Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बीजगणिताच्या पेपरला कॉपीचा ऊत
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

कॉपी पुरवताना शिक्षकाला पकडले
२०० पेक्षा अधिक विद्यार्थी सापडले
नागपूर विभागात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मौदा, उमरेड या तालुका ठिकाणी २०० पेक्षा अधिक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांसह गोंदिया जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला कॉपी पुरवताना पकडण्यात

 

आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा अतिशय महत्त्वाचा पेपर. अनेक विद्यार्थी या विषयात अनुतीर्ण होत असतात. ‘काहीही करून, कसेही करून, कोणत्याही परिस्थितीत या विषयात उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे,’ याच एकमेव ‘जिद्दी’ने शहर आणि ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थी एकजुटीने कामाला लागल्याचे चित्र आज ग्रामीण भागात आणि शहरातील काही परीक्षा केंद्रांवर आढळून आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत आज बीजगणिताचा पेपर असल्यामुळे या पेपरला हमखास मोठय़ा प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळून येतात, त्यामुळे हे कॉपीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शहरात आणि ग्रामीण भागातील संवेदनशील केंद्रावर भरारी पथकाची फौज पाठवली असतानासुद्धा मोठय़ा प्रमाणात कॉपीबहाद्दर पकडण्यात आल्याची माहिती आहे. तालुका केंद्राच्या ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेरील वातावरण परीक्षा कडक बंदोबस्तात सुरू असल्याचे दर्शवणारे होते. मात्र आतून विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. ग्रामीण भागात बैठय़ा पथकांना एका खोलीत बसवण्याची व्यवस्था करून परीक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत यासाठी जे जे प्रयत्न केले पाहिजेत, असे सर्व प्रयत्न होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत होते. उमरेड, रामटेक, कळमेश्वर, काटोल, हिंगणा या नागपूर जिल्ह्य़ातील गावात कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले आहे. रामटेक येथे जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर एका शिक्षकाने परीक्षा सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांना कागदाचे चिटोरे किंवा पुस्तक जवळ असतील तर आधीच देऊन टाका, असे सांगितल्यावर एका वर्गातून दोन पोते कॉप्या निघाल्याची माहिती शिक्षण विभागाच्या पथकाने दिली.