Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

धरण बांधताना शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे -डॉ. निंबाळकर
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

धरण बांधताना शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देऊन औद्योगिक व पिण्याच्या पाण्याचे धोरण ठरवावे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे प्रतिपादन पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी

 

कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.
दी इन्स्टिटय़ुशन ऑफ इंजिनिअर्स, भारतीय जलसंसाधन संस्था, वॉटर मॅनेजमेंट फोरम व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंचन विकासासाठी पाणी वापर’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक विठ्ठलराव वासाडे उपस्थित होते. यावेळी डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. शरद निंबाळकर यांनी पाण्याचे महत्त्व सांगून भूजल पाण्याचा होत असलेला अतिरेकी वापर याबद्दल चिंता व्यक्त केली. पाण्याचा योग्य उपयोग करून जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणावे, असे आवाहन डॉ. निंबाळकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात विठ्ठलराव वासाडे यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नका, पाणी साठवून ठेवा, असे आवाहन केले. भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे यांनी सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन करण्यामागील पाश्र्वभूमी विशद केली.
प्रास्ताविकात जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मो.ई. शेख यांनी सांगितले की, लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकरी हा पाणी वापर संस्थेचा सदस्य राहील. जलसंपदा विभागाकडून वैयक्तिक शेतकऱ्याला पाणी देण्यात येणार नाही तर, विभाग केवळ पाणी वापर संस्थेलाच घनमापन पद्धतीने पाणी उपलब्ध करून देईल. शेतकऱ्यास संस्थेकडून समन्यायी पद्धतीने हक्काचे पाणी घनमापन पद्धतीने मिळेल. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी स्वागतपर भाषण केले. हेलोंडे यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर दहा पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली.