राजकीय शिमग्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. या कार्यक्रमात मुत्तेमवार समर्थकांनी गोधळ घातला असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला तर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच गोंधळाला सुरुवात केली, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

चोरीच्या दोन घटनेत दोन लाखाचा ऐवज लंपास
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरटय़ांनी दोन ठिकाणांवरून २ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या घटना नंदनवन आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
सिद्धेश्वरनगर, न्यू दिघोरी येथील भूषण अरविंद जामकर (२७) १७ मार्चला सायंकाळी ७ वाजता कुटुंबातील सर्व सदस्यांसह नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. यादरम्यान, चोराने मुख्य दाराचे कुलूप तोडून रोख ६० हजार रुपये व सोने चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला. दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विघ्नहर्ता सोसायटीत घडली. हर्षद नारायण देव (४१) १८ मार्चला सकाळी ७.३० वाजता देशपांडे रुग्णालयात आजारी असलेल्या वडिलांना भेटावयास गेले होते. त्यावेळी चोराने घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने, असा एकूण ९४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

आदिम जाती सेवक संघाचा महिला मेळावा
हिंगणा, १९ मार्च / वार्ताहर

भारतीय आदिम जाती सेवक संघ व ‘चाह’ प्रकल्पाच्यावतीने येथील भोई समाज सभागृहात नुकताच महिला मेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक प्रीती डुडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय आदिम जाती सेवा संघाचे सचिव प्रमोद खराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘चाह’च्या प्रकल्प अधिकारी अमृता जोशी, समन्वयक वैशाली पांढरे, विजय शेंडे, संचालक जीवनज्योती कांबळे, आलिम महाजन, लीलाधर दाभे, संजय खडतकर, गणेश धानोरकर, देवेंद्र सिरसाट, राजेंद्र सांभारे, माजी उपसरपंच चरण नागपुरे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार व ज्येष्ठ महिलांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अमृता जोशी यांनी महिलांसाठी संस्थेकडून २४ तास हेल्पलाईन सुरू असल्याचे सांगितले. महिलांना सक्षम करण्यासाठी माता-बाल संगोपन, व्यसन मुक्ती व मुलांच्या उत्थानासाठी नि:शुल्क प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमास पुष्पा वाघाडे, अरुण पारस्टे, नीलिमा पारसे, मुकेश येसनसुरे, दिलखुश फोपरे, अजय भापकर, रामकृष्णा नेवारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन चिंतामण वाघाडे यांनी केले तर वैशाली पांढरे यांनी आभार मानले.

समता बँकेच्या ठेवीदारांना पुनरुज्जीवन निधी अर्ज भरण्याचे आवाहन
नागपूर, १९ मार्च/ प्रतिनिधी

ठेवीदारांनी बँकेच्या कार्यालयात अथवा शाखेत येऊन ११ ते ४ या वेळेत बँक पुनरुज्जीवन निधी अर्ज भरून द्यावा, असे आवाहन समता सहकारी बँक कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. समता सहकारी बँकेला लिक्विडेशनमध्ये टाकण्याच्या रिझव्‍‌र्ह बँक व सहकार खात्याच्या प्रयत्नांना संघटनेने आवाहन दिले आहे. संघटनेने काही प्रस्तावांवर काम करणे सुरू केले आहे. त्यानुसार ठेवीदारांचा विचार व सूचना मागवण्यात येत आहेत. तरी ठेवीदारांनी संघटनेच्या कार्यालयात किंवा शाखेत येऊन बँक पुनरुज्जीवन निधी अर्ज भरून द्यावा व स्वीकृती प्रदान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मधुमेहींकरिता आरोग्य विमा
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

