Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सराफा बाजार बंद
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

एका सराफा व्यापाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी आज त्यांची दुकाने बंद ठेवली. या व्यापाऱ्यांनी इतवारी परिसरातमोर्चा काढून निदर्शने केली.

 

पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय करणारे सराफा व्यापारी कैलास शेषवानी यांना लकडगंज पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती शेषवानी यांनी नंतर इतर व्यापाऱ्यांना दिली. या घटनेने सराफा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला.
या घटनेचा निषेध करण्यासाठी नागपूर सराफा असोसिएशनतर्फे आज सकाळी इतवारी परिसरातून मोर्चा काढला. शहरातील सर्व सराफा व्यापारी दुकाने बंद करूनया मोर्चात सहभागी सहभागी झाले. नंतर इतवारीतील संघटनेच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अन्यायपूर्ण वागणुकीचा तीव्र निषेध केला.
सराफा व्यापारी कैलास शेषवानी यांना सोडून द्यावे, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, चोरीच्या प्रकरणातील दागिने खरेदी करणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला संघटनेच्या परवानगीशिवाय अटक करू नये, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नीलमचंद लुणावत, उपाध्यक्ष राजेंद्र अरमरकर, सचिव राजकुमार गुप्ता, गिरधर जडिया, अतुल पारेख, बंडू पाटणे यांच्यासह शहरातील सराफा व्यवसायी उपस्थित होते.
या आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यासोबत पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी चर्चा करून सराफा व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पुकारलेला बंद मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे नेते अशोक खुळे यांनी सांगितले.
याप्रसंगी परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त मधुकर पांडेय प्रामुख्याने उपस्थित होते. धरणे आंदोलनाला केंद्रीय राज्य मंत्री विलास मुत्तेमवार आणि माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनीही भेट दिली.