Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्टार वॉर’च्या आरोपाची धुळवड सुरूच!
गोंधळाबद्दल भाजप, काँग्रेसचे परस्परांवर आरोप
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

वास्तवातील होळीचा शिमगा आठवडाभरापूर्वीच संपला असला तरी स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा

 

प्रधानमंत्री’ या कार्यक्रमात बुधवारी झालेल्या राजकीय शिमग्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. या कार्यक्रमात मुत्तेमवार समर्थकांनी गोधळ घातला असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला तर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच गोंधळाला सुरुवात केली, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ हा कार्यक्रम काल कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे नागपूर शहराच्या प्रतिमेला तडा गेल्याच्या तीव्र प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या होत्या. यासंदर्भात भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी परस्परांना यासाठी दोषी ठरवले.
कार्यक्रम सुरू होताच विजेच्या प्रश्नावर श्रोत्यांनी अपेक्षित उत्तर न देता मंत्र्यांनी त्याला बगल दिली. सहा वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे मंत्री उत्तर देण्यास असमर्थ होते. बनवारीलाल पुरोहित यांनी संसदेच्या स्थायी समितीचे प्रमुख गुरुदास कामत यांचा अहवालच चर्चेत मांडून पुरावे सादर केले. या अहवालात मंत्री अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अपारंपरिक ऊर्जा साडे नऊ हजार मेगाव्ॉट वाढली असली तरी, त्याचा नागपूर व विदर्भाला किती लाभ झाला, हा श्रोत्यांचा प्रश्न होता. यामुळे मंत्र्यांचे समर्थक हातघाईवर आले, अशी टीका भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केली.
केंद्रात आणि राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार असताना देशाची कशी स्थिती आहे, याची जनतेला कल्पना आहे. दारिद्रय़ रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण राज्यात सर्वाधिक नागपूर विभागात आहे. याला कोण जबाबदार आहे, याचाही राज्यकर्त्यांनी विचार करावा, असेही देशमुख म्हणाले.
काँग्रेसचे जयप्रकाश गुप्ता यांनी भाजपवर तोफ डागली. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आधी घोषणा देऊन कार्यक्रमात गोंधळ सुरू केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी विलास मुत्तेमवार यांच्यावर टीका केली. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. पण, हे व्यासपीठ राजकीय नसल्याने उभय पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले.
भाजपचे महापालिका संयोजक गिरीश व्यास यांनी काँग्रेसवर टीका केली. आम्ही निवडक नेते होतो, याउलट काँग्रेसकडून अनेक कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम उधळून लावण्याचे मनसुबे आखूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते, असे आरोप करून व्यास म्हणाले, बनवारीलाल पुरोहित यांच्यावर पक्ष बदलण्याचा आरोप लावण्याचा विलास मुत्तेमवार यांना काहीही अधिकार नाही. विलासराव देशमुख यांनी पक्ष त्याग केला होता, काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले. यामुळे आधी स्वतच्या पक्षाची संस्कृती बघावी व नंतर आमच्यावर टीका करावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक धवड यांनी आयोजकांना दोष दिला. कोणाच्याही प्रवेशावर र्निबध न लावल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. केवळ आमंत्रितांनाच प्रवेश असता, तर ही स्थिती उद्भवली नसती, असेही ते म्हणाले.
माजी महापौर विकास ठाकरे यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांनीच सुरुवात केल्याचा दावा केला. विलास मुत्तेमवार यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर श्रोत्यांनी शांत राहणे आवश्यक होते. पण, भाजप समर्थित कार्यकर्त्यांनी ‘शेम, शेम’ म्हणून घोषणा दिल्या. तरीही आम्ही शांत होतो, हे सर्वानी वाहिनीवर बघितले. मात्र, ते आक्रमक झाल्याने आमच्या समर्थकांनीही त्यास प्रत्युत्तर दिले, असे सांगून ठाकरे यांनी कार्यक्रमात निवडक श्रोत्यांना आमंत्रित करणे आवश्यक होते, याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेख हुसेन यांनी स्टार न्यूजच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित केला. भारनियमनावर एका विद्यार्थिनीला बोलते करणे हा पूर्वनियोजित कट होता. विलास मुत्तेमवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा अयशस्वी प्रयत्न यातून केला गेला, असेही हुसेन यांनी म्हटले आहे.