Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विभागीय कर्करुग्णालय रुग्णांसाठी आशेचे स्थान
माफक दरात होतात कर्करुग्णांवर उपचार
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कर्करुग्णालयात रुग्णांवर अत्यंत माफक दरात औषधोपचार केले जातात. एवढेच नव्हे तर, मानवतेच्या दृष्टीनेही त्यांच्याकडे पाहीले जाते. म्हणूनच हे रुग्णालय

 

मध्य भारतात प्रशंसनीय ठरले असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. शांतनु चौधरी यांनी दिली.
कर्करोग हा अत्यंत जटील आजार असून तो समूळ नष्ट करण्यासाठी बरेच दिवस औषधोपचार करावे लागतात. यासाठी रुग्णांचा भरपूर पैसा खर्च होत असून वेळही जातो. त्यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य येते. अशा रुग्णांना आपुलकीची गरज असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणेच हे रुग्णालय चालवले जात आहे. या रुग्णालयावर विभागीय आयुक्तांचे संपूर्ण नियंत्रण असते. शासनाच्या निर्देशाप्रमाणेच येथील रुग्णांकडून शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क अन्य खाजगी रुग्णालयाच्या तुलनेत फारच कमी असल्याचेही डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
रुग्णाला कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, त्यावरून त्यांच्यावर रेडिओथेरेपी, किमोथेरेपी व शस्त्रक्रिया या तीन पद्धतीने उपचार केले जातात. हे उपचार करण्यापूर्वी रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी, यासाठी औषधोपचार करावा लागतो. शारीरिक बदल घडून आल्यास अशा रुग्णांवर पुढील उपचाराची दिशा ठरत असते. ज्या रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते, त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतात, असेही त्यांनी नमूद केले. ही प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आठ-दहा दिवस अन्य औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे बरेचदा अनेक रुग्ण भावनावेगात योग्य उपचार होत नसल्याचे सांगतात. रुग्णांच्या भावना आम्ही समजतो. परंतु रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आम्हालाही समजून घ्यावे, असेही डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
कर्करुग्णांवर औषधोपचार केले किंवा शस्त्रक्रिया केली तर, अन्य आजाराप्रमाणे तो लवकर दुरुस्त होत नाही. काही रुग्णांना तर, पाच ते सात वर्षेही लागतात. त्यातच या आजारावरील औषधे महागडी आहेत. परंतु ती दिल्याशिवाय आम्हालाही नाईलाज असतो. येथे सर्वसाधारण वॉर्डचे एक दिवसाचे शुल्क फक्त ६० रुपये घेतले जाते. त्यात दोन वेळचे जेवन, एकवेळचा नाश्ता तसेच डॉक्टरांच्या तपासणीचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिदक्षता विभागाचे शुल्क प्रतिदिवस फक्त अकराशे रुपये आहे. अन्य रुग्णालयात हेच शुल्क पाच हजाराच्या वर आहे. रुग्णांवर अत्यंत माफक म्हणजे २० ते ३० हजार रुपयात शस्त्रक्रिया केली जाते. अन्य रुग्णालयात हाच खर्च दीड लाख रुपयावर जातो. मध्य भारतातील कोणत्याच रुग्णालयात एवढय़ा कमी दरात उपचार होत नाहीत. म्हणूनच विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातून मोठय़ा प्रमाणात रुग्ण येथे येत असल्याचेही ते म्हणाले. रुग्णालयात एकूण ३० डॉक्टर असून दीडशे अन्य कर्मचारी आहेत. येथे योग्य उपचार होत असल्याची माहितीही काही रुग्णांनी दिली.