भारतातील स्टार हेल्थ आणि अलाईड विमा कंपनी लिमि. ने २६ ते ६५ वर्ष वयादरम्यानच्या मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी एक आरोग्य विमा योजना तयार केली आहे. वयाच्या ७० व्या वर्षांपर्यंत विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्यात येईल. या योजनेत विम्याची रक्कम ५० हजार ते ५ लक्ष रुपये अशी विमा धारकाच्या इच्छेनुसार राहील. नागपुरातील नामवंत ५० रुग्णालये तसेच भारतातील ५ हजार ५०० रुग्णालये या योजनेसाठी निवडण्यात आली आहेत. जर विमाधारक आजारी पडला तर, त्याला या रुग्णालयात पैसे जमा न करताही औषधोपचार घेता येईल. इतर रुग्णालयात उपचार घेतल्यास विमा धारकाला औषधांची आणि रुग्णालयाची बिले दिल्यानंतर झालेला पूर्ण खर्च मिळेल. काही विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा योजनेत, विम्याचा दावा मंजुरीसाठी ‘थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर’ ची नेमणूक करण्यात येते पण, या योजनेत विमा धारकाला लगेच सेवा उपलब्ध करून देण्यात येते. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी या आरोग्य विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टार हेल्थ आणि अलाईड विमा कंपनी लिमि. चे आर्थिक सल्लागार डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेचा २६ मार्चपासून संगीत महोत्सव
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे २६ ते २८ मार्च दरम्यान वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतातील आघाडीचे गायक वादक कलावंत हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थेच्या प्रमुख तनुजा नाफडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आधार बहुउद्देशीय संस्था १९८७ मध्ये स्थापन झाली असून संस्थेतर्फे आजपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नववर्षांचे औचित्य साधून शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. युवा पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे हा संस्थेचा उद्देश आहे. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नाफडे यांनी सांगितले. तीन दिवस होणाऱ्या संगीत महोत्सवात २६ मार्चला उस्ताद शाहीद परवेज यांचे शिष्य योगराज बोकर यांचे सतार वादन व शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. २७ मार्चला डॉ. तनुजा नाफडे यांचे शास्त्रीय गायन व पं. विश्वमोहन भट यांचे विनावादन, २८ मार्चला पद्मश्री सतीश व्यास यांचे संतुर वादन व त्यानंतर आशा खाडीलकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. कार्यक्रमाला सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. पत्रकार परिषदेला रवी नाफडे, अरविंद गरूड, श्रीरंग जोशी व संजय बंगाले उपस्थित होते.

दोन ठिकाणी आगी; साडेसहा लाखाची हानी
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

शहरात आज दोन ठिकाणी आग लागून साडेसहा लाखाचे साहित्य खाक झाले. हसनबाग व कुकडे ले-आऊटमध्ये या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
हसनबागेतील उस्मानिया मशिदीजवळील मोहमद तौफिक यांच्या रॉयल इलेक्ट्रीक दुकानाला आज सकाळी ५.४५ वाजता आग लागली. त्यात कुलरचे साहित्य व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून नष्ट झाल्या. या आगीत दीड लाख रुपये किमतीचे साहित्य जळून नष्ट झाले. ही आग शॉर्ट सर्कीटने लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. दुसरी घटना कुकडे ले-आऊट येथील प्लॉट क्र. २०७ येथे घडली. नरेश किशनचंद जैन यांचे किराणा दुकान आहे. आज सकाळी ११.४५ वाजता दुकानाला आग लागली. त्यात पाच लाख रुपये किमतीचे दुकानातील किराणा साहित्य व बिस्कीट जळून नष्ट झाले. जवानांनी परिश्रम घेऊन आग विझवली. आगीच्या कारणाबाबत माहिती मिळू शकली नाही.

लाच घेणाऱ्या व्यवस्थापकासह कनिष्ठ लिपिकाला शिक्षा
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

वडिलोपार्जित घर स्वत:च्या नावावर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडून लाच स्वीकारणारा ‘म्हाडा’चा व्यवस्थापक व कनिष्ठ लिपिक यांना विशेष न्यायालयाने एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे.
रघुजीनगर येथे राहणारे मुकुंद वासुदेवराव पांढरे यांनी वडिलोपार्जित घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडे (म्हाडा) रीतसर अर्ज करून आवश्यक ते शुल्कही भरले होते. मात्र हे घर पांढरे यांच्या नावावर करण्यासाठी म्हाडाचे इस्टेट मॅनेजर महादेव गायकवाड आणि लिपिक राजू बिरहा यांनी त्यांना एक हजार रुपयांची लाच मागितली होती. पांढरे यांनी याबाबत १७ ऑक्टोबर १९९५ला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाने सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली होती. या दोघांविरुद्ध नंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायाधीशाने या प्रकरणी सुनावणी करून दोघांवरील आरोप सिद्ध झाल्याचा निर्वाळा दिला. विशेष न्यायाधीश ए.आर. तिवार यांनी दोन्ही आरोपींना या गुन्ह्य़ातील दोन कलमांसाठी प्रत्येकी एक वर्ष कैद व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरलल्यास आणखी ३० दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अजय निकोसे व माधुरी मोटघरे यांनी काम पाहिले, तर हवालदार भोजराज माळोदे व कैलास तायडे यांनी त्यांना मदत केली.